यशवंत बाईत : सर्व कामे ग्रामस्थांच्या समोर आहेत
गुहागर, ता. 04 : गेल्या 10 वर्षात सरपंच म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी काय काम केले ते ग्रामस्थांसमोर आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमच्या पॅनेलचे सर्व उमेदवार विजयी होणार अशी माहिती अंजनवेल ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यशवंत बाईत यांनी गुहागर न्यूजला दिली. Anjanvel Gram Panchayat
अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये 11 ग्रामपंचायत सदस्य व थेट जनतेतून निवडावयाचा 1 सरपंच यासाठी निवडणुक जाहीर झाली. या निवडणुकीसाठी यशवंत बाईत, आत्माराम मोरे, उमेश किल्लेकर, रहिज खान, राजेंद्र खडपे, रुकनुभाई गांग्रेकर, सर्फराज महालदार, अजिज मस्तान व नुरखान पठाण या ग्रामस्थांनी एकत्र येत गाव पॅनेल तयार केले. या पॅनेलमध्ये सर्व पक्ष आणि संपूर्ण गावाचे प्रतिनिधित्व आहे. Anjanvel Gram Panchayat
11 जागांपैकी प्रभाग क्रमांक 1 मधील 2 महिला राखिव जागा या पॅनेलने बिनविरोध निवडून आणल्या. आता प्रभाग 1 मधुन यशवंत बाईत, प्रभाग 2 मधुन मंगेश बागकर, माधुरी खडपे, स्मिता कांबरे, प्रभाग 3 मधुन सनोबर खान आणि सिमरन वाडये, प्रभाग 4 मधुन राजेश धामणस्कर, सर्फराज महालदार आणि सारिका संतोष गाडे हे गावपॅनेलचे 9 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसेच सरपंच पदासाठी 7 वर्ष ग्रामपंचायत सदस्य राहीलेल्या अनामिका अनिल खडपेकर या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. Anjanvel Gram Panchayat
आमचे सर्व सदस्य आणि सरपंच पदाच्या उमेदवार 100 टक्के निवडून येणार अशी ग्वाही यशवंत बाईत यांनी दिली. गुहागर न्यूजशी बोलताना ते म्हणाले की, 10 वर्ष सरपंच पदाचा कार्यभार सांभाळताना अंजनवेल गावात आंतरराष्ट्रीय शाळा, 8 वी व त्यापेक्षा वरील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण, अपंगांना भविष्य निर्वाह निधी, व्यायामशाळा, बँक ऑफ इंडियासारख्या राष्ट्रीयकृत बँकेची शाखा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अथक परिश्रमातून 3 वर्षांपूर्वी संपूर्ण गावाला दररोज पाणी दिले. ही कामे आम्ही केली आहेत. आज ही सर्व कामे ग्रामस्थांच्या समोर आहेत. त्याचप्रमाणे कंपनीकडून मिळणाऱ्या करासंदर्भातील केस पंचायत समितीमध्ये आम्ही जिंकलो आहोत. आमच्या प्रचारामध्ये आम्ही काय केले ते सांगण्यासाठी आणखी अनेक मुद्दे आहेत. याउलट निधीची तरतुद असुनही प्रशासकाच्या काळात पाणी योजनेत झालेला गोंधळ आणि निर्माण केलेले प्रश्र्नही ग्रामस्थांनी अनुभवले आहेत. त्यामुळे गावाच्या विकासासाठी केवळ निधी असून उपयोग होत नाही तर निर्माण केलेल्या सर्व योजना कुशलपणे हाताळणारे व्यवस्थापन पाहिजे. हे देखील गावाला माहित आहे. आमच्या पॅनेलमध्ये ग्रामपंचायतीचा अनुभव असणारी महिला सरपंच पदाची उमेदवार आहे. तर आमचे उमेदवारही अनुभवी आहेत. महालदार यांच्यासारखा स्थापत्य अभियंता आमचा उमेदवार आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता अंजनवेल मधील ग्रामस्थ आम्हालाच विजयी करतील असा विश्र्वास वाटतो. Anjanvel Gram Panchayat
लोक आग्रहास्तव निवडणुकीत
10 वर्ष सरपंच म्हणून काम पाहिल्यानंतर पुन्हा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणुक लढविण्याची इच्छा नव्हती. मात्र नव्याने येणाऱ्या कमिटीला सर्व उपक्रम चालविण्यासाठी मार्गदर्शन मिळावे. कंपनीने न दिलेल्या करासंदर्भात जिल्हा परिषद स्तरावर सुरु असलेली केस जिंकता यावी. यासाठी लोकांनी ग्रामपंचायतीमध्ये जाण्याचा आग्रह केला. म्हणून ही निवडणूक लढवत आहे, असे यशवंत बाईत यांनी सांगितले. Anjanvel Gram Panchayat