शासनाने प्रदान केले विशेष अधिकार
गुहागर, ता.16 : बदललेल्या नवीन शासन धोरणानुसार थेट जनतेतून सरपंच निवड होणार आहे. शासन निर्णयानुसार या सरपंचांना अधिक अधिकार मिळणार असल्याने तो सरपंच आता मिनी आमदार होणार आहे. यामुळे ग्राम स्तरावर सदस्यांपेक्षा सरपंच पदाला अनन्य साधारण महत्व आल्याने सरपंच निवडणूकीत चुरस मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. Sarpanch will be ‘mini MLA’

यापूर्वी ग्रा.पं. निवडणुकीत सरपंच व उपसरपंच ठरविण्याचे अधिकार निवडून आलेल्या सदस्यांना असायचे. त्यामुळे या ठिकाणी एखाद्या गटाचे किंवा समुहाचे संख्याबळ अधिक असेल त्यांचा सरपंच वा उपसरपंच निवडला जायचा. मात्र, नुकताच शासनाने हा निर्णय बदलून सरपंच पदासाठी थेट जनतेतून निवडण्याची पध्दत सुरु केली आहे. लोकसंख्येनुसार जेवढे सदस्य असतील त्यामध्ये एका सरपंचाची अधिक भर पडणार आहे. हा पहिलाच प्रयोग असून त्यासाठी गुहागर तालुक्यात पाच ग्रा. पं. मध्ये प्रथमच निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. Sarpanch will be ‘mini MLA’

थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचाला शासनाने विशेष अधिकारही बहाल केले आहेत. ग्रामपंचायतीच्या सर्व समित्या व उपसमित्या यांचे सरपंच हे पदसिद्ध अध्यक्ष राहाणार आहेत. तर ग्रा.पं. चे ग्रामसेवक/ ग्राम विकास अधिकारी हे सचिव म्हणून काम पाहणार आहेत. ग्राम स्तरावर विकास कामांसाठी मोठा निधी खर्च करण्याची सरपंच यांना मुभा आहे. ग्राम विकासाची मोठी जबाबदारी त्यांना पेलावी लागणार आहे. त्यामुळे या पुढील सरपंच हा मिनी आमदार म्हणून ओळखला जाणार यात शंका नाही. Sarpanch will be ‘mini MLA’
