लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
आज घरामध्ये नुसता गोंधळ चालू असावा. कारण घरातून मोठयामोठयाने काहीही न समजणारे आवाज आणि त्यावर खिदळून हसणं असंच चालू होतं. लपअॅ. (हसण्याचा आवाज.) नानाब. (हास्याचा फवारा) टकॅ. मागून अनेक आवाज टकॅ. टकॅ.टकॅ. (मागोमाग हसणं आहेच.)
सुखात्मे आजोबांना झोप म्हणून काही येईना. भरली वांगी आणि भाकरी अशा आवडीच्या जेवणाचा बेत रचवून आजोबा दुपारी पाठ टेकवायला निघाले नाहीत तो शेजारच्या फ्लॅटमधून हे असले आवाज यायला लागले. आधी आधी आवाज लहान होते. आजोबांनी झोपायचा प्रयत्न केला. जरा डोळा लागला म्हणावं तोच चित्रविचित्र आवाजांनी गलका वाढला. मुलं म्हणतच होती लपअॅ, नानाब, टकॅ. हळूहळू आवाज वाढायला लागला आणि आजोबा चिडले. तणतणत ते शेजारच्या कुलकर्ण्यांकडे गेले तेव्हा समोरचं दृष्य पाहून त्यांना काय बोलावं ते कळेचना.
कुलकर्ण्यांचा सुमित आणि शेजारचा अजेय, पलिकडच्या बिल्डिंगमधला अभि, सई आणि उर्मी असे चार पाच मित्र मैत्रिणी अभ्यासाची पुस्तक हातात घेऊन बसले होते. चित्रांची पुस्तक घेऊन ही सात- आठ वर्षांची मुलं गोल करून बसली होती. मुलं एकामागून एक कोणजाणे कुठल्या भाषेतले शब्द म्हणत होती. आता त्यांचं चालू झालं – गडॉ, गडॉ.
अभि म्हणाला – “कुठला रे? हा आहे गडॉ? खरंच की गडॉ. ” (परत हास्याची लकेर.)
त्यावर अजेय म्हणतो “ कसा ? हे काय आहे ? वाच बघू. ”
आता सईचा उत्साह वाढला ती हातातल्या पुस्तकात बघत म्हणाली “ए तुम्ही थांबा. आता मी वाचणार हे – टफं अंऽऽऽऽ. ”
“मी वाचू का?” अमित म्हणाला
पुन्हा सई – “ नाही मीच वाचणार. हं काय बरं? हे बघ टफंलिए.”
बरोबर – सगळे एकदम किंचाळले. आता सगळयांच मिळून चालू झालं – टफंलिए, टफंलिए. मग सुमितनी उजव्या हातानी डावा कान धरला आणि डावा हात त्यात गुंतवून सोंडे सारखा हात हलवत आवाज काढत गोल गोल फिरू लागला. मग सगळीच मुलं सुमितची नक्कल करत वेडेवाकडी फिरायला लागली. चालला हत्तींचा कळप.
“सुमितच्या आई, अहो सुमितच्या आई. आहात का घरात ? काय उच्छाद मांडलाय या पोरटयांनी ? ” सुखात्मे आजोबा दारात यायला आणि सुमितनी खिंकाळत त्यांच्यावर धडक मारायला एकच गाठ पडली. आता तर विचारायलाच नको. तोवर सगळी मुलं आपापल्या सोंडा अडकवून धावत आली. सुमित म्हणाला “ए, आजोबांना सॉरी म्हणूया.” सर्व मुलांनी आपापल्या सोंडा खालीवर करत, कमरेत वाकत म्हटलं “आजोबा सॉरी.”
“सॉरी काय सॉरी. आधी येऊन धडका आणि वर सॉरी म्हणा. आई कुठे आहे आपली?” आजोबांचं वाक्य पूर्ण होण्याच्या आत सुमित वदला, “आजोबा, आई आली नाही अजून ऑफिसमधून. अजून दोन तास आहेत तिला यायला. कामाच्या मावशी आहेत. त्यांना बोलावू का ? त्या देतील तुम्हाला थोडी सुपारी. सांगू का, आजोबांना सुपारी……..”
