सौ. पारिजात कांबळे : प्रवास स्वयंपाकघरातून हॉटेल व्यावसायिकतेकडे
तिने स्वत:चा संसार चालविण्यासाठी हॉटेल व्यवसायात उडी घेतली. स्वत:चा संसाराला उभारी देतानाच 15 जणींना तिने रोजगारही दिला. राजकीय पक्षाचे काम करतानाही आधार हरविलेल्या 21 महिलांना शासकीय लाभ मिळवून दिला. एका हॉटेलचे स्वयंपाकघरात सुरु झालेले तिचे करियर आज हॉटेल व्यावसायिक ही ओळख देवू पहात आहे. महिला दिनाच्या निमित्ताने (Internation Women’s Day) तिचा हा प्रवास खास Guhagar News च्या वाचकांसाठी.
गृहिणी ते हॉटेल व्यावसायिक हा सौ. पारिजात कांबळे यांचा प्रवास थक्क करणार आहे. माहेरी हॉटेल व्यवसायाची पार्श्वभुमी असलेल्या निशा शेडगे गुहागरच्या पराग कांबळेंशी विवाहबध्द झाल्या. सुखाचा संसार सुरु झाल्यावर अवघ्या तीन वर्षात एका संकटाने या दाम्पत्याला घेरले. चार ते पाच वर्ष नियतीशी झगडण्यात गेली. मात्र या संकटातून बाहेर पडल्यावर सौ. पारिजात कांबळेंनी आपल्या आयुष्याला वेगळे वळण देण्याचा निर्णय घेतला.


सामाजिक आणि राजकीय प्रवास
सकाळच्या (Sakal) तनिष्कामुळे सामाजिक कार्याचा आयाम मिळाला. त्याचाच फायदा घेवून सौ. पारिजात प्रतिभा कलोपासक महिला मंडळाची स्थापनेपासूनची कार्यकर्ती बनली. तनिष्का आणि प्रतिभा कलोपासकचे काम करताना आपल्या अवतीभवती असलेल्या अनेक महिलांना मदतीचा हात देण्याची गरज सौ. कांबळेंच्या लक्षात आली. सासर आणि माहेर दोन्ही कडे सामाजिक आणि राजकीय कामाची पार्श्र्वभुमी असलेल्या सौ पारिजात कांबळेंनी महिलांना मदत करण्यासाठी शिवसेना (Shivsena) या आक्रमक पक्षाची कास धरली. गुहागर शहराची महिला प्रमुख म्हणून काम करताना सौ. पारिजात कांबळेंनी महिलाच्या समस्या सोडविण्यास सुरवात केली. गरीब, विधवा महिलांना शासकीय योजनेतून मदत (Help) मिळवून देणे, छोटा मोठा व्यवसाय करणाऱ्या महिलांना बँकेतून कर्ज (Bank Loan) उपलब्ध करु देणे. अशा गोष्टीमध्ये सौ. कांबळे महिलांना साथ करत होत्या. याच कामामुळे सौ. पारिजात कांबळेंकडे शिवसेनेने गुहागर तालुका महिला आघाडी प्रमुख अशी जबाबदारी दिली. निराधार महिलांना आधार देताना आपल्याही संसाराची घडी बसविण्यासाठी विचार मनात येत होता. गुहागरमधील पर्यटन व्यवसायाला पुरक असा काहीतरी व्यवसाय आपण शोधला पाहिजे. असं सारखे वाटत होते.


संधीचं सोनं केलं
असं म्हणतात की, अनेकवेळा एक संधी यशस्वी होण्यासाठी पुरेशी असते. पण ती संधी शोधता आली पाहिजे. सौ. पारिजात कांबळे यांच्याबाबतीतही तसंच घडलं. एका संधीने सौ. कांबळे यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
तीन वर्षांपूर्वी गुहागरमधील सी विंडस् (Sea Winds) या थ्री स्टार हॉटेलच्या मालकांनी सौ. कांबळेंसमोर हॉटेलचे स्वयंपाकघर चालविण्याचा प्रस्ताव ठेवला. माहेरचा हॉटेल व्यवसायाचा अनुभव असल्यामुळे सौ. पारिजात कांबळेंनी हा प्रस्ताव स्विकारला. आपली मैत्रिण सौ. सुरभि भोसले यांना सोबत घेवून नव्या क्षेत्रात पदार्पण केले. हॉटेलमधील स्वयंपाकामुळे सौ. पारिजात कांबळे रात्री अपरात्री घरी पोचत. त्यावर टिका झाली. मात्र मुठभर लोकांच्या निंदानालस्तीकडे दुर्लक्ष करुन सकारात्मक उर्जेतून सौ. कांबळे या व्यवसायात टिकून राहील्या. पुढे हॉटेल मालक डॉ. खैर यांनी सी विंडच्या हॉटेल विभागाच सौ. पारिजात कांबळे यांच्याकडे सुपूर्त केला. आज या हॉटेल विभागात टेबल साफ करण्यापासून, ऑडर्र सर्व्ह करण्यापर्यंतची सर्व कामे महिलाच करतात.


