कोतळूक मधील घटना, अडीच लाखांचे नुकसान
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील कोतळूक बौद्धवाडी येथील एक दुकान जेसीबी लावून पाडण्यात आले. यामध्ये दुकान आणि त्यामधील किराणा मालाचे 2 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात दुकान मालक संदिप तुकाराम मोहिते (वय 55, रा. कोतळूक बौध्दवाडी) यांनी गुहागर पोलीस ठाण्यात 20 ऑगस्टला रात्री 11.30 वाजता तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन कोतळूक बौद्धवाडीतील तिघांवर तसेच जेसीबी चालकावर पोलीसांनी गुन्हा नोंदवला आहे. (A shop demolished by JCB in Kotluk without any intimation. Therefore The shop and the groceries of Rs 2 lakh 50 thousand in it have lossed. Shopkeeper Sandip Mohite register complaint in Guhagar Police Station.


संदिप तुकाराम मोहिते यांचे कोतळूक बौध्दवाडीमध्ये शृंगारतळी आबलोली रस्त्यालगत भीम उपकार नावाने जनरल स्टोअर्स चालवतात. 19 ऑगस्टला सकाळी 8.30 च्या दरम्यान संदिप आणि सौ. संचिता संदिप मोहिते घर असताना पत्र्याचा आवाज झाला. आवाज कुठून येतो हे पहाण्यासाठी ते घराबाहेर पडले त्यावेळी कोतळूक बौध्दवाडीतील ग्रामपंचायत घर क्र. 961 या ठिकाणी असलेले त्यांच्या मालकीचे दुकान जेसीबीने तोडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. संदिप आणि संचिता ही दोघं घटनास्थळी पोचली तेव्हा सुगनदास बुधाजी मोहिते, गितेश सुगनदास मोहिते आणि प्रविण सुगनदास मोहिते (सर्व राहणार कोतळूक बौध्दवाडी) यांच्या निर्देशाप्रमाणे जेसीबी चालवला जात होता. संदिप आण संचिता यांनी दुकान तोडण्याला विरोध केला. तेव्हा सुगनदार, गितेश आणि प्रविण या तिघांनी शिवीगाळी केली. दमदाटी करत मारहाण केली. जेसीबी चालकाने हे काम याच तिघांच्या सांगण्यावरुन करत असल्याचे सांगितले. या घटनेमध्ये दुकानासह किराणा मालाचे सुमारे 2 लाख 50 हजाराचे नुकसान झाले आहे. अशी तक्रार संदिप मोहिते यांनी पोलीस ठाण्यात केली.
या तक्रारीवरुन गुहागर पोलीसांनी सुगनदास बुधाजी मोहिते, गितेश सुगनदास मोहिते आणि प्रविण सुगनदास मोहिते आणि जेसीबी चालकावर गुन्हा नोंदवला आहे.
कोतळूक गावातून मिळालेल्या माहितीनुसार संदिप तुकाराम मोहिते यांचे भीम उपकार हे दुकान सुगनदास यांच्या जागेत आहे. गेली अनेक वर्ष याच ठिकाणी दुकान सुरु होते. या दुकानाची नोंद ग्रामपंचायतीमध्ये असून त्याचा कर देखील संदिप मोहिते भरत आहेत. तसेच या ठिकाणी दुकान चालवण्यासंदर्भात ग्रामपंचायतीकडे जागा मालकाची परवानगी देखील आहे. मार्च 2021 मध्ये संदिप मोहिते यांचे वडिल तुकाराम मोहिते यांचे निधन झाले. त्यानंतर जागा मालकाने दुकानाची जागा खाली करुन देण्यासाठी संदिप मोहिते यांचेकडे तगादा लावला होता. फिर्यादी आणि आरोपी दोघांची घरेही कोतळूक बौध्दवाडीत लगत आहेत. त्यामुळे दुकानाच्या विषयावरुन गेले पाच महिने धुसफुस सुरु होती.