गेल्या 5-6 वर्षात रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील पर्यटनाला कातळशिल्पांचा नवा आयाम मिळाला आहे. जगातील 40 ते 50 हजार पर्यटकांनी कातळशिल्पांना भेट दिली आहे. आता तर रत्नागिरीतील उक्षीचा सडा, जांभरूण, राजापूरमधील बारसू व देवाचे गोठणे सडा, कशेळी, रुंढेतळी, देवीहसोळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील सुमारे 500 हून अधिक कातळशिल्पांना जागतिक मान्यता मिळण्यासाठीचा प्रस्ताव युनेस्कोकडे मार्च 2021 मध्ये भारत सरकारकडून गेला आहे. ही मान्यता मिळाल्यावर कोकणातील जागतिक पर्यटन अधिक वेगाने वाढणार आहे.
सुधीर रिसबुड, रत्नागिरी (कातळशिल्पांचे शोधकर्ते)
कातळ खोद चित्र म्हणजे काय?
कोकणातील जांभ्या दगडांच्या पठारांवर कोरून अथवा खोदून निर्माण केलेल्या चित्र रचनांना कातळ खोदचित्र किंवा कातळशिल्प असे म्हणतात. हा कला प्रकार पुरातत्वीय भाषेत पाषाणकला यात येतो. रॉक आर्ट प्रकारातील या कातळ खोद चित्र रचनांना शास्त्रीय भाषेत पेट्रोग्लीप्स् म्हणतात. मानवी इतिहासातील कलात्मक उत्क्रांतीचा प्राथमिक टप्पा म्हणून या कला प्रकाराकडे पाहिले जाते.
कोकणात आढळलेली कातळशिल्पे ही जगातील अन्य शिल्पांपेक्षा वेगळ्या धाटणीची, वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या शिल्पांचे आकार, कोरण्याची पद्धत ही आतापर्यंत भारतात किंवा जगभरात सापडलेल्या इतर चित्रांपेक्षा वेगळी वैशिष्ट्यपूर्ण आणि दुर्मिळ आहेत. त्यामुळेच त्यांना इतिहासात अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणात ज्या प्राण्यांचे अस्तित्व आढळून आलेले नाही, अशा प्राण्यांचे चित्रणदेखील या रचनांमध्ये आढळून येते.
अश्मयुगीन कातळ खोद चित्रे ही कोकणचा समृद्ध वारसा आहेत. मानवी उत्क्रांती, मानवी कलेचा इतिहास, त्यातील सौंदर्य आणि तत्कालीन भौगोलिक, पर्यावरणीय स्थिती समजून घेण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी कातळशिल्प पाहणे गरजेचे आहे. कोकणातील कातळशिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. जगाच्या पाठीवर आढळणाऱ्या शिल्पांपेक्षा येथे कला प्रकारातील सर्वोत्तम नमुने पाहावयास मिळतात, असा अभिप्राय परदेशी जाणकारांनी दिला आहे.
महाराष्ट्रात हा कलाप्रकार फक्त कोकणातच आढळतो. कोकणातील या रचनांचा आकार जगभरात इतर ठिकाणी सापडलेल्या रचनांपेक्षा बराच मोठा आहे. सर्वच्या सर्व रचना जमिनीवर आडव्या स्वरूपात आहेत. असा प्रकार जगभरात अभावाने पाहायला मिळतात. जगभरात आढळणाऱ्या अशा प्रकारच्या बहुतांशी चित्ररचना गुहांच्या भिंतीवर तसेच पाषाणांच्या उभ्या बाजूंवर निर्माण केल्या आहेत परंतु कोकणातील सर्वच्या सर्व चित्ररचना जमिनीवर (जांभा दगडाच्या पृष्ठभागावर) आडव्या स्वरूपात निर्माण केल्या आहेत. ही बाब कोकणातील शिल्पांचे एक वैशिष्ट्यपूर्ण वेगळेपण आहे.
कोकणात कुठे आहेत कातळशिल्पे
निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड, धनंजय मराठे व डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांनी सन 2012 पासून कातळ खोद चित्र- शोध, संशोधन, संरक्षण आणि संवर्धन मोहीम हाती घेतली. ते स्वखर्चाने ही मोहीम राबवत आहेत. आतापर्यंत रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात 72 गावातून 125 ठिकाणी सुमारे 1600 पेक्षा अधिक रचनांचा शोध घेतला. त्याचे उपलब्ध साहित्यात दस्तऐवजीकरणही केले.
