वरवेलीतील शिंदेंच्या हळद लागवडीला अवश्य भेट द्या – प्रशांत राऊत
गुहागर, ता. 21 : पंचायत समिती हळद लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत वरवेली येथील क्षितिज शिंदे यांच्या हळद लागवडीच्या प्लॉटला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी आवर्जून भेट दिली. शिंदे यांनी खूप मेहनतीने या हळद प्लॉटची काळजी घेऊन उपाययोजना केल्याबद्दल कुटुंबियांचं त्यांनी कौतुक केले. Venture of Panchayat Samiti

यावेळी त्यांनी सांगितले की, क्षितिज शिंदे व श्वेता शिंदे यांनी पंचायत समितीकडून हळद लागवडीबाबत प्रशिक्षण घेतले होते. यापूर्वीही सचिन कारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्र आबलोली येथेही प्रशिक्षणाला ते उपस्थित राहिले होते. शिंदे यांनी मुकनाक रोपवाटिका निगुंडळ येथून ७५० रोपे आणली. १४ जूनला SK-4 या वाणाच्या रोपांची शिंदे यांनी लागवड केली. जून महिन्यात पाऊस थोडा उशीराच सुरू झाला. पण आम्हाला प्रशिक्षणात माहिती दिल्या प्रमाणे १५ जुनपूर्वी लागवड करणे आवश्यक होते. १४ जूनला लागवड केल्यानंतर मात्र ४-५ दिवस आम्ही रोपांना पाणी शिंपले. लागवड करताना कृषी अधिकारी आर. के. धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांनी वेळोवेळी केलेल्या सर्व सुचना आम्ही तंतोतंत पाळल्या. Venture of Panchayat Samiti

लागवडीचा वेळी शेणखत, गांडूळ खत, निमपावडर, सुफला, बायोपावर, क्लोरोपायरीफॉस पावडर इत्यादींचा सूचनेनुसार वापर केला. रोपे जोडऒळ पद्धतीने लावली. दोन जोड रांगांमध्ये ५ फूट व दोन रोपांमध्ये १ फुट असे अंतर ठेवले. रोपांची वाढ योग्य पद्धतीने झाल्यावर गणपती पुर्वी आणखी गांडूळ खत व सुफला यांची मात्रा दिली. मध्यंतरी कृषी विस्तार अधिकारी यांच्या भेटी दरम्यान पाने गुंडाळणारी अळी दिसून आली. व तीन चार पानांवर करपासदृष्य रोग दिसून आला. म्हणून उपाययोजना व पुढे किड रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून काळजीपूर्वक कलोरोपायरीफॉस २० मिली व कार्बन डायझीम १० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी केली. त्यामुळे किड नाहीसी झाली. व बुरशीचाही प्रादुर्भाव दिसला नाही. Venture of Panchayat Samiti
शिंदे यांनी त्यांचे अनुभव यावेळी सांगितले.वेळीच मातीची भर दिल्यामुळे जवळपास सर्वच ठिकाणी ३ फुटवे आहेतच मात्र काही ठिकाणी ४-५ तर काही ठिकाणी ६ फुटवे आहेत. पानांची लांबी देखील ३५-४० सेमी व रूंदी १५-२० सेमी आहे. अजूनही जिवांमृतच्या दोन मात्रा व १९:१९:१९ पाण्यात विरघळणा-या खतांच्या २मात्रा शिल्लक आहे. एकंदरीत आमच्या या ३ गुंठयाच्या प्लॉटला ७५ टक्के सेंद्रिय व २५ टक्के रासायनिक खतांचा वापर केला आहे. आम्ही कृषी अधिकारी धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर यांच्या सुचनेनुसार सर्व उपाय योजना करीत असल्याचही त्यांनी सांगितले. आमच्या डेमो प्लॉटचा एक तरी गड्डा ४ किलोपेक्षा अधिक उत्पादित करण्याचा आमचा मानस आहे,असे क्षितिज व श्वेता शिंदे यांनी सांगितले. Venture of Panchayat Samiti

या प्रात्यक्षिक प्लॉटसाठी शेतकरी क्षितिज शिंदे व त्यांच्या कुटुंबीयांनी खूप छान मेहनत घेतली आहे. याबद्दल गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी त्यांचे कौतुक केले. भेटीच्या वेळी कृषी अधिकारी धायगुडे व कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर उपस्थित होते. Venture of Panchayat Samiti