शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाची दिली माहिती
गुहागर, ता. 03 : कृषी दिनाचे निमित्ताने खरवते दहिवली येथील शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळाचे उद्घाटन सरपंच सौ. समिक्षा बारगोडे यांच्या हस्ते करण्यात आले. Workshop on Agriculture Day in Velamb
उद्यानविद्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना ग्रामीण बागायती कामाचा अनुभव (रावे) अंतर्गत थेट शेतकऱ्यांपर्यंत पोचून त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, शेतीमध्ये नवीन उपक्रम राबविणे अशा अभ्यासक्रमीय कामांसाठी विविध गावात जावे लागते. शरदचंद्र पवार उद्यानविद्या महाविद्यालयातील विवेक शेळके, कुशल गीते, अथर्व कोल्हे, कृष्णा रहांगडाले, आदित्य कोळी, यश सातपुते हे विद्यार्थी सध्या वेळंबमध्ये 2 महिने रावेअंतर्गत कार्यरत आहेत. हे विद्यार्थी वेळंबमधील शेतकऱ्यांना भेटून शेतीमधील आधुनिक तंत्रज्ञान, नव्या पध्दतीने लागवड, खत वापर, रोग नियंत्रण याविषयी माहिती देत आहेत. तसेच शेतात जावून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत आहेत. Workshop on Agriculture Day in Velamb


कृषी दिनाचे औचित्य साधून या विद्यार्थ्यांनी वेळंब मध्ये शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत हळद लागवडीपूर्वी कांद्याला किड लागू नये, वाळवी लागू नये म्हणून औषधी पाण्यात कांदे कसे ठेवावेत, झेंडूची लागवड कशी करावी, सेंद्रिय खतांचा वापर कसा करावा आदी बाबत मार्गदर्शन केले. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी देखील या कार्यशाळेत आपले अनुभव सांगितले. Workshop on Agriculture Day in Velamb


या कार्यशाळेचे उद्घाटन वेळंबच्या सरपंच सौ. समिक्षा बारगोडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच श्रीकांत मोरे, ग्रामपंचायत सदस्या सौ. जयश्री जाधव, ग्रामविकास अधिकारी भरत घेवडे आणि वेळंब मधील शेतकरी, ग्रामस्थ उपस्थित होते. कृषी दिनानिमित्त यावेळी फळझाडे, फुलझाडे व जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमासाठी महाविद्यालयचे प्राचार्य सुनिलकुमार पाटील व प्राध्यापक महेश घाणेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. Workshop on Agriculture Day in Velamb