लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
रविवारी दुपारी झोपेचं सुख अनुभवत असतानाच मोठा मोठा आवाज ऐकून घराला जाग आली.
बाबानी आईला हलवत डोळे मिटूनच विचारलं “आवाज कसला येतोय ग? ” अजून अर्धवट झोपेत असलेल्या आईला कशाचा आवाज आहे ते समजेचना. तिनी त्याही परिस्थितीत लक्ष देण्याचा प्रयत्न केला. पण तिला काहीच आवाज येत नव्हता त्यामुळे आई कूस बदलून परत झोपली. जरा डोळा लागतोना लागतो तोवर परत आवाज यायला लागले. मग आईला उठावचं लागलं. आई उठून बाहेर आली आणि बघते तो काय?
समोर आजोबा हात आणि पाय यावर ओणवे होऊन चालत होते. मधून मधून आकाशाकडे डोकं वर करून पाहात होते. आजी सोफ्यावर पोटावर झोपून हातपाय लांब करायच्या प्रयत्नात होती. आई हे दृष्य पाहून घाबरलीच. आणि एकदम ओरडली “अरे राजेश बाहेर ये. लवकर बाहेर ये. अहो आई हे काय करताय तुम्ही? काही होतंय का तुम्हाला?” आईचा आवाज ऐकून बाबापण धावत बाहेर आला. आपल्या आई वडिलांच्या करामती पाहून त्याने सुमितला फैलावर घेतलं.
“सुमित हे काय हे? काय करायला लावलंस तू आई-बाबांना? ”
“बाबा वाघोबा सोपा असतो. पण पाल फार अवघड. ” बाबाला सुमित कशाबद्दल बोलतो आहे ते समजेना. तो बावचळल्यासारखं म्हणाला “म्हणजे काय? ” “बॉब, वाघ कसा चार पायांवर चालतो आणि ऐटीत फिरतो. पण पालीचं तसं नसतं बाबा. ती भिंतीवर चालते. म्हणजे हवेत. हवेत चाललं तर म्हणजे समजा मी हवेत चाललो तर पडणार नाही का? ” आई आणि बाबा त्यांच्याही नकळत उत्तरले “हो. ” “पण भिंतीवरून कुठे पडते ती? पाल भिंतीवरून पडत नाही. हे अवघड आहे ना. वाघाला जमिनीवर चालाव लागतं ते सोपं आहे. जमिनीवरून तर काय तमिसुसुद्धा चालतोच की. ” आई बाबांना हो म्हणण्याशिवाय काही उपायच नव्हता.
परत बाबा – “अरे पण आआआला हे काय करायला लावलेयसं. ते नाही सांगितलंस तू अजून. ”
“हां ते ना. ती आमची मज्जज्जज्जज्जा आहे. बाबा मी त्या दोघांना हेच सांगत होतो. पण ते म्हणाले तुला कसं कळलं. तर मी म्हणालो की मी करून बघितलं आहे. तुम्ही करून बघा म्हणजे तुम्हालाही कळेल मी म्हणतो ते खरं आहे की नाही ते. मी हट्ट धरला म्हणून आजोबा वाघासारखे डरकाळया फोडत चालत आहेत आणि आजी पाल झाल्येय. मग ते चेंज करणार आणि बाजोआ पाल होणार आणि जीआ वाघ. ”
आता मात्र आई चिडली. “सुमित हे अति झालं. आजी आजोबांना कुठेतरी लागलं तर. किंवा काही त्रास झाला तर.” निरागसपणे सुमित लगेच डोकं हलवत हो म्हणाला. “मग नको करू देत. आआआनी नाही झालं वाघोबा आणि पाल तरी चालेल.” जरा शांत होत आई म्हणाली “हे असले प्राणी-पक्षी व्हायचं असलं तर ते फक्त सुमित होणार. आजी आजोबांना त्रास दयायचा नाही. अशा गोष्टी तुम्ही मुलामुलांनी करायच्या म्हणजे अभि, अजेय यांच्याबरोबर. काय? ”
आआआंनी लगेच नातवाची कड घेतली. “अरे, त्याला कशाला ओरडता. तो नुसतं म्हणाला. पण केल तर आम्हीच ना? गंमत आहे यात. नाहीतर कुठली नातवंड आजकाल आजी आजोबांशी इतकं बोलतात. त्यांच्याशी खेळतात. आमचा नातू आमच्याशी बोलायला हवा असेल तर आम्हीही त्याच्याशी लहान होऊन वागायला हवं रे. ”
“बाबा बरोबर आहे तुमचं. पण तुमच्या तब्येतीला नको का जपायला. नातू आहे म्हणून नको ते लाड नका करू त्याचे.”
बाबाचं वाक्य संपेपर्यंत सुमितने स्वैंपाकघरात जाऊन साधारणपणे दोन डबे, तीन पातेली आणि दोन चमचे खाली काढलेले होते. खेळण्यातल्या ड्रमचे दोन दांडू, एक डाव हे पण शेजारी ठेवलेले होते. एका मध्यम आकाराच्या डब्यात पाणी घेऊन ते उरलेल्या डब्यात आणि पातेल्यात भरणे चालू होते. एकदा पाणी भरून झाल्यावर सुमितला काय वाटलं कोण जाणे पातेल्यातलं जास्त झालेलं पाणी पुन्हा दुसऱ्या पातेल्यात अशी बदलाबदल केला. सुमितने त्यात कमी-अधिक पाणी भरलं. पाणी भरून झाल्यावर त्याच्या मध्यभागी तो मांडी घालून बसला. सगळ्यावर नीट नजर टाकून मग त्याने दोन्ही चमचे हातात घेतले आणि डावी कडून उजवीकडे एकेका पातेल्याच्या कडेवर चमच्याने ठेका देत सुमित वाजवू लागला. मग डोक्यानी नाही नाही म्हणत हातातले चमचे त्याच पातेल्यात घालून, सुमितने ड्रमचे दांडू हातात घेतले. आजूबाजूला पुष्कळ पाणी सांडलं होतं आणि त्या पाण्यात मांडी घालून बसलेला सुमित पार भिजून गेला होता.