“ए, मला सुपारी वगैरे काही नकोय. पोरं इथे शेजाऱ्यापाजाऱ्यांना त्रास देतायत, झोपू देत नाहीत. आणि आईवडील गेलेत पोरांना सोडून कामावर. जाऊ देत. कुणाला काही बोलण्यात अर्थ राहिला नाहीये.” आजोबा तणतणले.
त्यावर सुमित अगदी निरागसपणे म्हणाला “आजोबा, चिडू नका. आई येईल थोडया वेळात. ती आल्यावर तुमच्याकडे पाठवू का ? ”
“काही नको पाठवायला वगैरे. आणि तुमचं काय चाललंय हे ?”
“आजोबा आम्ही अभ्यास करतोय.” – अजेय
“काय? काय म्हणालास ? अभ्यास? हा कसला अभ्यास ? ”
मुलांनी ए,बि,सि,डी लिहिलेली आणि छान रंगीत चित्र असणारी पुस्तक आणली. “आजोबा, हा अभ्यास करतोय. ए फॉर, बि फॉर असा अभ्यास.” इतकी चर्चा होई पर्यंत पुन्हा मुलांचा गलका चालू झाला. ए आता शाळा-शाळा खेळू. “मी टीचर होणार” म्हणत उर्मी पुस्तक घेऊन पुढे आली. सफरचंदाच्या चित्रावर बोट ठेवून तिनी टीचरच्या तोऱ्यात म्हटलं. “रीड धिस.” बाकीची मुलं ओरडली – लपअॅ. उर्मी टीचर म्हणाल्या “नो. राँग. ए फॉर अॅपल.” मुलांनी गलका केला. “तेच म्हणतोय आम्ही – लपअॅ. उर्मी टीचर केळ्याच्या चित्रावर हात ठेवत म्हणाल्या “बी फॉर बनाना. ” अर्थातच मुलं म्हणाली “तेच की नानाब. नानाब” अजेय म्हणाला “ सी फॉर ” मुलं म्हणाली टकॅ, टकॅ आणि दोन्ही मुली मांजरी होऊन म्यांव म्यांव करायला लागल्या. अभि म्हणतो कसा- “सुमित ही आयडिया भारी आहे. असा अभ्यास रोज करू यात आपण. ”
आजोबा निरुत्तर होऊन परत निघाले. “बघा. हा या पोरांचा अभ्यास.” संध्याकाळी सुमितच्या आईच्या कानावर हा प्रकार घालायचा हे त्यांनी नक्की ठरवलं होतं. शेजारून जाणाऱ्या फिरोजला त्यांनी तसं बोलूनही दाखवलं. तोवर परत पोरांचा गलका चालू झाला – नफॅ. नफॅ. फराजि, फराजि. फराजि फराजि आणि त्यावर हसणं हे ऐकून फिरोजला राहवलं नाही. तो सुद्धा आत डोकावला. “सुम्या. मला चिडवता होय रे. फिरोज नाव आहे माझं. तर फराजि म्हणता काय ?” तो खोटं खोटं रागावून म्हणाला.
“नाही दादा आम्ही अभ्यास करतोय. हे बघ.” चित्रातल्या पुस्तकात जिराफाच्या चित्रावर हात ठेवून गंभीर आवाजात अभि आणि उर्मी म्हणाले “जिराफ.”
“पण तुम्ही काय म्हणालात? काय बरं? ” अभि लगेच उत्तरला “फराजि. फिरोज दादा अरे फराजि म्हणजे जिराफ”
“हो का? फराजि म्हणे. थांबा सुमितची आई येऊ दे. मग बघतो एकेकाला.” हसत हसत फिरोज दादा निघाला. जाता जाता म्हणाला “काय काय मुलांचं चालू असतं कळत नाही. बसलेत तर खरे पुस्तक घेऊन. पण अभ्यास काय करतायत काय माहीत ? ”
सुखात्मे आजोबांनी हे ऐकलंच तसे म्हणाले “बरं झालं तुम्हीच बोललात ते. नाही तर मी बोलतो तेवढंच लोकांना दिसतं. हे असले वेडेवाकडे आवाज काढायचे याला काय अभ्यास म्हणतात का? तुम्हीच सांगा म्हणजे झालं.” “जाऊ दे आजोबा, मुलंच ती. त्यांनी नाही मस्ती करायची तर कोणी करायची? नाही का?” पाठोपाठ मुलं ओरडली मज्ज्ज्जज्जज्जा