कोरोनाच्या संकटात शिवभोजन ने दिली दिशा
2020 मध्ये कोरोना संकटाने (Corona Pandemic) सौ. कांबळेंना चांगलाच झटका दिला. 19 मार्चला एका चित्रपटाच्या चित्रीकरणाला आलेल्या संचाच्या जेवणाची व्यवस्था सी विंडस्मध्ये करायची होती. 40 हजार रुपयांचा माल हॉटेलमध्ये भरला होता. दुर्दैवाने 18 मार्च ला शृंगारतळीत कोरोना रुग्ण सापडला. चित्रीकरण रद्द झाले. चार दिवसांत देश लॉकडाऊन झाला. इतक्या मालाचे करायचे काय या चिंतेत 15 दिवस गेले आणि तहसीलदार सौ. लता धोत्रेंनी शिवभोजन थाळी (Shiv Bhojan Thali)सुरु करणार का अशी विचारणा केली. कोरोना संकटाच्या भितीदायक वातावरणामुळे ही योजना चालू करण्यात कोणीच तयार नव्हते. पण आपल्या मदतीला किती माणसे येतील, कोरोनाची भिती आदीचा विचारही न करता 40 हजाराच्या मालाचे पैसे सुटतील म्हणून सौ. पारिजात कांबळेंनी हा प्रस्ताव स्विकारला. हा धाडसी निर्णय होता. जेव्हा कोरोनाच्या भितीपोटी लोक नातं विसरले होते. त्यावेळी अडकलेले कामगार, कर्मचारी अशा स्तरातील लोकांना भोजन सेवा द्यायची. हा निर्णय साधा, सरळ, सोपा नव्हता. पण पारिजात कांबळेंनी ते धाडस दाखविले. विशेष म्हणजे अशा प्रसंगी त्यांच्या सहकारी महिला देखील मदतीसाठी तयार झाल्या.
या शिवभोजन थाळीचा सर्वाधिक फायदा गुहागर आगारात अडकलेल्या चालक वाहकांना झाला. दोन महिन्यांच्या संपर्कातून आमचे कॅन्टीन तुम्हीच चालवायला घ्या. अशी विनंती एस.टी. कर्मचाऱ्यांनी केली. अवघ्या दिड वर्षात व्यवसायाची दुसरी संधी चालुन आली. ही संधी स्विकारुन एस.टी. कॅन्टीन चालवायला सुरवात झाली. खरतरं अजून एस.टी.ची प्रवासी वहातूक सुरळीत सुरु झालेली नाही. त्यामुळे कॅन्टीनचा व्यवसाय भरभराटीला आलेला नाही. तरीही सौ. पारिजात कांबळे आनंदाने, स्वस्थ चित्ताने, नेटाने हे कॅन्टीन चालवत आहेत.


हॉटेल व्यावसायिक या नव्या ओळखीच्या उंबरठ्यावर
एस.टी. कॅन्टीनचे बस्तान बसण्यापूर्वीच सौ. पारिजात कांबळेंनी आणखी एक धाडसी पाऊल उचलले. खरतरं हे कोकणी माणसाच्या स्वभावाच्या विरुध्दच. गुहागरमधील व्याडेश्र्वर विहारचे हॉटेल आणि लॉजिंग चालवायला देण्याची बातमी कानावर आली. आपल्या पायावर उभे रहाण्याची ही सर्वात मोठी संधी होती. त्यामुळे हे हॉटेल भाड्याने घेण्याचा निर्णय पारिजात कांबळेंनी घेतला. पुढील आठवडाभरात या हॉटेलचा शुभारंभ त्या करत आहेत.
पैशांपेक्षा माणसं कमावली
या प्रवासाबद्दल बोलताना सौ. पारिजात कांबळे म्हणाल्या की, योग्य संधीचा फायदा उचल्याने पुढच्या संधी समोर येवून थांबल्या. मेहनत करताना दमले पण नेटाने पुढत जात राहीले. स्वभावात बदल केले. अन्नपूर्णेचे मंदिर प्रसन्न असेल तर मीठ भाकरीलाही चव येते. हे लक्षात ठेवून स्वयंपाक घरातील वातावरण कायम आनंदी राहील याची काळजी घेतली. नम्रतेने सेवा दिली. त्यामुळेच यशस्वी होण्याच्या दिशेकडे पहिले पाऊल टाकले आहे. मी पैशांपेक्षा माणसं कमावली. माझ्या सासुबाई माझ्या पाठीशी ठामपणे उभ्या आहेत. तीन वर्षांपूर्वी ज्या महिलांना सोबत घेवून काम सुरु केले. त्या महिला आजही माझ्यासोबत सखी सारख्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. 15 महिलांना रोजगार मिळालाय. ४ महाविद्यालयीन तरुणी स्वयंरोजगारातून शिक्षण घेत आहेत. महिला महिलांना कशी मदत करतात याचा प्रत्यक्ष अनुभव मी रोज घेत आहे.