अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून सुखाच्या दिवसांकडे सुरु झालेला रमेशचा जीवनप्रवास वयाच्या 41 व्या वर्षी एका अपघाताने थांबवला. ज्युदो खेळ प्रकारात आंतरराष्ट्रीय झेप घेणाऱ्या या गुणवान खेळाडूने आपल्यासारखे अनेक खेळाडू गुहागर तालुक्यातून घडावेत असे स्वप्न पाहिले. समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्याची धडपड होती. पण हे सारं क्षणार्धात संपल.
लेखक : निलेश गोयथळे, क्रीडा शिक्षण
रमेश पालशेतकर म्हणजे नेहमी चेहऱ्यावर हसू असलेले व्यक्तिमत्त्व होते. एखाद्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाल्यावर त्याच्या सुखदु:खात खांद्याला खांदा लावून उभा रहाणारा रमेश अनेकांनी अनुभवाला आहे. हेदवीमधील हेदवकर विद्यालयात 2009 पासून क्रीडाशिक्षक म्हणून नोकरी करणारा रमेश पालशेतकर शालेय जीवनापासूनच उत्तम खेळाडू होता. रत्नागिरी जिल्हा जुडो संघटनेचा सचिव म्हणून तो कार्यरत होता. शालेय जीवनात असताना माझ्याच मार्गदर्शनाखाली ज्युडोपटु म्हणून तो तयार झाला. या क्रीडाप्रकारात जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने यश मिळवले. नेपाळमध्ये खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत त्यांने पदक मिळवले होते. गुहागर तालुक्याचे नांव आंतराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या खेळांडुंमध्ये रमेश पालशेतकरची गणना झाली. केवळ स्वत:चा खेळ त्याने विकसीत केला नाही तर तालुक्यातील अनेकांना ज्युदो खेळाचे प्रशिक्षण दिले. ज्युदो क्रीडाप्रकाराबरोबर त्याचं अतूट नातं राहीलं. जीवनात स्थीर होण्यासाठी त्याला बीपीएड करण्याचा सल्ला दिला. हा सल्ला मानून रमेश बीपीएड झाला आणि हेदवी विद्यालयात क्रीडाशिक्षक म्हणून नोकरी लागला. त्यानंतरही ज्युदो प्रशिक्षक, पंच म्हणून तो कार्यरत होता. ज्युदो स्पर्धांचे यशस्वी नियोजन करणे हा त्याचा हातखंड्याचा विषय बनला होता.
आपली नोकरी व स्पर्धांमध्येच गुंतून न राहता असगोली गावाच्या सामाजिक व विकासामध्ये भरीव योगदान देत असे. गावातील प्रत्येक उपक्रमांमध्ये त्याचा सिंहाचा वाटा असायचा. नाटकात तळमळीने काम करणारा कलाकार म्हणून त्याची ओळख होती. हनुमान जयंतीला असगोलीत गादीवाला नाट्यमंडळातर्फे अनेक नाटकांमध्ये त्याने काम केले आहे. शिकलेला, देशाटन केलेला रमेशवर असगोलीतील खारवी समाजाचा गाढा विश्र्वास होता. विविध विषयांमध्ये मार्गदर्शन करणे, समाजाच्या कार्यकमांचे नियोजन करणे आदी गोष्टींमध्ये रमेशचा पुढाकार होता. असगोलीमध्ये सध्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोध्दार करण्याची तयारी सुरु आहे. या कामातही रमेश पालशेतकरवर गावाने जबाबदारी टाकली होती. खारवी समाज संघटनेमध्ये हिरारीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे. या सन्मानामुळे तो कधी गर्वीत झाला नाही. विनम्र भावनेने सर्वांना सोबत घेवून जाण्यासाठी तो आग्रही असे.
रमेशचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई – वडील, एक भाऊ व दोन बहिणी आहेत. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रमेशने आपली कौटुंबिक जबाबदारीही ओळखली होती. भाऊ अनेक वर्षे आजारी होता. त्याच्याकडे लक्ष देत त्याला पूर्णपणे बरे करण्यासाठी रमेशने मेहनत घेतली. रमेशच्या प्रत्येक कामात पत्नीची मोलाची साथ लाभत असे.
उत्तम खेळाडू, क्रीडाप्रशिक्षक, नाट्यकर्मी, सामाजिक भान असलेला तरुण, तडफदार कार्यकर्ता, कुटुंबाचा आधार अशा विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या रमेशची ही जीवनाच्या रंगमंचावरील अकल्पित एक्झिट मन सुन्न करणारी आहे.