1. उक्षीचा सडा : 35 अमूर्त चित्ररचना, हत्ती (लोकसहभागातून संरक्षित)
2. जांभरूण : 60 मनुष्याकृती, प्राणी, अमूर्त रचना
3. बारसू, देवाचे गोठणे सडा : 150 प्राणी चुंबकीय विस्थापन, अमूर्त रचना
4. कशेळी : 200 आशिया खंडातील मोठी रचना, जाती, उपजाती, गटातील पक्षी, प्राणी
5. रुंढेतळी : 50 अमूर्त रचना
6. देवीहसोळ : 60 वैशिष्ट्यपूर्ण चौकोनी उठावदार रचना, शिल्पपट
7. कुडोपी : 80 प्राणी, पक्षी, मोठ्या आकाराच्या रचना
ग्रामीण पर्यटनाला पुरक : कातळशिल्पे
वारसा पर्यटन, निसर्ग पर्यटन करणारा पर्यटक हा अधिक काळ मुक्काम करतो आणि अधिक खर्चही करतो, हे जागतिक निरीक्षण आहे. स्वाभाविकच कातळखोद चित्र पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. स्थानिक आर्थिक बाबींना मोठी चालना मिळेल. विदेशी चलन आपल्या देशात येऊ शकेल. पर्यायाने राज्याचे उत्त्पन्न मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होईल. पर्यावरणाचे नकळत संरक्षण होण्यास मदत होईल.
भौगोलिक, नैसर्गिक आणि सांस्कृतिक पर्यटनाला चालना देणारी ही शिल्पे आहेत. वारसास्थळे हे जगभरातील पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. कातळ शिल्पांमुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणी येऊ शकतील. त्याचा सर्वांगीण लाभ स्थानिक क्षेत्राला होऊ शकतो. कोकणातील एकंदर वारसा स्थळ पर्यटन क्षेत्राला चालना मिळेल. कातळशिल्पे ही सड्यांवर असून त्या माध्यमातून ग्रामीण पर्यटन विकासाला चालना मिळेल. स्थानिक खाद्य आणि कला संस्कृतीला उत्तेजन मिळून त्यातून रोजगार निर्माण होईल. वेगवेगळ्या ठिकाणी शिल्पे असल्याने स्थानिक वाहतूकदारांना व्यवसाय मिळेल. होम स्टे, शेती पर्यटनाला पूरक जोड होईल.
जल पर्यटन, साहसी खेळ यांना उत्तेजन, लहान-मोठे पर्यटनपूरक व्यवसाय ग्रामीण भागात निर्माण होऊ शकतील. सर्व कातळशिल्प रचनांची ठिकाणे उंच सड्यांवर आहेत. खुले आकाशदर्शनासाठी अगदी आदर्श अशा या जागा आहेत. त्याचा फायदा खगोल पर्यटनाला होईल.
जागतिक मान्यतेकडे कातळशिल्प
जागतिक वारसा म्हणून नामांकन मिळणे ही मोठी प्रक्रिया आहे. त्याकरिता सर्वतोपरी डॉक्युमेंटेशन करणे हे मोठे काम आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर युनेस्कोची टीम पाहणी करते आणि नंतर पुढच्या टप्प्यात त्यावर शिक्कामोर्तब होते.
कातळशिल्पांचा परिसर, तिथली जैवविविधता, संस्कृती या साऱ्या गोष्टींचा विचार करून पहिल्या टप्प्यात रत्नागिरीतील उक्षीचा सडा, जांभरूण, राजापूरमधील बारसू व देवाचे गोठणे सडा, कशेळी, रुंढेतळी, देवीहसोळ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडोपी येथील सुमारे 500 हून अधिक कातळशिल्पांचा समावेश आहे. कातळशिल्पांच्या परिसराला कोणताही धोका पोहोचलेला असता कामा नये, त्या ठिकाणाचे वैशिष्ट्य, जैवविविधता, लोकांचे राहणीमान, गावाची क्षमता, त्याचे व्यवस्थापन अशा विविध गोष्टींचा सुमारे 5 ते 10 हजार पानांच्या अहवालामध्ये समावेश आहे. हा अहवाल भारत सरकारकडून युनेस्कोकडे गेला आहे. नामांकन मिळण्याच्या प्रक्रियेसाठी काही कालावधी जावा लागेल, परंतु लवकरच नामांकन मिळावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
In the last 5-6 years, tourism in Ratnagiri and Sindhudurg districts has got a new dimension of carvings. 40 to 50 thousand tourists from all over the world have visited the Rock Art. In March 2021, the Government of India has submitted a proposal to the UNESCO for global recognition of more than 500 carvings at Ukshi Sada in Ratnagiri, Jambharun, Barsu in Rajapur and Gothane Sada in Godavari, Kasheli, Rundhetali, Devihasol and Kudopi in Sindhudurg district. These rock art, carving, stone art in archeological forms are called petroglyphs in the classical language. This type of art is seen as the primary stage of artistic evolution in human history. Tourist attract towards Heritage, Nature Places They stays longer time and spends more money. This is a Global observation. Therefore various employment opportunities will be available through Rock art, carving, stone art tourism in Konkan. With UNESCO recognition, global tourism in Konkan will grow faster.