दुरंगी लढतीत राजेश बेंडल यांचा कस लागणार
गुहागर, ता. 05 : विधानसभा मतदारसंघातील नऊ पैकी दोन उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले. आता निवडणूक रिंगणात सात उमेदवार आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेणाऱ्यांमध्ये आरपीआय आठवले गटाचे संदेश दयानंद मोहिते आणि भाजपचा राजीनामा देवून अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारे संतोष जैतापकर यांचा समावेश आहे. 7 candidates from Guhagar in the fray
गुहागर विधानसभा मतदारसंघातून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमोद सिताराम गांधी (रेल्वे इंजिन), उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे भास्कर भाऊराव जाधव (मशाल), शिवसेनेचे राजेश रामचंद्र बेंडल (धनुष्यबाण), या मान्यताप्राप्त पक्षांसह नोंदणीकृत राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमोद परशुराम आंब्रे (ऑटो रिक्शा), अपक्ष उमेदवार संदिप हरी फडकले (बॅट), मोहन रामचंद्र पवार (शिट्टी) आणि सुनिल सखाराम जाधव (अंगठी) हे सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 7 candidates from Guhagar in the fray
काल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी महायुतीतील घटक असलेले आरपीआयचे आठवले गटाचे अपक्ष उमेदवार संदेश दयानंद मोहिते व भाजपचे अपक्ष उमेदवार संतोष लक्ष्मण जैतापकर दोन्ही उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे आता गुहागर विधानसभा मतदारसंघातील लढत दुरंगी होणार हे स्पष्ट झाले आहे. मनसेचे प्रमोद गांधी हे महाविकास आघाडी आणि महायुतीसमोर आव्हान उभे करतील. गेली तीन वर्ष सातत्याने मनसे गुहागर विधानसभा मतदारसंघात विविध आंदोलने, उपक्रम करुन आपला मतदार तयार करत होते. प्रामुख्याने त्यांचे लक्ष्य नव मतदार आणि तरुणाईकडे आहे. या निवडणुकीत मनसेचा मताधार वाढलेला दिसेल हे निश्चित आहे. मात्र विजयासाठी आवश्यक असणाऱ्या मतांचा पल्ला ते कितपत गाठु शकतील याबाबत खात्री देता येत नाही. त्यामुळे विधानसभेची निवडणुक ही आमदार भास्कर जाधव विरुध्द राजेश बेंडल अशीच होईल. शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल याचा भर प्रामुख्याने समाजाच्या मतांवर राहील. भाजपची त्याला जोड मिळाल्याने ते आमदार भास्कर जाधव यांच्यासमोर आव्हान उभे करतील. 7 candidates from Guhagar in the fray
मात्र 9 विधानसभा लढविणारे आमदार भास्कर जाधव हे निवडणुकीतील डावपेचात नेहमीच वरचढ राहीले आहेत. त्यांच्या प्रचाराची कुठेही चर्चा होत नसली तरी मतदारांशी संपर्क सुरु आहे. त्यांनी या निवडणुकीची तयारीच लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरु केली होती. प्रत्येक बुथमधील मतदान, प्रत्येक बुथचे वैशिष्ट्य, मुंबईतील गाव कार्यकर्त्यांसोबत संपर्क, अल्पसंख्यांक मतदारांपर्यंत पोचण्याची स्वतंत्र यंत्रणा अशा वेगवेगळ्या स्तरावरुन आमदार जाधव यांची प्रचार मोहिम सुरु आहे. याउलट राजेश बेंडल यांच्या उमेदवारीचा निर्णय अखेरच्या क्षणापर्यंत ताणला गेला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रचाराची व्यवस्था आणि शिवसेनेच्या प्रचाराची व्यवस्था यामध्ये खूप अंतर आहे. 322 बुथपर्यंत पोचलेल्या भाजपाला सोबत घेताना त्यांच्याकडून होणाऱ्या प्रचाराचेही नेतृत्त्व उमेदवार म्हणून राजेश बेंडल यांनाच करायचे आहे. त्याचबरोबर समाजाच्या रचनेद्वारे आपल्या हक्क्याचा मतदारांपर्यंत पोचण्याचे कामही त्यांनाच करायचे आहे. त्यासाठी 15 दिवसांत तारेवरची कसरत करावी लागणार आहे. यामध्ये यशस्वी होवून विजयाची समीकरणे जुळवण्याचे काम राजेश बेंडल यांना करावे लागणार आहे. 7 candidates from Guhagar in the fray