पदाधिकारी संतापले, महामार्ग प्राधीकरणाला गांभिर्य नसल्याचा आरोप
गुहागर, ता. 11 : गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट कामाबद्दल चर्चा करण्यास अधिकार नसलेला अधिकारी पाठवला. यावरुन राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणच्या चिपळूण कार्यालयातील अधिकाऱ्यांना गांभिर्यच नाही. असा थेट आरोप गुहागर तहसीलदारांच्या उपस्थितीत राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केला. समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत तर सर्व राजकीय पक्ष जनतेसह 26 जानेवारीला उपोषण करतील. असा इशारा यावेळी उपस्थितांनी दिला. Guhagar to Vijapur highway work meeting
गुहागरमधील दिपक परचुरे यांनी गुहागर ते विजापूर महामार्गाच्या 0 ते 26 कि.मी. मधील कामाबाबत प्रश्र्नचिन्ह उपस्थित करुन प्रजासत्ताक दिनी उपोषण करणार असल्याचे पत्र तहसीलदार गुहागर यांच्याकडे दिले होते. हे उपोषण होवू नये यासाठी तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी प्रयत्न सुरु केले. याच प्रयत्नांचा भाग म्हणून चिपळूणमधील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावले होते. तहसीलदार कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला गुहागरमधील सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपोषणाची नोटीस देणारे दिपक परचुरे यांनी सांगितले की, गेले अनेक महिने रस्त्याबाबत महामार्ग प्राधिकरण, ठेकेदार, प्रांत, जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला. मात्र एकानेही उत्तर घेण्याची तसदी घेतली नव्हती. पण प्रजासत्ताक दिनी उपोषण करण्याचा इशारा दिल्यावर तातडीने सर्व विभागांकडून पत्रे आली. परंतु या पत्रातही महामार्गाच्या समस्यांबाबत कोणत्याही प्रकारचे समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. महामार्गाचे काम गेली चार वर्ष 3 ठिकाणी अर्धवट सोडून दिलेले आहे. काही ठिकाणी रस्ता खचला आहे. त्याच्या देखभालीबाबत हालचाल होत नाही. शुन्य कि.मी. पासून रस्त्याला कधी पासून सुरवात होणार याबाबत कोणी वाच्यता करत नाही. आज उपस्थित अधिकाऱ्यांनी याबाबत समाधानकारक, लेखी आश्र्वासन द्यावे. Guhagar to Vijapur highway work meeting
यावेळी राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही महामार्गाच्या वेगवेगळ्या समस्यांची माहिती तहसीलदार व महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना दिली. त्यानंतर उत्तर देण्यासाठी महामार्ग प्राधिकरणचे तांत्रिक अभियंता पंडित उभे राहीले. वेगवेगळ्या समस्यांवर त्यांनी थातुरमातुर उत्तरे देवून वेळ मारुन नेण्याचा प्रयत्न केला. परंतु लेखी आश्र्वासन देण्याची वेळ आली तेव्हा महामार्गाच्या कामाबाबत आपल्याकडे कोणताच अधिकार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हे ऐकताच उपस्थित पदाधिकारी संतापले. जर आपल्याला काहीच अधिकार नाहीत तर तुम्हाला इथे पाठविण्याचे कारण काय. असा प्रश्र्न विचारला. 26 जानेवारीपर्यंत अर्धवट कामे पूर्ण झाली नाही. तर आम्ही सर्वजण प्रजासत्ताक दिनी उपोषणाला बसू. असा इशारा पंडित यांना दिला. Guhagar to Vijapur highway work meeting

अखेर तहसीलदार सौ. वराळे यांनी मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी, प्रांत यांना आजच्या सभेचे इतिवृत्त पाठवण्यात येणार आहे. त्यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर पुन्हा एकदा सभा घेण्याची विनंती मी करेन. असे सौ. वराळे यांनी सांगितले. त्यावर महामार्गाच्या अधिकाऱ्यांना समस्येचे गांभिर्य नसेल तर जनआंदोलन उभे करावे लागेल. असे इशाराच उपस्थितांनी महामार्ग प्राधिकरणला दिला. Guhagar to Vijapur highway work meeting
यावेळी उपोषणाचे पत्र देणारे दिपक परचुरे, भाजपचे तालुकाध्यक्ष नीलेश सुर्वे, माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ. स्नेहा भागडे, विश्र्वनाथ रहाटे, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे निलेश मोरे, बाळासाहेबांची शिवसेनाचे तालुकाप्रमुख दिपक कनगुटकर, गुहागर नगरपंचायत भाजप गटप्रमुख उमेश भोसले, माजी उपनगराध्यक्ष नरेश पवार, उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सिध्दीविनायक जाधव, माजी नगराध्यक्षा स्नेहा वरंडे, भाजप तालुका सरचिटणीस सचिन ओक, अमरदिप परचुरे, अतुल साखरकर आदी उपस्थित होते. Guhagar to Vijapur highway work meeting

