वेगाने तपास करत पोलीसांनी दोघांना पकडले
गुहागर, ता. 30 : तालुक्यातील झोंबडी गावातील दुकान 29 सप्टेंबरला रात्री अज्ञान चोरट्यांनी फोडले. दुकानातील रोख रक्कम 30 हजार चोरीला गेली. अशी तक्रार दुकान मालक अनंत लांजेकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात केली. त्यानंतर अवघ्या दोन तासांत गुहागर पोलीसांनी चोरीचा तपास करत दोन स्थानिकांना ताब्यात घेतले आहे. वेगाने तपास केल्याबद्दल गुहागर पोलीसांचे तालुकावासीयांनी अभिनंदन केले आहे.
In Zombdi (taluka Guhagar)Thieves breaks shop & stolen cash. But Guhagar police have arrested two locals while investigating the theft in just two hours.
गुहागर तालुक्यातील झोंबडी गावातील कारकर वाडीजवळ वेद बारच्या समोर काळभैरव जनरल स्टोअर हे छोटेसे दुकान आहे. हे दुकान झोंबडीचे सरपंच अतुल लांजेकर यांचे वडील अनंत लांजेकर यांच्या मालकीचे आहे. बुधवारी (ता. 29 सप्टेंबरला) सायंकाळी दुकान बंद करून अनंत लांजेकर घरी गेले. गुरुवारी (ता. 30 सप्टेंबरला) सकाळी नेहमीप्रमाणे दुकान उघडण्यासाठी लांजेकर आले. त्यावेळी दरवाजाचे कुलुप उघडे दिले. हे पाहून त्यांच्या मनात शंका आली. सावधपणे त्यांनी दुकान उघडले. त्यावेळी दुकानातील सामान विखुरलेले दिसले. दुकानातील पैसे ठेवायच्या कप्प्यातील रु. 30 हजार चोरीला गेल्याचेही त्यांच्या लक्षात आले. बुधवार (29 सप्टेंबर) सायंकाळ पासून गुरुवार (30 सप्टेंबर) सकाळपर्यंतच्या कालावधीत ही घटना घडली. चोरट्यांनी दुकानाचे कुलूप व कडी कोयंडे उचकुटून दुकान प्रवेश केला होता. तातडीने अनंत लांजेकर यांनी गुहागर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
गुहागर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक बी. के. जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पहाणी केली असता सदर चोरी स्थानिक भुरट्या चोरांनी केली असावी असा संशय पोलीसांना आला. तातडीने बी. के. जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार हनुमंत नलावडे, पोलीस हेडकॉन्स्टेबल राजु कांबळे, प्रितेश रहाटे, वैभव चौगुले आदींनी तपासाला सुरवात केली. अवघ्या दोन तासांत पोलीसांनी स्थानिक भुरट्या चोरांच्या मुसक्या आवळल्या. पोलीसी खाक्या दाखवताच चोरट्यांनी गुन्हा कबुल केला आहे.
गेल्या 6 दिवसांत दोन बेपत्ता मुलींच्या शोधासह दोन भुरट्या चोरांना पकडण्याच गुहागर पोलीसांना यश आले आहे. याबद्दल तालुकावासीयांनी गुहागर पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
संबंधित बातम्या :
24 तासांत शोधला बेपत्ता तरुणीचा पत्ता
बेपत्ता तरुणीचा शोध घेण्यात दुसऱ्यांदा यश