खाजगी ट्रॅव्हल्सना गुहागर शहरातून अटी, शर्थीनुसार परवानगी
गुहागर, ता. 24 : शहरातून वरचापाट रानवी मार्गे जाणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सच्या चालकांची अरेरावी व होणारी वाहतूक कोंडी यावर आलेल्या तक्रारीनंतर गुहागर शहर शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत जून पासून येथून खाजगी ट्रॅव्हल्सना जाण्यास मज्जाव केला होता. दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थ व ट्रॅव्हल्स चालकांच्या मागणीनंतर अटी शर्तीवर पुन्हा गुहागर मार्गे ट्रॅव्हल्स धावणार आहेत. तशाप्रकारचे पत्र या ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी शहर शिवसेनेला दिले आहे. Resumption of private travels


गुहागर तालुक्यात अडूर मार्गे गुहागर बाजारपेठ, वरचापाट, रानवी मार्गे करून खाजगी ट्रॅव्हल्स मुंबईला मार्गस्थ होत असतात. गुहागर बाजारपेठ ते वरचापाट, बाग हा रस्ता वर्दळीचा व अरुंद असल्याने अनेक वेळा होणारी वाहतूक कोंडी व यातून ट्रॅव्हल्स चालकांची अरेरावी तसेच मोठ्याने हॉर्न वाजवल्याने आजूबाजूच्या वस्तीला त्रास होत होता. या सर्व बाबींवर ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारीनंतर गुहागर शिवसेनेचे शहर प्रमुख निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली येथून जाणाऱ्या ट्रॅव्हल्सना जून महिन्यापासून मज्जाव करण्यात आला होता. Resumption of private travels


आगामी काळात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ट्रॅव्हल्स चालकांकडून गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांना याबाबत निवेदन देण्यात आले होते. ट्रॅव्हल्स मालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर उपतालुकाप्रमुख जयदेव मोरे, शहरप्रमुख निलेश मोरे, यूवासेना तालुक़ाप्रमुख अमरदीप परचुरे, यूवासेनेचे राज विखारे यांच्याशी चर्चा करून मोठा प्रमाणात येणारे चाकरमानी लक्षात घेऊन ग्रामस्थांना त्रास होणार नाही. अशा अटी – शर्तीवर वरचापाट, रानवीमार्गे पुन्हा एकदा ट्रॅव्हल्स घेऊन जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. याबाबत आ. भास्कर जाधव यांना ट्रॅव्हल्स मालकांच्या वतीने विनायक दणदणे, विक्रांत वानरकर यांनी निवेदन देत ग्रामस्थांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल, अशा अटी मान्य केल्या आहेत. Resumption of private travels


यामध्ये वरचापाट व बाग या ठिकाणी रस्ता अरुंद असल्यामुळे मध्येच गाडी थांबवणार नाही. गाडी गुहागर मधून निघाल्यानंतर फक्त गुहागर मार्केट आरेपुल, बाग (दिवेश आरेकर घरासमोर), बाजी रोड, रानवी अशा ठिकाणी थांबेल. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही. एखाद्या वेळी आमच्या गाडीमुळे अशी समस्या निर्माण झाली. तर आमचे ड्रायव्हर, क्लिनर स्वतः खाली उतरून ती वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करतील. एका दिवशी एका पेक्षा जास्त गाड्या आमच्याकडून सुटणार असतील. तर गुहागर वरून प्रत्येक गाडीमध्ये १५ मिनिटांचा अंतर असेल. आमच्या गाडीमध्ये प्रवाशांना कोणतेही वाईट वागणूक भेटणार नाही. याची आम्ही काळजी घेऊ असे निवेदनात ट्रॅव्हल्स मालकानी म्हटले आहे. Resumption of private travels