नेहमी कृतज्ञ रहा
श्री राजेंद्र कुलकर्णी (लाइफ कोच) मोबाईल 8652253900
मित्रांनो जर खरोखरच तुम्हाला यशस्वी व आनंदी व्हायचे असेल, तर आज पासून प्रत्येक व्यक्ती विषयी प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ रहा.
आता हे नक्की कसं करायचं?
तुम्हाला सकाळी जाग आल्यानंतर प्रथमतः परमेश्वराचे आभार माना.. त्याने तुम्हाला पुन्हा उठवल्याबद्दल, जाग आणल्याबद्दल, तुम्हाला हे सुंदर जग दाखवल्याबद्दल परमेश्वराचे, तुमच्या सद्गुरूंचे, त्या ब्रम्हांडातील शक्तीचे मनापासून आभार माना
तुमच्या शरीराचे आभार माना.. तुमचं हे संपूर्ण शरीर तुमचं हृदय, तुमचे हात पाय, सर्व अवयव हे छान पैकी काम करत आहेत. आणि म्हणून तुम्ही सर्व काम करू शकता, चालू शकता, विचार करू शकता, खाऊ शकता. फक्त कल्पना करा तुमच्या शरीरातील एखादा अवयव नादुरुस्त झाला तर, तुमची बरीच कामे आडतील.. म्हणूनच तुमच्या संपूर्ण शरीराचे मनापासून आभार माना.
तुमचं हृदय जन्मापासून अव्याहतपणे काम करत आहे आणि म्हणून तुम्ही जिवंत आहात. म्हणून तुमच्या हृदयाचे आभार माना
तुम्ही हाताने काम करू शकता, हाताने जेवू शकता. हाताने स्पर्श करू शकता, म्हणून तुमच्या हाताचे आभार माना.
तुमच्या पायाने तुम्ही इकडे तिकडे कुठेही फिरायला जाऊ शकता. तुम्ही कामावर किंवा तुमच्या नातेवाईकांना, मित्रांना भेटण्याकरता जाऊ शकता, म्हणून पायाचे आभार माना
तुमच्या बायकोचे किंवा नवऱ्याचे आभार माना. त्यांच्यामुळे तुमचा संसार सुखाचा चालू आहे. तुमच्या जोडीदारामुळेच आज तुमची वेगळी ओळख आहे. तुमच्या सुखदुःखात साथ देणारी ती एकमेव व्यक्ती आहे, म्हणून तुमच्या जोडीदाराचे मनापासून आभार माना
तुमच्या मुलाबाळांचे आभार माना. तुमची मुलं लहान असताना तुम्हाला आनंद देत होती. मोठी झाल्यावर तुमच्या कामात ते तुम्हाला थोडी का होईना पण मदत करत आहेत, तुमचं ती ऐकत आहेत, तुम्हाला प्रेम देत आहेत म्हणून त्यांचे आभार माना.
जिने तुम्हाला जन्म दिला त्या आईचे, वडिलांचे आभार माना. त्यांच्यामुळेच तुम्ही हे जग पाहिलेलं आहे, आता तुम्ही जे काही आहात त्याचा उगम तिथून झालेला आहे म्हणून त्यांचे आभार माना
तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात त्या कंपनीचे मनापासून आभार माना. त्या कंपनीत तुम्हाला कामाला ठेवले गेले, म्हणून तुम्हाला पैसा येऊ लागला. पैशामुळेच तुमची प्रगती झाली, म्हणून त्या कंपनीचे आभार माना
जर तुम्ही कोणता व्यवसाय करत असाल, तर तुमच्या सर्व ग्राहकांचे आभार माना. त्यांच्यामुळेच तुमचा तो व्यवसाय चालू आहे.
तुम्ही दररोज जे अन्न खाता, ते शेतकऱ्यांच्या मुळे तुम्हाला मिळत आहे, म्हणून शेतकऱ्यांचे आभार माना. शेतकऱ्यांच्या पासून ते अन्नधान्य, दूध, भाजीपाला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेचे, मार्केट व त्यामधील व्यापारी तसेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम यांचे आभार माना
तुम्हाला दररोज तुमच्या इच्छित ठिकाणी पोहोचवणाऱ्या वाहतूक यंत्रणेचे, ट्रेनचे, बसचे, रिक्षा, टॅक्सी या सर्वांचे आभार माना
तुमच्याकडे असणारी बाईक, स्कुटी, कार यांचे देखील आभार माना.
तुम्हाला नेहमी सपोर्ट करणाऱ्या, तुमच्या प्रगतीसाठी चांगला सल्ला देणाऱ्या, तुमचं ऐकून घेणाऱ्या, तुमच्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या मित्र-मैत्रिणींचे, नातेवाईकांचे मनापासून आभार माना
तुम्ही आतापर्यंत ज्या घरात राहत आहात ते घर, मग ते भाड्याचे असो अथवा स्व-मालकीचे, त्याचे आभार माना.
या जगातील कोणतीही गोष्ट पैशाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. त्यामुळे तुमच्याकडे असणाऱ्या, तुम्ही खर्च करत असलेल्या सर्व पैशांचे मनापासून आभार माना
एवढेच नाही तर, तुम्हाला आतापर्यंत कमी लेखणाऱ्या, तुम्हाला त्रास देणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार माना. त्यांच्यामुळेच तुम्ही तुमची प्रगती केलेली आहे व या उंचीपर्यंत येऊन पोहोचलेला आहात.
मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी फक्त काही उदाहरणे दिलेली आहेत. अशा अनेक गोष्टी तुम्हाला दिसतील, त्या प्रत्येक गोष्टीचे, प्रत्येक व्यक्तीचे, निसर्गाचे मनापासून आभार मानत चला.
रोज आभार मानल्यामुळे कृतज्ञता व्यक्त केल्यामुळे काय मिळेल? तुम्ही जितके जास्त त्या परमेश्वराविषयी, ब्रम्हांडाविषयी कृतज्ञ राहाल, तितकेच तो परमेश्वर, ते ब्रम्हांड तुम्हाला कृतज्ञ राहण्यासाठी संधी देत जाईल.
तेव्हा आज पासून बोलून, लिहून… कृतज्ञता व्यक्त करत चला, आणि मग पहा तुमच्या जीवनात काय चमत्कार होतो ते. तुम्ही सर्वजण माझ्या एका मेसेजवर या ग्रुप मध्ये आलात आणि तुम्हा सर्वांना मार्गदर्शन करण्याची संधी मला दिलीत म्हणून मी तुम्हा सर्वांच्या प्रति खूप कृतज्ञ आहे. Thank you so much
राजेंद्र कुलकर्णी यांच्या “यशस्वी भव:” संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.
आनंदी जगण्याचा मार्ग मागिल भाग वाचण्यासाठी क्लिक करा.
(भाग -9 आपण उद्या जाणून घेणार आहोत.)
धन्यवाद
तुमच्या पुढील उज्वल भविष्यासाठी तुम्हाला खूप प्रेम व शुभेच्छा