रेती वाहतुकीची परवानगी नाही; महसूल विभागाला कळवूनही दुर्लक्ष
गुहागर, ता.14 : तालुक्यातील शृंगारतळी येथे बांधकामासाठी रेती घेऊन आलेला डंपर निकृष्ट दर्जाच्या गटारात कोसळले. भर बाजारपेठेत रेतीचा डंपर गटारात गेल्याने येथील ग्रामस्थांनी रेती वाहतुकीची परवानगी घेतली आहे का, अशी विचारणा केली. सबंधित डंपरच्या चालकाने वाहतूक पावती नसल्याचे सांगितले. दरम्यान, याबाबत गुहागर महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना सदरील घटनेची माहिती देऊनसुद्धा अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी येऊन या डंपरवर कारवाई करण्याचे धाडस न दाखवल्याने उपस्थित ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले. Dumper went into the sewer at Shringartali
शृंगारतळी बाजारपेठेत शुक्रवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास चिपळूण येथून मोठा डंपर रेती घेऊन आला होता. गुहागर विजापूर मार्गावरील शृंगारतळी बाजारपेठेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला निकृष्ट दर्जाचे गटार बांधण्यात आले आहेत. याच गटारावरून एका बांधकामासाठी रेती सदरील डंपर घेऊन जात होता. गटारावर डंपर चढताच मागील चाक गटारात गेला. त्यामुळे भर बाजारपेठेत डंपर अडकून पडला.

कोणतीही वाहतूक परवानगीची पावती नसताना सदरील रेती वाहतूक होत असल्याचे समोर आल्याने ग्रामस्थांनी याबाबत गुहागर महसूल विभागाला कळवले. मात्र, दीड तास होऊनसुद्धा महसूल विभागाचा एकही अधिकारी वां कर्मचारी या डंपरवाल्याचे कागदपत्र पाहण्यासाठी आला नाही. कारवाई झाली असती तर मोठा दंड सबंधित डंपर व्यावसायिकाला बसला असता म्हणून तर महसूल विभागाने लवकर येण्यास टाळाटाळ केली असावी, अशी चर्चा याठिकाणी सुरू होती. Dumper went into the sewer at Shringartali

परवाना येताच तलाठी घटनास्थळी पोहोचले
रेती डंपर चालकाकडे वाहतूक परवाना नसल्याने ग्रामस्थांनी सदरील घटना महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती. मात्र, गुहागर मधून शृंगारतळी येथे येण्यासाठी दहा मिनिट लागतात. परंतु, महसुलचे अधिकारी दीड तास होऊनसुद्धा घटनास्थळी उपस्थित राहिले नाही. पण, डंपर मालक रेती वाहतूक परवाना घेऊन येताच महसुलचे दोन तलाठी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पोहोचल्याने या रेती व्यवसायात मिलीभगत असल्याची चर्चा शृंगारतळीत सुरू होती. Dumper went into the sewer at Shringartali

