तालुक्यात झाला मिठाचा सत्याग्रह, आझाद हिंद सेनेतही सहभाग
गुहागर तालुक्यातील 16 स्वातंत्र्यसैनिकांपैकी 2 जण हे गुहागर तालुक्यातील मुलनिवासी होते. यापैकी 7 जणांची नोंद शासन दफ्तरी आहे. स्वातंत्र्य चळवळी संदर्भातील विविध पुस्तकांमधून अन्य काही स्वातंत्र्य सैनिकांची माहिती समोर आली आहे. याच माहितीच्या आधारे गुहागर तालुक्यातील किनारपट्टीवरील गावांतील अनेक ग्रामस्थांनी वैयक्तिक पातळीवर मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतल्याचे समोर येते. तर अनेकजण ब्रिटीशांच्या सैन्यातील नोकरी सोडून आझाद हिंद सेनेत दाखल झाले होते. मात्र त्यांची नोंद आढळत नाही. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तालुकावासीयांना ही माहिती समजावी यासाठी गुहागर न्यूजने केलेला हा छोटासा प्रयत्न. freedom fighters of Guhagar


संकलन : मयूरेश पाटणकर
गुहागर पंचायत समितीच्या आवारात एक स्तंभ आहे त्यावर स्वातंत्र्यसेनानींची 3 नावे कोरलेली आहेत. त्यामध्ये विष्णूपंत अनंत जोगळेकर (हेदवी), केशव गोपाळ जाधव (गिमवी) आणि गुलाब रावजी कदम (भातगांव) या नावांचा समावेश आहे. तर तहसील कार्यालयात केशव गोपाळ जाधव (गिमवी), अर्जुन मिलिंद चव्हाण (देवघर), पर्शुराम विनायक गोखले (वेळणेश्र्वर) आणि महादेव सिताराम जाधव (गिमवी) या 4 नावांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त दाजी आत्माराम जाधव (गिमवी), गंगाधर श्रीधर साठे (पालशेत), हरी दामोदर गद्रे (गुहागर), अर्जुन बाबाजी कदम, नागेश गोविंद रेडीज (तळवली), संताजी गोविंद सावंत (भातगांव) आणि दिनकरशास्त्री कानडे (नरवण) या मंडळींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्यांच्या नोंदी आहेत. या शिवाय गुहागर मधील खरे घराण्यातील ॲड. वामन सखाराम तथा बाबासाहेब खरे हे नाशिकमध्ये स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होते. तर ज्ञानकोशकार केतकर हे अंजनवेलचे मुलनिवासी आहेत. freedom fighters of Guhagar


केशव गोपाळ जाधव, गिमवी
केशव जाधव यांचा जन्म 1920 साली निर्व्हाळ मध्ये झाला. त्यांचे शिक्षण 5 वी पर्यंत झाले होते. उदरनिर्वाहासाठी ते ब्रिटीश सैन्यात भरती झाले. 1939 मध्ये सैन्यातील नोकरी सोडून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखल झाले. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटीशांविरुध्दच्या गटात सहभागी झाली होती. त्यावेळी जर्मनीचा पराभव झाल्यावर ब्रिटीशांनी आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना अटक केली. त्यामध्ये केशव जाधव यांचा समावेश होता. ब्रिटीशांनी हा सर्वांना 5 वर्ष इंग्लडला तुरंगात ठेवले. त्यानंतर 1 वर्ष दिल्लीतील लाल किल्ल्यातील तुरुंगात ठेवले. भारत स्वतंत्र झाल्यावर केशव गोपाळ जाधव यांनी सुटका करण्यात आली. सुटकेनंतर केशव जाधव गिमवीला रहात होते. 1956 साली त्यांचे निधन झाले. freedom fighters of Guhagar


अर्जुन गोविंद चव्हाण, देवघर
देवघर येथेच जन्मलेले अर्जुन गोविंद चव्हाण यांचे शिक्षण 4 थी पर्यंत झाले. सुरवातीला ब्रिटीश सैन्यात नोकरीला असलेले अर्जुन चव्हाण हे देखील केशव जाधव यांच्याप्रमाणेच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेत दाखल झाले होते. दुसऱ्या महायुद्धात आझाद हिंद सेना ब्रिटीशांविरुध्दच्या गटात सहभागी झाली होती. अर्जुन चव्हाण हे जर्मनीच्या बाजुने लढत होते. त्यावेळी ब्रिटीशांनी त्यांना अटक केली आणि 7 वर्ष इंग्लडच्या तुरुंगात डांबून ठेवले. भारत सोडावा लागणार हे कळून चुकल्यावर ब्रिटीशांनी इंग्लंडमधील सर्व युध्दकैद्यांना भारतात आणले. 1946 साली अचानक अर्जुन चव्हाण यांना त्यांच्या काही सहकाऱ्यांसह सोडून देण्यात आले. त्यानंतर ते देवघरला येऊन राहीले होते. Freedom fighters of Guhagar


