पालशेतच्या मनोज जोगळेकर यांचा प्रेरणादायी प्रवास
गुहागर : एखादा विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो त्याच शाळेत तो अध्यापन करतो. अशी अनेक उदाहरणे देता येतील. मात्र अध्यापन करता करता त्याच शाळेचे मुख्याध्यापक या पदावरही काम करण्याची संधी फार थोड्या शिक्षकांना मिळते. अशीच संधी पालशेतमधील मनोज जोगळेकर सरांना मिळाली आहे. ज्या शाळेने आयुष्य कसे जगायचे शिकविले, त्याच शाळेचा नावलौकिक अधिक वाढविण्याची जबाबदारी त्यांना मिळाली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या (Rayat Shikshan Sanstha) श्रीमती रखुमाई पांडुरंग पालशेतक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पालशेत या शाळेचे मुख्याध्यापक म्हणून त्यांची नियुक्ती रयत शिक्षण संस्थेने केली आहे.
पालशेत मध्येच रहाणारे मनोज जोगळेकर यांनी 1977 मध्ये याच विद्यालयात इयत्ता पाचवीसाठी प्रवेश केला. 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर पुण्यातील एस. पी. (Sir Parashurambhau College) कॉलेजमधुन त्यांनी विज्ञान शाखेची पदवी घेतली. त्यानंतर डी. के. शिंदे अध्यापक महाविद्यालय, गडहिंग्लज येथून बी.एड. पूर्ण केले. बी.एड. झाल्यावर काही महिने ते गुहागरमधील श्री देव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यामंदिरमध्ये शिक्षक म्हणून नोकरी करत होते. त्याचवेळी पालशेतकर विद्यालयात गणित आणि विज्ञान शिक्षकाची जागा रिक्त झाली. गावातील शाळेत शिक्षक म्हणून काम करण्याचा पर्याय त्यांनी निवडला. 1993 मध्ये सहाय्यक शिक्षक म्हणून मनोज जोगळेकर यांनी आपल्याच शाळेत अध्यापनाला सुरवात केली. आपल्याच गावातील विद्यार्थ्यांना घडविण्याचा आनंद जोगळेकरसर घेत होते. विज्ञान हा विषय आवडीचा असल्याने स्वाभाविकपणे अध्यापनासोबतच या विषयातील अन्य उपक्रमांमध्ये जोगळेकर सर आवडीने सहभागी होत असतं. विज्ञान प्रदर्शनासाठी विद्यार्थ्यांना विषयानुरुप वेगवेगळ्या प्रतिकृती बनविण्यासाठी ते प्रोत्साहन देत. त्यामुळेच विज्ञान प्रदर्शनात पालशेतकर विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत आपल्या प्रतिकृती नेल्या. गणित आणि भूमिती सारख्या अवघड विषयांबद्दल विद्यार्थ्यांना गोडी लावण्यात ते यशस्वी झाले. स्वाभाविकपणे गणित आणि विज्ञान या दोन विषयांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली. पालशेतकर विद्यालयाच्या विविध उपक्रमांमध्येही जोगळेकरसरांचा सहभाग नोंद घेण्याजोगा होता. त्यांचा या उपक्रमशीलतेची दखल घेत रयत शिक्षण संस्थेने मनोज जोगळेकर यांची 2014 साली पर्यवेक्षक म्हणून बढती केली.
पर्यवेक्षक या नव्या पदावरही मनोज जोगळेकर यांनी आपला ठसा उमटविला. शिक्षणासोबत शाळाबाह्य उपक्रमांमध्ये आपली शाळा कशी अग्रणी असेल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि संस्था यांच्यामधील समन्वयाचे कामही जोगळेकरसर करतात. विविध ट्रस्ट, दानशूर व्यक्ति यांच्याशी संवाद साधुन, संपर्कात राहून अनेक भौतिक सुविधा त्यांनी शाळेला उपलब्ध करुन दिल्या. त्यामुळेच आज रयत शिक्षण संस्थेने (Rayat Shikshan Sanstha) मनोज जोगळेकर यांची शाळेचे मुख्याध्यापक पदी नियुक्ती केली आहे.
या नियुक्तीनंतर गुहागर न्यूजशी बोलताना मनोज जोगळेकर म्हणाले की, हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच अभिमानाचा आहे. विद्यार्थी दशेत माध्यमिक शिक्षण घेतलेल्या शाळेतील आठवणी प्रत्येकाच्या मनात कोरलेल्या असतात. आज मुख्याध्यापक पदाच्या खुर्चीवर बसताना हा सारा प्रवास आठवला. या शाळेवर विद्यार्थी म्हणून, शिक्षक म्हणून मी अपरंपार प्रेम केले आहे. याच शाळेतील एक विद्यार्थी म्हणून मुख्याध्यापकाच्या खुर्चीत बसताना अधिकारापेक्षा कर्तव्याची जाणिव सातत्याने होत आहे. 1993 मध्ये शिक्षक म्हणून हा प्रवास सुरु झाला तेव्हापासून कै. मनोहरभाई पालशेतकर आणि त्यांचे कुटुंबिय कायम माझ्यासोबत होते. अनेक अडीअडचणींच्या काळात त्यांनी दिलेला आधार, मार्गदर्शन यामुळेच या पदापर्यंत मी पोचु शकलो याचीही जाणिव होते. पालशेतमधील ग्रामस्थ कायम माझ्या पाठीशी उभे होते. त्यामुळेच अनेक निर्णय शिक्षक, पर्यवेक्षक म्हणून मी घेऊ शकलो. विद्यार्थी आणि पालक, शिक्षक सहकाऱ्यांनी केलेले सहकार्य, दिलेले प्रेम हे देखील या प्रवासात महत्त्वाचे आहे. त्यामुळे मुख्याध्यापकाची जबाबदारी स्विकारताना पालशेतकर विद्यालयाला अधिकाधीक प्रगतीपथावर नेणे, विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास करणे ही उद्दीष्टे मी डोळ्यासमोर ठेवली आहेत.