गुहागर तालुकावासीयांकडून प्रवृत्तीचा निषेध
गुहागर, ता. 16 : नवजात अर्भकाला खाजणात टाकून देण्याच्या घटनेचा गुहागर तालुकावासीयांनी निषेध व्यक्त केला आहे. एका मातेला हे कृत्य करायला लावणारी प्रवृत्ती चुकीची आहे. अनैतिकेची किड सर्व समाजांनीच ठेचली पाहिजे. अशा शब्दांत समाजातून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाची स्थिती नाजूक असल्याचे विश्र्वसनीय वृत्त आहे.
14 ऑगस्टला घडलेल्या घटनेबाबत गुहागर तालुक्यातून अनेकजणांनी निषेध व्यक्त केला आहे. गुहागर न्यूजच्या पत्रकारांशी संपर्क साधून अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शिवसेना महिला आघाडी प्रमुख सौ. पारिजात कांबळे म्हणाल्या की, बाळाला त्याची आईच टाकून देते. हे अत्यंत वेदनादायी घटना आहे. भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्ष श्रद्धा घाडे म्हणाल्या की, एका आईवर ही वेळ आणणाऱ्या वृत्तीच आम्ही निषेध करतो. राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजेंद्र आरेकर म्हणाले की, नैतिकतेचा ऱ्हास होत असल्याचे हे द्योतक आहे. समाजाने ही अनैतिकतेची वृत्ती संपवली पाहिजे.
दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाळाची प्रकृती नाजूक आहे. सदर बाळाची प्रसुती 32 ते 33 आठवड्यांनी झाली असावी. असा अंदाज आहे. फुफ्फुसे, मेंदू, मणका आदी अवयवांचा होणार विकास झालेला नाही. त्यामुळे सदर बाळाला 16 ऑगस्टला सायंकाळी 5 च्या दरम्यान अधिक सोयी असलेल्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अशी माहिती विश्र्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे.
धोपावे तरीबंदर येथे सापडलेल्या नवजात अर्भकाला टाकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गुहागर पोलीसांनी कंबर कसली आहे. तालुक्यातील सामाजिक माध्यमांवर एक संदेश प्रसारित केला जात आहे. त्यामध्ये गुहागर पोलीस ठाणे हद्दीतील धोपावे फेरीबोट जेटीचे ठिकाणी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने एक नुकतेच जन्मलेले बाळ टाकलेले आहे. सदर बाळाच्या आईबद्द्ल काही माहिती मिळताच तात्काळ गुहागर पोलीस ठाणे येथे कळवावी. माहिती सांगणा-याचे नाव गुपित ठेवण्यात येईल. तसेच त्यास उचित बक्षिस देण्यात येईल. असा मजकुर आहे. माहिती देण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक साळोखे, उपनिरीक्षक दिपक कदम आणि पोलीस नाईक संतोष साळस्कर यांचे मोबाईल क्रमांकही देण्यात आले आहेत. याशिवाय धोपावे व दाभोळ फेरीबोट परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करणे, स्थानिक ग्रामस्थांकडे चौकशी करणे अशा विविध बाजुने तपास वेगाने सुरु आहे.