गुहागर, ता. 28 : भारत निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेत 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. Voter List Revision Campaign
दि. 30 जून ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांनी घराघरांत जाऊन मतदारांची पडताळणी, माहिती संकलन आणि मतदार यादीचे अद्ययावतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. 265 चिपळूण विधानसभा मतदारसंघात चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांतील एकूण 336 मतदान केंद्रांचा समावेश असून मतदारसंघातील एकूण मतदारसंख्या 2 लाख 71 हजार 433 आहे. यामध्ये 1 लाख 38 हजार 675 महिला तर 1 लाख 32 हजार 758 पुरुष मतदारांचा समावेश आहे. रत्नागिरी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश सदाशिव लिगाडे यांच्या नेतृत्वाखाली हे पुनरिक्षणाचे काम पूर्ण करण्यात आले. Voter List Revision Campaign
या मोहिमेत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), तहसील प्रशासन, महसूल विभाग, ग्राम महसूल अधिकारी, शिक्षक, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, पोलीस पाटील, तसेच विविध शासकीय विभागांतील अधिकारी-कर्मचारी, संकलन पथक आणि आयटी टीम यांनी मोलाचे योगदान दिले. या मोहिमेत आतापर्यंत 2 लाख 45 हजार 487 म्हणजेच 90.44 टक्के निवडणूक फॉर्म (EF) डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. तर 25 हजार 946 (9.56 टक्के) फॉर्म अद्याप मिळू शकले नसल्याची नोंद आहे. तसेच 7 हजार 583 (2.79 टक्के) मतदारांची मॅपिंग प्रक्रिया पूर्ण होणे बाकी आहे. दरम्यान, 27 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत न मिळालेल्या फॉर्मची फेरपडताळणी (Reverification), मॅपिंग न झालेल्या मतदारांचे मॅपिंग, विविध त्रुटी दूर करणे तसेच डिजिटायझेशन झालेल्या नोंदींची तपासणी अशी पुढील प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. Voter List Revision Campaign