अकरावीची केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सीबीएसई निकालानंतरच
पुणे, ता. 20 : गेल्या काही दिवसांपासून ठप्प असलेल्या अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील पुढील टप्पा सुरू करण्यात आला आहे. आतापर्यंत प्रवेश अर्जाचा भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम (प्रवेश अर्जाचा भाग दोन) नोंदवता येणार आहेत. मात्र प्रत्यक्ष प्रवेशासाठीचे वेळापत्रक केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावीच्या निकालानंतरच जाहीर करण्यात येणार असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने स्पष्ट केले. 11th Online Admission After CBSE Result
पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई महानगर क्षेत्र, नाशिक, अमरावती आणि नागपूर या महापालिका क्षेत्रात -अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबवली जाते. राज्य मंडळाने दहावीचा निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांना गुणपत्रिकाही मिळाली आहे. मात्र अन्य मंडळांचे निकाल प्रलंबित असल्याने अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया ठप्प आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेची प्रतीक्षा आहे. त्यामुळे वेळ वाचवण्यासाठी आता महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवण्याची सुरुवात करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी परिपत्रकाद्वारे दिली. 11th Online Admission After CBSE Result
https://11 thadmission. org. in या संकेतस्थळाद्वारे सुरू असलेली प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्याची प्रक्रिया या पुढेही सुरू राहील. प्रवेश अर्जाचा भाग एक भरलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदवता येतील. त्यात विद्यार्थ्यांना किमान एक ते कमाल दहा महाविद्यालयांसाठी पसंतीक्रम नोंदवता येईल. तसेच कोटाअंतर्गत प्रवेशासाठीही विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने पसंतीच्या महाविद्यालयात अर्ज करू शकतील. कोटाअंतर्गत प्रवेशासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची यादी विद्यार्थ्यांना दर्शवण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश घेणे सुलभ होईल. प्रवेश फेरीद्वारे महाविद्यालय अॅलॉटमेंट, मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करणे, आदी प्रक्रियेचे वेळापत्रक सीबीएसईच्या निकालानंतर जाहीर करण्यात येईल. सीबीएसईच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यास पुरेसा वेळ देऊनच प्रवेश फेरी सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. 11th Online Admission After CBSE Result