वाळू वाहतूक ग्रामस्थांनी रोखली; तहसीलदारांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष
गुहागर, ता.05 : गुहागर बाग समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात अवैधपणे वाळू उपसा सुरू आहे. पालशेत आणि वरचापाट बाग परिसरात अशाप्रकारची चोरटी वाळू वाहतूक सुरू आहे. बुधवारी सकाळी गुहागर शहर बाग परिसरात समुद्राची पांढरी वाळू भरून वाहतूक करणारे वाहन आरे येथील काही ग्रामस्थांनी अडकवून सदर अवैद्य वाळू उपसा व वाहतूक महसूल विभागाच्या निदर्शनात आणून दिले. दरम्यान, ग्रामस्थांनी अवैद्य वाळू उपसाची गाडी पकडून दिल्याने या गाडीवर नाईलाजाने कारवाई करण्याची महसूल विभागावर वेळ आली आहे. Guhagar beach sand extraction
गुहागर बाग समुद्रकिनारी गेले अनेक महिने या बेसुमार होणाऱ्या वाळू उपसाकडे महसूल विभागाने पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. मात्र बुधवारी पकडलेल्या या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल विभाग कशा प्रकारे कारवाई करते, याकडे लक्ष लागून राहिले आहे. सदर कारवाईच्या प्राथमिक अवस्थेमध्ये संबंधित व्यक्तीला दंडाची नोटीस बजावण्यात आली. असल्याचे तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी सांगितले.


या समुद्रकिनारी चालणाऱ्या वाळू उपसाकडे वेळीच नियंत्रण न केल्यास अनेक वाद निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. समुद्रकिनाऱ्यावरील या वाळू उपशावर काहींनी आपलीच मालमत्ता असल्यासारखे अधिकार गाजवायला सुरुवात केली आहे. वाळू उपसाच्या पार्श्वभूमीवर ज्याप्रमाणे पालशेत येथे ग्रामपंचायत सदस्याला मारहाण झाली. त्याप्रमाणे गुहागरतही वाद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Guhagar beach sand extraction


या चोरट्या वाळू उपशासाठी जुनी आणि नंबर प्लेट नसलेली गाडी वापरली जात असल्याचे निदर्शनास आले. आरे येथे ग्रामस्थांनी सदरील वाहतूक रोखल्यावर वाळू व्यावसायिकांचे अनेक सहकारी दमदाटी करण्यासाठी उपस्थित झाले. या घटनेचे गांभीर्य ओळखून आरे वाकी पिंपळवट विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन आणि सामाजिक कार्यकर्ते संदीप उर्फ भैय्या देवकर यांनी पोलीस प्रशासनाला संपर्क साधला. सदरील हकीकत कळवल्याने पोलीस येताच आलेले सहकारी घटनास्थळावरून निघून गेले. Guhagar beach sand extraction

