लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
ही गंमत तेव्हाची आहे जेव्हा सुमितच्या शाळेत निबंधाची सुरुवात झाली होती. विषय वेगवेगळे – कधी शाळा, कधी आई, कधी पाऊस असेच काही. एकदा शाळेतून विषय दिला होता माझा आवडता प्राणी. निबंधाबद्दल शाळेतल्या ताईंची ही भली मोठी चिट्ठी. शाळेत भेटायला यायचं बोलावणं. आई घाबरत घाबरत शाळेत पोहोचली. त्यावर मिसनी काळजीच्या चेहऱ्यानी तिच्याकडे पाहिलं. मग घसा खाकरून चष्म्याच्या आडून त्या गंभीर आवाजात म्हणाल्या “हे पहा सुमितची आई, सुमितकडे फार लक्ष देण्याची गरज आहे. तुमच्या काही गोष्टी लक्षात आल्यात का ?” आईने घाबरत घाबरत विचारलं. “काही विशेष काळजी करण्यासारखं आहे का?” मिसनी आईलाच दामटलं, “तुम्ही त्याचं शिक्षण गंभीरपणे घेता की नाही?” (यावर काय बोलावं आईला कळेचना.) “त्याचं वर्गात अजिबात लक्ष नसतं. मिस शिकवतात तेव्हा ह्याचं लक्ष नेहमी वर्गाबाहेर. (आईने मनात म्हटलं हे तर अनेक मुलांचं होतं की.) आत्तापासून नीट अभ्यास केला नाही तर पुढे काही खरं नाही. त्याला नीट समजावून सांगा. मला हे असलं चालणार नाही माझ्या शाळेत.” आईने परत घाबरत घाबरतच विचारलं. “काय झालं मिस?”
मिस जवळ जवळ ओरडल्याच “हा पहा पहा त्याचा निबंध. वर्गात किती वेळा बोलणं झालं आहे निबंध कसा लिहायचा यावर. आणि यानी काय दिवे लावलेत पहा.” असं म्हणून त्याच्या निबंधाची वही जवळ जवळ आईकडे फेकलीच. आईने वही उचलली. मिस परत जरबेच्या आवाजात म्हणाल्या, “पाचव्या पानावर पहा. माय फेवरेट अॅनिमल या विषयावर काय निबंध लिहिलाय तुमच्या लाडक्याने ते. आणि ते ही मराठीत ? घरी घेऊन जा ती वही. त्याच्या वडिलांनाही दाखवा. मला हे असलं परत चालणार नाही. तुमच्या मुलाला चांगले मार्क मिळायला हवेत की नाही ते ठरवा तुम्हीच. या आता.”
वही हातात धरून आई बाहेर आली. आपल्या मुलाच्या मार्कांचा म्हणजेच पर्यायाने त्याच्या भविष्याचा प्रश्न असल्यामुळे तीही बुचकळयात पडली. हा मुलगा असंच करत राहिला तर याचं कसं होणार असा गहन प्रश्न तिला सतावू लागला होता. माय फेवरेट अॅनिमल म्हणजे नक्की सुमितनी कुत्रा हा विषय घेऊन त्यावर निबंध लिहिला असणार. निबंध कुठला आईवर राग काढलेला असणार असा तर्क तिनी केला. त्याच्या निबंधांचा सारांश तिला कळलाच होता. तो नक्कीच असणार – कुत्रा मला फार आवडतो पण आई घरात कुत्रा आणू देत नाही. तरी मला कुत्राच आवडतो. आणि तो मी घरी आणणारच – असा काहीतरी निबंध वाचायची तयारी करून आई घरी आली आणि घरी आल्याआल्या आधी वही उघडली.पाचवं पान उघडलं.
निबंधाचं शीर्षक होतं – माय फेवरेट अॅनिमल. आणि पुढे लिहिलं होतं.
“गादीवर पडलं की छत फार मजेशीर दिसतं. पाण्यानी उडालेले छताचे पोपडे ढगासारखेच दिसतात. त्यात किती चित्र तयार होतात – अगदी ढगात होतात ना तश्शीच. हत्ती, फूल, गाडी आणि खूप खूप खूपच चित्र. दरवेळेला वेगळीवेगळी.
आणि पंखा फिरायला लागला की त्यावर कुठून तरी पडणाऱ्या प्रकाशामुळे एक छान चमकणारी गोल चकती तयार होते. पंख्याला चांदी लावावी तशी दिसते ती चकती. आजी पूजेत चांदीचं निरांजन लावते ना अगदी तशीच दिसते. पंख्यावर हलतं निरांजन. मी होईन का कधी असं हलतं चमचमतं निरांजन ? (एवढी चिडलेली असून सुद्धा आईला ही कल्पना मनापासून आवडली.)
पंख्याबरोबर बाजूची जळमटंसुद्धा हलायला लागतात एका तालात. आम्ही गॅदरिंगला कसे सगळे हात धरून तालात मागेपुढे होतो ना तशीच हलतात. त्यांचं पण गॅदरिंग असेल का? जळमट आमच्यासारखं गॅदरिंग करत असतील का? का त्यांना वेगळं गॅदरिंग करायला नको. त्यांचं रोजच गॅदरिंग असतं. बरं आहे बुवा, वर्षातून एकदाच गॅदरिंग करा असं नाही. मनात आलं की गॅदरिंग. मला आवडेल जळमट व्हायला. ”
या शेवटच्या वाक्याला दोन लाल गोल केले होते मिसनी. जळमट व्हायला आवडेल. ही कसली महत्त्वाकांक्षा ? असा मिसचा शेरा. या वाक्यावरच त्या सगळ्यात जास्त चिडल्या होत्या. शिक्षणात लक्ष नसल्याची ही लक्षण पाहून रागावल्या होत्या. आईने ठरवलं तमिसुशी बोलायलाच पाहिजे. तिने ताबडतोब खास आईच्या चिडलेल्या आवाजात हाक मारली – सुमित, सुमित लगेच इकडे ये. त्याच्या समोर वही नाचवत म्हणाली – “हे , हे काय लिहिलंय. माय फेवरेट अॅनिमल या विषयावर असं लिहितात का?”
“अग ईआ काय झालं, मला ताप आला होता ना…… ”
“त्याचा ह्या निबंधाशी काय संबंध आहे सुमित? ” (आई चिडलेली असली की प्रेमाच्या तमिसु नावाचा त्याग करून त्याला रोखठोक सुमितच म्हणते.)
“ईआ. चिडू नको. सांगतो ना मी. तर मला ताप आला होता ना. तेव्हा मी सारखा झोपून झोपून नव्हतो का. तेव्हा गादीवर पडल्या पडल्या मला छत दिसायचं. मला ते सांगायचं होतं. ”
“म्हणून माझा आवडता प्राणी या विषयावर लिहितात का हे सुमित? ” आईचा पारा आणखी वाढला.
“अग ईआ. ताप आल्यावर छताकडे बघून सुमितला काय वाटतं असा निबंधाचा विषय कधी देतच नाहीत मिस. मग मी माझ्या मनातला निबंध कधी लिहिणार? मला माझ्या मनासारखं का लिहू देत नाहीत? मला असा निबंधाचा विषय का देत नाहीत मिस?” या प्रश्नावर आई चीत. खरंच या प्रश्नाला काही उत्तर आहे का टीचर, आई, बाबा अशा मोठया माणसांकडे ? आईच्या मनात आलंच.