बेंडल साहेबांचे विचार पुढील पिढीकडे प्रवाहीत झाले पाहिजेत – सुदाम घुमे
गुहागर, ता. 26 : त्यागी वृत्तीचे आदर्श लोकनेते, बहुजन समाजाच्या प्रगतीचा अखंड ध्यास घेतलेले समाज सुधारक, दीन दुबळ्यांसाठी अखेरच्या श्वासापर्यंत कार्य करणारे, बहुजनांच्या हृदयात “देवमाणसाचे” स्थान असलेले समाजनेते व गुहागर तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ बेंडल यांचा २८ वा स्मृतीदिन संत तुकाराम छात्रालय, गुहागर किर्तनवाडी येथे तालुक्यातील समाजबांधव व हितचिंतकांच्या उपस्थितीत पार पडला. Commemoration Day of Rambhau Bendal
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. चंद्रकांत पागडे यांनी केले. यावेळी रामभाऊ बेंडल प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुदाम घुमे, रामभाऊंचे सुपुत्र तथा गुहागर नगरपंचायतीचे नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल, रानवी पंचक्रोशी समितीचे अध्यक्ष महादेव साटले, मधुकर भागडे, प्रदीप बेंडल, गुहागर-असगोली कुणबी समाज संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भागडे, उपनगराध्यक्ष प्रणिता साटले, नगरसेविका सौ. स्नेहल रेवाळे, असगोली देवस्थान समितीचे सचिव गजानन धावडे यांच्या हस्ते स्व. रामभाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक प्रसाद बोले, माधव साटले, सुरेश बोले गुरुजी, असगोलीचे माजी सरपंच श्री. पांडुरंग उदेक, श्री. अनिल गोरीवले, सुभाष सोलकर, अजित बेंडल, अरुण भागडे, संतोष भागडे, जनार्दन भागडे, शंकर डिंगणकर, श्री. भुवड, अनंत घुमे, सुधाकर घुमे आदी उपस्थित होते. Commemoration Day of Rambhau Bendal
या स्मृतीदिनाच्या कार्यक्रमात स्व. रामभाऊंच्या आठवणींना उजाळा देताना नगराध्यक्ष राजेश बेंडल यांनी सांगितले की, साहेबांनी अनेक मोठ्या पदांवर काम केले. पण सत्ता केंद्र आपल्या हातात ठेवले नाही किंवा आपल्याच कुटुंबातील व्यक्तींना कधी राजकारणात आणले नाही. कारण जनसेवेचा लाभ माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला झाला पाहिजे असा त्यांचा दंडक होता. त्यांनी समाजातील कार्यकर्त्याला संधी मिळावी हा उद्देश ठेवला. परंतू आजचे राजकारण हे खूप वेगळे आहे, असे ते म्हणाले. Commemoration Day of Rambhau Bendal
प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुदाम घुमे यांनी म्हणाले, भावी पिढीकडे आशेच्या नजरेने बघताना रामभाऊंनी निर्माण केलेल्या संस्था अखंडितपणे कार्यरत ठेवण्यासाठी सर्वांचा सहभाग अपेक्षित आहे. आपल्या कार्यकाळात साहेबांनी असंख्य सहकारी जोडले. तसेच तरुणांना शिक्षकीपेशात आणून दुर्लक्षित असलेल्या समाजाला शिक्षित करण्यासाठी सामाजिक कार्यात सक्रिय करून घेतले. पुढील पिढी घडवणारे समाजातील शिक्षक हीच त्यांची खरी ताकद होती. आज २८ वर्षानंतरही त्यांच्या परोपकारी समाजसेवेने वेळीच समाजाला दिशा दिल्यामुळे आज समाज प्रगती पथावर आहे, याचे श्रेय त्यांच्या दूरदृष्टीला व अभ्यासू व्यक्तिमत्वाला जाते. त्यांच्या जनसेवेच्या कार्याने प्रेरीत होऊन तालुक्यातील असंख्य समाज बांधव आज समाज सेवेत कार्यरत आहेत. त्यांनी निर्माण केलेल्या संस्था सर्वांनी प्रयत्नपूर्वक जोपासना करणे गरजेचे आहे. त्यांचे विचार प्रवाहीत राहण्यासाठी प्रतिष्ठानची वास्तु उभी करण्यासाठी सामुदायिक प्रयत्न व्हायला हवेत, असे त्यांनी सांगितले. Commemoration Day of Rambhau Bendal
महादेव साटले यांनी विचार मांडताना, समाजातील तरुणांनी रामभाऊचा आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. तरुणांच्या माध्यमातूनच बेंडल साहेबांचे विचार समाजात खोलवर पोहोचतील असा आशावाद व्यक्त केला. तरुण पिढीमध्ये साहेबांच्या विचारांचे बीज रुजायला हवे. कठीण प्रसंगी समाज उभा करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान मोठे आहे. समाजातील प्रत्येक घटकाने रामभाऊंचे विचार अंमलात आणले तर तालुक्यात सामाजिक परिवर्तन करणे सहज शक्य आहे, असे ते म्हणाले. Commemoration Day of Rambhau Bendal
यावेळी कै. बेंडल यांना अभिवादन करताना त्यांचे सहकारी व समाजातील दिवंगत व्यक्ती व नागरिकांना सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. नगराध्यक्ष श्री. राजेश बेंडल यांच्याकडून छात्रालयातील विद्यार्थ्यांना वह्या व पेन वाटप करण्यात आले. श्री. अनिल गणपत गोरीवले यांनी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर प्युरीफायर देणगी दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत पागडे यांनी केली. Commemoration Day of Rambhau Bendal