महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. या परीक्षा आधी लांबणीवर टाकण्याचा निर्णय झाला होता, मात्र राज्यातील करोना संक्रमणाच्या बिघडत जाणाऱ्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Cancelled S.S.C. Exam.
दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस घेण्याचे प्रयत्न राज्य सरकार करत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय सोशल मिडियाद्वारे जाहीर केला. दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. निकाल कसा तयार करायचा याबाबतचे निकष लवकरच जाहीर करण्यात येतील.
देशातील इतर सर्व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बोर्डांनी त्यांच्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. देशातील राष्ट्रीय पातळीवरील मंडळ केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाने तसेच आयसीएसई बोर्डाने देखील दहावीची शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. सर्व बोर्डांच्या निर्णयांमध्ये समानता राहावी म्हणून राज्य मंडळाची देखील दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (State Education Minister Varsha Gaikwad) यांनी सांगितले.