स्वरूप योगिनी पुरस्कारांचे वितरण
रत्नागिरी- स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) तर्फे वरची आळी येथील अध्यात्म मंदिरात उद्यापासून (ता. ७) स्वामी स्वरूपानंद व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कृषी उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर, बचत गटांच्या प्रवर्तक सौ. नेहा जोशी-करंदीकर आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा शिल्पाताई पटवर्धन यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. Swami Swaroopananda Seva Mandal (Pawas, Ratnagiri) has organized Swami Swaroopananda Lecture Series from tomorrow (Tuesday 7) at Adhyatma Mandir at Varchi Ali. On the occasion of the nectar anniversary of Indian independence, Mrs. Sampada Joglekar, the promoter of self help groups. Neha Joshi-Karandikar and retired headmistress Mrs. Sheetal Kale will be honored with Swaroop Yogini Award. The award will be presented by Shilpatai Patwardhan, President of the Society.


रत्नागिरी वरची आळी येथील अध्यात्म मंदिरामध्ये ७ ते ९ ऑक्टोबर या दरम्यान दररोज सायंकाळी ५.३० ते ७.३०या वेळेत व्याख्यानमाला व सत्कार समारंभ होणार आहे.
उद्या पहिल्या दिवशी (ता. ७) श्री सूक्त यावर प्रवचनकार किरण जोशी यांचे व्याख्यान होईल. या कार्यक्रमात विशेष उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अभिनेत्री तथा शेती, पर्यटन उद्योजिका सौ. संपदा जोगळेकर (फुणगूस, ता. संगमेश्वर) यांना स्वरूप योगिनी पुरस्कार देऊन गौरवण्यात येईल.
८ ऑक्टोबरला महाभारतातील क्रांतीकारक स्त्रिया या विषयावर प्रवचनकार श्रीमती भाग्यश्री पटवर्धन व्याख्यान देतील. त्यानंतर शैक्षणिक, समाजप्रबोधन व बचत गटांच्या स्थापनेने स्त्रियांना आर्थिक बळ देणाऱ्या देवरुखच्या सौ. नेहा जोशी करंदीकर यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
समारोपाच्या दिवशी ९ ऑक्टोबरला वेदातील ऋचिका (कवयित्री) यावर प्रवचनकार डॉ. कल्पना आठल्ये व्याख्यान देणार आहेत. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कृ. चिं. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरच्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका सौ. शीतल काळे यांना स्वरूप योगिनी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
कोरोनाविषयक नियम पाळून तीनही दिवस कार्यक्रम आयोजित केला आहे. नागरिकांनी सर्व नियम पाळावेत, असे आवाहन मंडळाने केले आहे. कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस या युट्यूब चॅनेलवर या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या ज्येष्ठ नागरिक, महिलांना कार्यक्रमाला येणे शक्य होणार नाही, त्यांना त्यावर कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल.