मंत्री सामंत व खासदार राऊत यांनी केली रुग्णालयाची पहाणी
गुहागर, ता. 31 : निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर काळात जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होवू शकतो. त्यासाठी रुग्णालयाची पहाणी केली. ते कसं सुरु करायच हे लक्षात घेण्यासाठी आरजीपीपीएलचे अधिकारी, शासकिय अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली आहे. आजच्या दौऱ्यातून चांगल्या पध्दतीचे काही निर्णय होतील असा प्रयत्न आम्ही करणार आहोत. अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
(Maharashtra Government Higher & Technical Education Minister Uday Samant, MP Vinayak Raut, Ratnagiri District Collector Laxminarayan Mishra Visited Niramay Hospital on Sunday 30th May.)
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज गुहागर तालुक्यातील रानवी येथील बंद अवस्थेत असलेल्या निरामय रुग्णालयाची पहाणी केली. पहाणी नंतर चिपळूणचे उपविभागीय अधिकारी प्रविण पवार यांनी निरामयच्या मालकीबाबत माहिती दिली. प्रविण पवार यांनी सांगितले की, सध्या ही जागा तांत्रिकदृष्ट्या ट्रस्टकडे आहे. ज्या हेतूसाठी एमआयडीसीने जागा वापरण्यास दिली तो हेतू साध्य होत नसल्याने एमआयडीसी ही जमीन ताब्यात घेवू शकते. त्यासाठी एमआयडीसीकडे सदर जागेची मागणी करणारा प्रस्ताव पाठविण्याची गरज होती. तो प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेला आहे. आता कायदेशीर बाबींची पूर्तता करुन एमआयडीसी ही जागा स्वत:च्या ताब्यात घेईल. त्यानंतर एमआयडीसी या जागेचे हस्तांतरण जिल्हा शल्य चिकित्सकांकडे करेल. मात्र त्यासाठी एमआयडीसी स्तरावरुन जागा ताब्यात घेण्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे.
आरजीपीपीएलच्या निवासी संकुलातील विश्रामगृहात सामंत व राऊत यांनी अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मंत्री सामंत म्हणाले की, गुहागरमधील दाभोळ वीज कंपनीच्या कार्यकाळात बांधण्यात आलेल्या व गेली 20 वर्ष बंद असलेल्या निरामय रुग्णालयाची नक्की परिस्थिती काय आहे त्याची माहिती घेण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला व राऊत यांना केली होती. त्याप्रमाणे आज इमारतीची पहाणी केली. इमारत सुस्थितीत आहे. ही इमारत सध्या कोणाच्या ताब्यात आहे, कशापध्दतीने शासनाच्या ताब्यात घ्यायची, रुग्णालय कसे सुरु करता येईल, याबाबतची चर्चा आरजीपीपीएलचे अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्याबरोबर केली आहे. निरामय रुग्णालय कायमस्वरुपी सुरु झाले तर मोठी उपलब्धी असेल. गुहागरसह अन्य तालुक्यांसाठी सोयीचे रुग्णालय होईल. कोविड संकटात रुग्णालय सुरु करता आले तर आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल. याबाबतचे निर्णय लवकरात लवकर घेतले जातील. आजच्या दौऱ्यातून चांगले काही तरी होईल अशी आशा आहे.
यावेळी गुहागरच्या तहसीलदार सौ. लता धोत्रे, गटविकास अधिकारी डॉ. अमोल भोसले, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जांगीड, गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी कविता बोरकर, अन्य प्रशासकीय अधिकारी, गुहागर तालुका युवा सेना अधिकारी अमरदिप परचुरे आदी उपस्थित होते.
निरामयची अंतर्गत व्यवस्था सुस्थित
गेली 20 वर्ष बंद असलेल्या निरामय रुग्णालयातील अनेक व्यवस्था आजही सुस्थितीत आहे. इमारतीचे बांधकामासह दरवाजे, खिडक्या, फर्निचर यांची गुणवत्ता उत्तम असल्याने कुठेही मोडतोड झालेली नाही. संपूर्ण इमारतीची साफसफाई झाली, रुग्णालयांतर्गत फिरवलेल्या ऑक्सिजन वाहिन्या, अग्नीशमन व्यवस्था, जलवाहिन्या, वीजवाहिन्यांची तपासणी केली तर कमी वेळात व तुलनेत कमी खर्चात हे रुग्णालय पुन्हा कार्यान्वित करणे शक्य असल्याचे आजच्या पहाणीत समोर आले.
निरामयच्या मालकीचा गुंता
दाभोळ वीज प्रकल्प सुरु झाला तेव्हा दाभोळ पॉवर चॅरिटेबल ट्रस्ट सुरु झाला. या ट्रस्टद्वारे निरामय रुग्णालय असलेली ५ एकरची जागा ट्रस्टने विकसीत केली. दाभोळ वीज कंपनी बंद पडल्यानंतर या ट्रस्टतर्फे सुरु असणारे निरामय रुग्णालयही बंद पडले. पुढे दाभोळ वीज प्रकल्पाची सर्व जागा कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात गेली. हा वीज प्रकल्प पुन्हा सुरु करण्याचा निर्णय केंद्राने घेतला त्यावेळी ही सर्व मालमत्ता आरजीपीपीएल या नव्या कंपनीच्या स्वाधिन करण्यात येणार होती. मात्र मुळातच बंद असलेला प्रकल्प सुरु करणे खर्चिक असल्याने आरजीपीपीएलने केवळ प्रकल्प आणि निवासी वसाहत ताब्यात घेतली. दाभोळ पॉवर चॅरिटेबल ट्रस्टच्या ताब्यात असलेल्या मालमत्ता निर्णयाविना तशीच राहील. या जागेचा सातबारा एमआयडीसीच्या नावाने आहे. तर मालमत्तेचा अधिकार विकासक म्हणून दाभोळ पॉवर चॅरिटेबल ट्रस्टकडे आहे. हा गुंता सोडविण्यासाठी प्रशासकीय स्तरावर हालचाली सुरु आहेत.

