गुहागर मतदार संघातील पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात होणार सामील
गुहागर, ता.15 : गेल्या दोन अडीच महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मोठी राजकीय उलथापालथ झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आले. आता हीच राजकीय उलथापालथ आ. भास्कर जाधव यांच्या गुहागर मतदार संघात होताना दिसत आहे. दिवाळीत शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटात सामील होणार असल्याने गुहागर मतदार संघाला भगदाड पडणार आहे. यासंदर्भात मतदार संघातील उद्धव ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली आहे. Activists join Shinde Group

सद्या राज्यात ठाकरे – शिंदे गट असा वाद टोकाला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सेनेचे दोन आमदार आणि एक माजी आमदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. तर आ. भास्कर जाधव ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. त्यामुळे आ. जाधव यांची सेनेच्या नेतेपदी निवड करण्यात आली. शिंदे आणि ठाकरे यांच्या या वादात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची राज्यातील घडी बसविण्यासाठी गुहागर मतदार संघाचे आमदार भास्कर जाधव सगळीकडे मेळावे घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करत आहेत. शिवसैनिकांना ठाकरेंच्या शिवसेनेशी जोडून ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. परंतू, त्यांच्याच मतदार संघातील शिवसेनेचे नाराज पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदे गटाशी जवळीक साधताना दिसत आहेत. शिवसेनेचे गुहागर तालुक्यातील सरपंच, युवा कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक शिंदे गटात सामील झालेले आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या माध्यमातून गुहागर मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात दाखल होत आहेत. गुहागर नगरपंचायत क्षेत्रातील आ. भास्कर जाधव यांचे जवळचे पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले आहेत. आणखी काही पदाधिकारी दिवाळीपूर्वीच शिंदे गटात दाखल होणार आहेत. आ. जाधव एकीकडे राज्यात ठाकरेंची शिवसेना टीकविण्यासाठी जीवाचे रान करून विरोधकांना अंगावर घेत आहेत. आणि त्यांच्याच मतदार संघातील कार्यकर्ते शिंदे गटात सामील होत असल्याने आ. जाधव यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. Activists join Shinde Group
गुहागरात शिंदे गटांच्या बैठकांनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिंदे गटात सक्रिय झालेले गुहागर तालुक्यातील गावोगावी बैठका घेत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले जात आहे. शिंदे गटाच्या बैठकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याने गुहागर तालुक्यातील शिवसैनिकांमध्ये मोठी फूट पडणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. तसेच राष्ट्रवादीचे पदाधिकऱ्यांनीही ना. उदय सामंत यांची नुकतीच भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. Activists join Shinde Group
