व्याडेश्र्वर देवस्थान : कोरोनाची त्रिसुत्री बंधनकारक
गुहागर, ता. 10 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यामुळे गुहागर शहरातील श्री देव व्याडेश्र्वर (Vyadeshwar) देवस्थानमध्ये होणारा उत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे. मात्र महाशिवरात्रीचे (Mahashivratra) दिवशी भक्तांना सामाजिक अंतर (Social Distance), मास्क (Mask) आणि सॅनिटायझर (sanitizer) ही कोरोनाची त्रिसुत्री पाळून व्याडेश्र्वर महाराजांचे दर्शन घेता येईल. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे यांनी दिली आहे.
दरवर्षी श्री देव व्याडेश्र्वर देवस्थानचा महाशिवरात्रीचा उत्सव म्हणजे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी असते. संगीत, भजन, किर्तन, नाटक, लोककला यासोबत समाजाला संदेश देणारे कार्यक्रम यानिमित्ताने व्याडेश्र्वर देवस्थान आयोजीत करत असते. गेल्यावर्षी पर्यटन उद्योगाला चालना मिळावी म्हणून व्याडेश्र्वर देवस्थानने व्याडेश्र्वर महोत्सवाचे आयोजन केले होते. मात्र यावर्षी कोरोनाच्या पुन्हा वाढलेल्या प्रादुर्भावामुळे महाशिवरात्रीच्या उत्सवावर अनेक बंधने आली आहेत.
याबद्दल माहिती देताना देवस्थानचे अध्यक्ष अरुण परचुरे म्हणाले की, यावर्षी सांस्कृतिक कार्यक्रम (cultural activity) होणार नाहीत. धार्मिक कार्यक्रमांमध्ये रात्री निघणारी श्रींची पालखी मिरवणूकही रद्द करण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी व्यक्तिगत पुजाही होणार नाहीत. असे असले तरी महाशिवरात्र असल्याने देवस्थानतर्फे षोडशोपचारी पूजा, रुद्राभिषक हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत दर्शनासाठी मंदिर खुले ठेवण्यात येणार आहे. मंदिराच्या प्राकारात दर्शनासाठी रांगेत उभे रहावे लागले. तोंडावर मास्क असलेल्या भक्तांनाच मंदिरात प्रवेश दिला जाईल. सामाजिक अंतराचे भान ठेवून भक्तांना रांगेत उभे रहावे लागेल. सॅनिटायझरने हात धुतल्यानंतरच भक्तांना सभागृहात प्रवेश मिळेल. दर्शन घेतल्यानंतर भक्तांना मंदिरात थांबता येणार नाही. असे नियम आखून आम्ही सर्व भक्तांना श्री व्याडेश्र्वर महाराजांचे दर्शन घेण्यास परवानगी दिली आहे.