राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंनी केली नियुक्ती
गुहागर, ता. 26 : राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप असा प्रवास करुन 11 वर्षांनंतर पुन्हा एकदा गुहागरचे माजी उपसभापती सुरेश सावंत यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा झेंडा हाती घेतला. केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय आणि अधिकार) व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या उपस्थितीत सुरेश सावंत यांनी पक्षप्रवेश केला. त्याचवेळी सुरेश सावंत यांची रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली.
सार्वजनिक बांधकाम विभागात नोकरी करणाऱ्या सुरेश सावंत यांना सामाजिक कामाची आवड होती. त्यातच आरेगाव ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उमेदवारी मिळाली. त्यावेळी ( 15 डिसेंबर 1986) सरकारी नोकरीचा राजीनामा देवून सुरेश सावंत ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत उतरले आणि पहिली निवडणूक जिंकले. 20 डिसेंबर 1986 ला आरेगांव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची माळ गळ्यात पडली. त्यानंतर 1997 पर्यंत त्यांनी सरपंच म्हणून काम केले. याच कालावधीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे काम करु लागले. 10 वर्ष जिल्ह्याच्या सहकार बोर्डावर होते. त्यातील एक वर्ष सहकार बोर्डाचे अध्यक्ष पदही त्यांनी मिळवले. 11 वर्ष आरपीआयचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिले. 2002 ते 2015 गुहागर एज्युकेशन सोसायटीचे संचालक म्हणून ते कार्यरत होते. कोणतेही राजकीय वलय आणि आर्थिक बळ नसताना त्यांनी ही प्रगती साधली.
सुरेश सावंत यांनी 2009 ची विधानसभा निवडणुक आरपीआयचे उमेदवार म्हणून लढवली. या निवडणुकीनंतर गुहागर तालुक्यातील राजकीय गणिते बदलली. आमदार भास्कर जाधव त्यावेळी राज्यमंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री होते. राजकारणात अचूक वेळ साधावी लागते हे माहिती असलेल्या सुरेश सावंत यांनी आमदार भास्कर जाधव यांचे नेतृत्व स्विकारत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2012 मध्ये पाटपन्हाळे गणातून पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले. सव्वा वर्ष गुहागर पंचायत समितीचे उपसभापती बनण्याचा मान मिळाला. पक्षाचे काम करुनही 2017 च्या निवडणुकीत तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या सुरेश सावंत यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव याच्या विरोधात अंजनवेल जिल्हा परिषद गटातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवली. गुहागर तालुक्यात सर्वाधिक चर्चेत असलेल्या या निवडणूकीत केवळ (सुमारे) 250 मतांनी सुरेश सावंत यांचा पराभव झाला. या पराभवानंतर भाजपने त्यांना गुहागर तालुक्याचे अध्यक्ष पद दिले. पुढे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही त्यांची नियुक्ती झाली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप सेना युती झाली. निवडणुकीपूर्वी आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला आणि गुहागरची जागा युतीचे उमेदवार म्हणून लढवली. त्यामुळे 2 ऑक्टोबर 2019 ला सुरेश सावंत यांनी भाजपचा राजीनामा दिला.
भाजपचा राजीनामा दिल्यानंतर जवळपास दिड वर्ष सुरेश सावंत सक्रीय राजकारणापासून दूर होते. भाजप सातत्याने सक्रीय होण्याची विनंती करत होता. राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षात येण्याचे बोलावणे होते. मात्र 34 वर्ष राजकारण केले आता थांबायचे, राजकारणातून निवृत्ती घ्यायची. अशी सुरेश सावंत यांची मनस्थिती होती. 2009 ला आरपीआय सोडल्यानंतरही सुरेश सावंत यांचे या पक्षातील नेत्यांसोबत, राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवलेंसोबतचे नाते तुटले नव्हते. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेही आरपीआयमध्ये सक्रीय होण्यासंदर्भात आग्रह करत होते. अखेर 25 मे 2021 रोजी सुरेश सावंत यांनी पुन्हा आरपीआयमध्ये प्रवेश करत नव्या राजकीय खेळीचा प्रारंभ केला आहे.
याविषयी बोलताना सुरेश सावंत म्हणाले की, कोरोनाच्या संकटात अनेक कामे ठप्प झाली आहेत. बेरोजगारीची चिंता तरुणांना भेडसावत आहे. मागासवर्गीय निधीतून होणारी कामे थांबली आहेत. या विकास कामांसाठी निधी देण्याचा शब्द केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. त्यातून विकास होईल. तरुणांना रोजगार मिळेल. जिल्ह्यातील रिपब्लिकन चळवळ पुन्हा सक्रीय करायची आहे. अशा विचारांनी पुन्हा एकदा नवा राजकीय प्रवास सुरु केला आहे.
(After 11 Years Suresh Sawant again actives in RPI. From 2009 to 2017 He worked in NCP. In 2017 He entered in BJP. But in 2019 Maharashtra Assembly Election, Suresh Sawant resigned from BJP. Suresh Sawant joined the party in the presence of the Union Minister of State (Social Justice and Empowerment Ministry, Government of India) and the Republican Party of India’s National President Ramdas Athavale. At the same time, Ramdas Athavale announced the appointment of Suresh Sawant as Ratnagiri District President.)