गणेशोत्सवात होत आहे स्थानिक रहीवाशांची अडचण
गुहागर, ता. 11 : आठवडाभरापूर्वी कोसळलेल्या धो-धो पावसाने वेलदूर – नवानगर -धोपावे मार्गावर दरड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. पहिल्यांदा कोसळलेली दरड सार्वजनिक बांधकाम विभागाने दूर केली. मात्र दुसऱ्यांदा त्याच ठिकाणी दरड कोसळली. त्यामुळे हा रस्ताच वहातूकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे वेलदूरमधुन नवानगर आणि धोपावे कडे जाणाऱ्या स्थानिक ग्रामस्थांना ऐन गणेशोत्सवात रानवीमार्गे मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे. Veldur – Navanagar – Dhopave Road is Closed Due to Land Slide.


गुहागर तालुक्यात दि. 6 सप्टेंबर रोजी पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. नदी नाल्यांना पूर आल्याने अनेकांच्या घरात, शेतीमध्ये पुराचे पाणी शिरण्याचे प्रकार घडले. रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. याचवेळी वेलदूर – नवानगर – धोपावे फेरीबोट जेटीकडे जाणाऱ्या मार्गावर अतिवृष्टीने मोठी दरड कोसळून मार्ग पूर्णपणे बंद झाला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ ही दरड दूर केली. मात्र 7 सप्टेंबरला पुन्हा त्याच ठिकाणी दरड कोसळली. तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, सार्वजनिक बांधकामचे अभियंता निजसुरे यांनी दरड कोसळलेल्या ठिकाणी जावून पहाणी केली. त्यावेळी पुन्हा मुसळधार पाऊस कोसळला तर पुन्हा दरड पडेल अशी परिस्थिती निदर्शनास आली. त्यामुळे सदरचा रस्ता वहातूकीस बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरने घेतला.


मात्र हा रस्ता बंद झाल्याने फेरीबोटीकडे जाणाऱ्या प्रवाशांबरोबरच वेलदूर, नवानगर आणि धोपावेतील स्थानिक रहिवाशांचीही मोठी अडचण झाली आहे.
सध्या गणेशोत्सव सुरु आहे. वेलदूर, नवानगर आणि धोपावे ही गावे एकमेकांला जोडलेली असल्याने अनेकांचे नातेवाईक या तीन गावात रहातात. सहाजिकच गणेशोत्सवामध्ये गणपतीचे दर्शन घेण्याकरीता, गौरी हौसतात त्यादिवशी या तिनही गावातील मंडळींचे एकमेकांच्या घरी सातत्याने जाणे येणे असते. मंगळवार, 7 सप्टेंबर पडलेली दरड दूर न करता, सार्वजनिक बांधकामने रस्ता बंद केल्याने या स्थानिक ग्रामस्थांची मोठी अडचण झाली आहे. किमान दुचाकी जाईल एवढा रस्ता तरी सणाच्या दिवसात सुरु ठेवाव. अशी या स्थानिक रहिवाशांची मागणी आहे.

