अंगणवाडी कर्मचारी धडकणार रत्नागिरी जिल्हा परिषदेवर
गुहागर, ता. 15 : आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी सभा या संघटनेतर्फे राज्यातील जिल्हा परिषद कार्यालयांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. याचे नियोजन बुधवारी (ता. 14) अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सहामाही सभेत करण्यात आले. ही सभा शृंगारतळी येथे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. Anganwadi staff march

अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेच्या सेविका व कर्मचारी यांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी दर सहा महिन्यांनी एका सभेचे आयोजन केले जाते. ही सभा बुंधवारी (ता. 14) शृंगारतळी येथील पाटपन्हाळे ग्रामपंचायतीच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात झाली. या सभेला 250 महिला उपस्थित होत्या . सभेच्या सुरवातीला 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सुरु असलेल्या पोषण अभियानाबाबत चर्चा झाली. गुहागर तालुक्यातील बहुतांश अंगणवाड्यांमध्ये शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे अभियान यशस्वीपणे राबविले जात आहे. त्याबद्दल संस्थेतर्फे सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. Anganwadi staff march
शासनाच्या नव्या परिपत्रकामुळे अनेक अंगणवाडी सेविकांना सरकारमान्य रास्त दराच्या धान्य दुकानातून धान्य मिळणे बंद झाले आहे. हा आदेश परत घेवून अंगणवाडी सेविकांना पुन्हा धान्य मिळावे. अशी मागणी या सभेत करण्यात आली. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्रात सर्व जिल्हा परिषदांवर मोर्चा काढण्यात येणार आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्याचे निश्चित झाले आहे.

या संदर्भात बोलताना अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र या संस्थेच्या गुहागर शाखेच्या अध्यक्षा सारीका हळदणकर यांनी सांगितले की, गेले दिड वर्ष आम्ही पोषण ट्रॅकर ॲप मराठीत द्या. मानधन वाढवा. उत्तम दर्जाचे मोबाईल द्या. आदी मागण्यांसाठी संघर्ष करीत आहेत. या मागण्यांसाठी मोबाईल जमा करुन ऑफलाईन काम करण्याचे आंदोलनही केले होते. मात्र अजुनपर्यंत या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यातच सेवानिवृत्त झालेल्या सेविकांना अद्यापही सेवासमाप्तीनंतर मिळणारे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषदेवर भव्य मोर्चा काढण्याची घोषणा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी केली आहे. रत्नागिरी जिल्हा परिषदेवर 20 सप्टेंबरला मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतही याच दिवशी आझाद मैदानावर मोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे. Anganwadi staff march
आज शृंगारतळीत झालेल्या सहामाही सभेला अंगणवाडी कर्मचारी सभा शाखा गुहागरच्या उपाध्यक्ष स्नेहल दळवी, सचिव राधा आंबेकर, सहसचिव सपना विचारे यांच्यासह अन्य पदाधिकारी व संस्थेच्या सभासद असलेल्या 250 अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या. Anganwadi staff march