महादेव सिताराम जाधव, गिमवी
1918 मध्ये गिमवीमध्ये जन्मलेले महादेव सिताराम जाधव चौथी पास होते. तरुणपणी त्यांनी ब्रिटीश सैन्यात नोकरी केली. मात्र आपणही ब्रिटीश सैन्यात राहून स्वकीयांवरच अन्याय करणे त्यांना रुचत नव्हते. आपणही देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी व्हावे असे त्यांना मनोमन वाटत होते. म्हणूनच संधी मिळताच ब्रिटीश सैन्यातील नोकरी झुगारुन देवून ते आझाद हिंद सेनेत सहभागी झाले. दुसऱ्या महायुद्धात एका युद्धनौकेवर त्यांची नियुक्ती झाली होती. ब्रिटीशांविरुद्ध लढताना अनेकवेळा उपाशी रहावे लागायचे. विमानातून पावांची पाकीटे टाकली जायची. त्यावर दिवस काढावा लागत असे. 1945 साली ब्रिटीशांनी महादेव जाधव यांना अटक केली. लाथाबुक्कांचा मार सहन करावा लागला. ब्रिटीश सैनिकांनी शब्दश: छातीवर पिस्तूल रोखून जबानी घेतली. तुरुंगातील हा छळ पाहून जगण्याची आशा सुटलीच होती. मात्र 1946 साली अर्जुन चव्हाणांप्रमाणे त्यांनाही सोडून देण्यात आले. गिमवीला असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून भारत स्वतंत्र झाल्यावर त्यांनी व्ही. शांताराम यांच्या राजकमल चित्रमंदिरात, एलफिस्टन मिलमध्ये नोकरी केली. निवृत्तीनंतर ते काहीकाळ गिमवीत वास्तव्याला होते. Freedom fighters of Guhagar


मिठाच्या सत्याग्रहातील स्वातंत्र्यसेनानी
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील सर्वात मोठे जनआंदोलन म्हणून मिठाच्या सत्याग्रहाकडे पाहिले जाते. ब्रिटीशांनी भारतीयांना मिठ तयार करण्यावर कर लावला. त्याविरोधात झालेले हे आंदोलन संपूर्ण भारतात वेगवेगळ्या रुपात झाले. विदर्भात जंगल सत्याग्रह झाला. तर अन्य भागात विदेशी कपड्यांची होळी करण्यात आली. कोकणात हे आंदोलन सिंधुदूर्गमधील शिरोडा येथे सामुहिक स्वरुपात झाले. त्यावेळी गुहागर तालुक्यातील समुद्रकिनाऱ्याजवळ रहाणाऱ्या काही मंडळींनी वैयक्तिकरित्या घरी मिठ तयार करुन मिठाच्या सत्याग्रहात सहभाग नोंदवला. Freedom fighters of Guhagar
हरी दामोदर गद्रे, गुहागर
गुहागर बाजारपेठेत आजही कापड दुकान असलेल्या गद्रेपैकी हरी दामोदर गद्रे. 1900 साली त्यांचा जन्म झाला. त्यांना बाबुराव म्हणून गुहागरमध्ये ओळखले जायचे. ते काँग्रेसचे नेते होते. रत्नागिरीतील टिळक स्मारक फंडाचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले होते. गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक होते. स्वदेशी मालाची चळवळ गुहागरमध्ये राबवली होती. त्यामुळे ब्रिटीशांना नुकसान सोसावे लागले होते. 1930 मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी गुहागरमध्ये त्यांनी जनजागृती केली. अनेकांनी समुद्राचे पाणी आणून मिठ तयार केले. तेव्हा ब्रिटीश सरकारने सर्वांकडून मिठ तयार करण्याची भांडी जप्त केली. त्यानंतर 1932 साली स्वातंत्र्य मिळावे म्हणून गुहागरमधील ग्रामस्थांना सोबत घेवून हरी गद्रे यांनी प्रभातफेरी काढली. त्यामुळे चिडलेल्या ब्रिटीश अधिकाऱ्यांनी हरी गद्रे यांना त्या काळात 50 रु दंड आणि 6 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. Freedom fighters of Guhagar


