हा गमत्या सुमित आजीला जीआ म्हणतो. आजोबांना बाजोआ, बाबाला बॉब आणि आईला ईआ. शब्दामधली अक्षर उलट करून म्हणायची हा त्याचा लहानपणीचा छंद. म्हणजे अगदी छोटा होता ना सुमित तेव्हा मांजराला रजमां, शिऱ्याला राशि, दुधाला धदू, कपाला पक असे उलटे शब्दच वापरायचा. कपातून दूध हवं असेल तर सुमित म्हणायचा धदू पक. धदू पक? ? ? सुरुवातीला ही भाषा समजायला फार जड गेली. एकदा न राहवून आई तर आईपणानी ओरडली त्याला. “हे काय सुमित? धदू पक म्हणजे दूध कप. कसं कळावं काय बोलतोयस, काय मागतोयस ते ? घाईच्या वेळेला नेमकी गंमत सुचते तुला. मी तुला तमिसु म्हटलं तर चालेल का? ” “ईआ मस्त. म्हणना मला तमिसु. बघ किती मजा येते ते. शब्दांची गंमत. उलट-टलउ. म्हणून बघ ना. ” आईनी पण म्हटलं – टलउ. मग तिलाही त्याची गंमत करायची लहर आलीच. अक्षर जुळवत जुळवत ती सावकाश म्हणाल “हीका लूबो कोन.” “काय म्हणालीस?” “आता बघ कळत का? मला छळतोस नाही का उलट उलट बोलून. थांब आता मी पण तुझी गंमत करते. हं कसं म्हणायचं बरं. हां – हीका लूबो कोन. ” आईने उलट बोलेलेली अक्षर सुलट करून ही उलटी भाषा सुमित डीकोड करू लागला. “हीका म्हणजे काही. लूबो म्हणजे बोलू. कोन ? हां समजलं नको. काही बोलू नकोस. कळलं मला. आता तू सांग काय, ऐक – लातु जाम लीआ का ? ” “काय? लातु म्हणजे तुला. जाम कसला ? ” “नाही ग जाम नाही. उलट करून म्हण. ” “हो. जाम चं उलट होणार मजा. पुढे काय म्हणाला होतास ? ” “लीआ. ” “म्हणजे आली . समजलं – तुला मजा आली का ? लीआ लीआ. ” आणि दोघे हसत सुटले. आजी आजोबांना कळेचना माय-लेकरांचं चाललंय काय ते. उलट अक्षरांची गंमत आईलाही कळली आणि काही दिवस – गम चसेअ लूचा लेझा. कळलं का तुम्हाला – मग असेच चालू झाले. मज्जज्जज्जज्जा. सुमित आईला अगदी गंभीर आवाजात सांगत होता “अग ईआ, खरंच आम्ही अभ्यास करत होतो. ए फॉर, बी फॉर असा अभ्यास. पुस्तक वाचत होतो आम्ही. ” “पण सुखात्मे आजोबा तर म्हणाले की तुम्ही कुठल्याशा भाषेत वेगवेगळे आवाज काढत होतात म्हणून.” “शप्पथ आई, असं काही करत नव्हतो आम्ही. हे बघ. ए फॉर लपअॅ. बी फॉर नानाब. असं पाठ करत होतो.” उलटया अक्षरांचं गौडबंगाल समजून घेत आई म्हणाली “म्हणजे ए फॉर अॅपल. बी फॉर बनाना. असा अभ्यास का चालू होता. ? ” “हो.” “पण मग अभ्यास करताना आजोबांना धडक कशी बसली ते काही कळालं नाही मला.” “अग ईआ, इ फॉर टफंलिए म्हणताना आम्ही एलिफंट सारखे हाताची अशी सोंड करून हत्ती झालो होतो ना. हत्ती काय एका जागेवर बसून राहतो का ? म्हणून मी हत्तीसारखा फिरत होतो. तर नेमके म्हणजे मला म्हणायचंय की चुकून आजोबा आले तेव्हाच.” “असं झालं होय. मग तुमचं बरोबर आहे. तुम्ही अभ्यासच करत होतात. पण सुमित असा अभ्यास कशाला करायचा ज्याचा इतरांना त्रास होईल? ” “ईआ, एलिफंट किती अवघड शब्द आहे. पण टफंलिए असा सोपा केला ना…..” “काय? टफंलिए हा शब्द सोपा आहे का ?” आईने गंमतीच्या स्वरात पण गंभीर चेहरा करत विचारलं. “हो. असं सगळे एकदम ओरडायला लागले म्हणजे तो सोपाच आहे ना आणि बरोबर आम्ही टफंलिए सारखी सोंड काढून पळत नव्हतो का? असं केलं ना की माझ्या छान लक्षात राहतं. बघ मी ए ते झेड पाठ केले सुद्धा शब्द आणि अभि, सई पण म्हणाले की असं टकॅ, टकॅ म्हणत मांजरीसारखं चालत म्यांव म्यांव केलं ना की लक्षात राहतं की सी फॉर कॅट. पण ईआ, एक सांग सी फॉर सॅट पाहिजे की नाही. सी फॉर कॅट कसं काय होतं ग ? ” तर असा आमचा जबाकेडो तमिसु. अर्थात डोकेबाज सुमित. ही त्याचीच ष्टगो. गोष्ट हो.