परशुराम विनायक गोखले, वेळणेश्र्वर
परशुराम गोखले यांचा जन्म वेळणेश्र्वरला 3 जून 1914 मध्ये झाला. विवेक गोखले यांचे ते आजोबा. वेळणेश्र्वरला रहाणाऱ्या परशुराम विनायक गोखले यांचे साखरीआगरला किराणा मालाचे दुकान होते. 1930 साली झालेल्या मिठाच्या सत्याग्रहात सहभाग नोंदविण्यासाठी त्यांनी समुद्राच्या पाण्यातून मिठ तयार केले. त्याबद्दल ब्रिटीश सरकारने त्यांना साखरीआगरच्या दुकानातून अटक केली आणि येरवड्याच्या कारागृहात 6 महिने ठेवले. Freedom fighters of Guhagar
गंगाधर श्रीधर साठे, पालशेत
स्वातंत्र्य चळवळीच्या कोशात उल्लेख असणाऱ्या गंगाधर साठेंबद्दल आज कोणतीच माहिती उपलब्ध नाही. ते मिठाच्या सत्याग्रहात सहभागी झाले म्हणून ब्रिटीश सरकारने त्यांना 3 महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा केली होती. Freedom fighters of Guhagar
विष्णूपंत अनंत जोगळेकर, हेदवी यांनाही मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतल्याबद्दल अटक झाली होती.
आत्माराम हरी देवळेकर
अंजनवेलच्या देवळेकर कुटुंबियांपैकी आत्माराम हरी देवळेकर यांचा जन्म 1913 मध्ये झाला. मॅट्रीक पर्यंत शिक्षण झालेले आत्माराम देवळेकर स्वातंत्र्य चळवळीच्या प्रचारासाठी अनेक ठिकाणी प्रवास करत. ग्रामस्थांना या चळवळींचे महत्त्व पटवून सांगत असत. अशा कामासाठी 1932 मध्ये अलिबागला गेले होते. तेथे एका सभेमध्ये भाषण करीत असताना त्यांना ब्रिटीश अधिकाऱ्यांनी अटक केली. 6 महिने तुरुंगवास आणि 20 रुपयाचा दंड किंवा 1 महिना सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली होती. Freedom fighters of Guhagar
1932 च्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतल्याबद्दल भातगांव मधील गुलाब रावजी कदम यांना 4 महिने सक्त मजुरीची शिक्षा झाली होती.


भातगांवमधील संताजी गोविंद सावंत यांचे नाव सरकार दफ्तरी नाही. मात्र स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास या ग्रंथामध्ये त्यांच्या नावाचा उल्लेख आहे. 1930 साली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतल्याबद्दल 10 महिने कारावास आणि 1932 च्या आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल 9 महिने कारावासाची शिक्षा त्यांना झाली होती. Freedom fighters of Guhagar
अर्जुन बाबाजी कदम (गाव माहिती नाही) 1930 साली मिठाच्या सत्याग्रहात सहभाग घेतल्याबद्दल 3 महिने कारावास झाला होता.
तळवलीचे नागेश गोविंद रेडिज यांना मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटातील संशयित म्हणून 3 महिने ब्रिटीश सरकारने स्थानबद्ध केले होते.


दिनकरशास्त्री कानडे
गुहागर तालुक्यातील नरवणमध्ये जन्म आणि प्राथमिक शिक्षण घेतलेल्या दिनकरशास्त्री कानडे यांनी आपले संपूर्ण जीवन देशसेवेसाठी वाहिले. सुरवातीला सशस्त्र क्रांतीकारकांच्या प्रवाहात ते सामिल होते. मात्र पुढे ते महात्मा गांधीजींचे अनुयायी बनले. स्वातंत्र्य चळवळीच्या प्रसाराकरीता त्यांनी देशभर प्रवासही केला. अगदी अमेरिकेतील गदर पार्टीसोबत त्यांनी काहीकाळ व्यतित केला. त्याच काळात अमेरिकेत त्यांनी एम. ए. पूर्ण केले. अमेरिकेत असतानाच त्यांना फुफ्फुसाचा रोग झाला. त्यानंतर ते बुलडाणा येथे जावून राहीले. तेथेही काँग्रेसच्या सर्व चळवळींमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. Freedom fighters of Guhagar
ॲड. वामन तथा बाबासाहेब खरे
यांचे मुळगाव गुहागर मात्र त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1866 रोजी अहमदनगरला झाला. पुढे सखाराम खरे यांचे कुटुंब नाशिकला रहाण्यासाठी गेले. त्यांनी एल. एल. बी. पर्यंत शिक्षण पूर्ण केले. नाशिकमध्ये ते ॲड. बाबासाहेब खरे म्हणून परिचित होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारत या संघटनेचे सक्रीय सदस्य होते. अभिनवच्या कार्यकर्त्यांवर झालेल्या केसमध्ये वकिल म्हणून त्यांनी ब्रिटीश कोर्टात अनेक केस लढविल्या. परदेशी मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षण या चळवळींचे नेतृत्त्व ॲड. बाबासाहेब खरे यांनी केले. क्रांतिकारकांचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. नाशिकचे जिल्हाधिकारी जॅक्सन यांचा खून अनंत कान्हेरे या 18 वर्षांच्या तरुणाने नाशिकमध्ये केला. या हत्याकांडातील आरोपी म्हणून ॲड. बाबासाहेब खरेंना 1910 मध्ये अटक झाली. त्यांची वकिलीची सनद रद्द केली. संपती जप्त केली. 1914 पर्यंत ते तुरुंगात होते. 1928 मध्ये त्यांचे निधन झाले. Freedom fighters of Guhagar
मध्य भारतातील रायपूर येथे जन्मलेला श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे मुळगांव गुहागर तालुक्यातील अंजनवेल. असहकार आंदोलनात त्यांचा सहभाग होता. ज्ञानकोषकार म्हणून ते सुप्रसिद्ध होते.
गुहागर स्वातंत्र्यसैनिकांची अधिक बातमी वाचण्यासाठी इथे क्लिंक करा