लेखिका : सौ. सुनीला गोंधळेकर, पुणे
सुट्टीचे दिवस. छान सकाळची वेळ. अअउस आणि तमिसु – सगळी बच्चेकंपनी मस्तपैकी फिरायला बाहेर पडली होती. कुणाकुणाचे आई-बाबा पण बरोबर होते. वाटेत चक्क फिरोज दादा दिसला. मग काय पोरं गप्प बसतात होय. त्यांनी फिरोज दादाला हाक मारली आणि म्हणाले आम्ही चाललोय फिरायला. तू पण चल की. कारण दादा, ते कि नाई तब्येतीला चांगलं असतं. मुलांचा उत्साह पाहून फिरोजपण त्यांच्यात सामील झाला. गप्पा मारत, मस्ती करत छान फेरफटका चालू होता. सुमित ते काय लिहिलय रे ? सुमितच्या आईने एका मोठया दुकानाच्या पाटीकडे हात दाखवत विचारलं. तशी सुमित एकेक अक्षर जुळवत वाचायला लागला – ज न र ल म्हणजे जनरल. अभिनी पुढचं वाचलं – स् ट नाही नाही स्टो अ स. अरे जनरल स्टोअर्स. एक अख्खा शब्द उलगडल्याचा आनंद अभिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. अक्षर अक्षर जुळवतच शब्द तयार होतो हे या बच्चेकंपनीला आला उमगायला लागलं होतंच. पण इंग्रजी आणि मराठीचे बंध ही हळुहळू एकत्र येत होते. मग पुढच्या दुकानापाशी मीना मावशीनी सईला विचारलं “सई या पाटीवर काय लिहिलय ग ?” तशी सई सरसावली आणि एकेक अक्षर जुळवत वाचायला लागली. थोडयाच वेळात अअउस यांना चेव चढला. पाटी सगळ्यात आधी कोण वाचतं याची चढाओढ लागली.
आता सोसायटीच्या कोपऱ्या कोपऱ्यावर पाटया होत्या. सगळी बच्चे कंपनी आणि आई-बाबा सगळेच थांबले. सईनी वाचायला सुरूवात केली – “पी एल इ ए एस् ई. अं अं हं प्लीज.
डी ओ डू.
एन् ओ टी म्हणजे नॉट”
उर्मीला आता उर्मी आली आणि ती चक्क सईला मागे सारत पुढे वाचायला लागली
“टी एच् इ म्हणजे द.”
“ए फिरोजदादा नुसतं द म्हणायचं तर एवढं मोठं स्पेलिंग कशाला करतात रे?”-अभिनी प्रामाणिक आवाजात प्रश्न विचारला. फिरोज दादा निरुत्तर. “ते म्हणजे……. काय आहे ना…….” फिरोज दादाला उत्तर मिळायच्या आत उर्मी पुढंचं वाचायला लागली सुद्धा.
“पार्क युवर……. ए अभि हे काय आहे रे?”
“हे ना. व्ही इ एच् आय ” उर्मी – “सी एल् इ अरे म्हणजे व्हेइकल.
अरे म्हणजे गाडया. हो ना रे दादा? म्हणजे प्लीज डू नॉट पार्क युवर व्हेइकल हिअर. एएएएएएएए”
काय गंमत झाली पहा म्हणजे वाचायचा भलता कंटाळा असलेली उर्मी या सहजच तयार झालेल्या चढाओढीत कधी वाचायला लागली ते लक्षातच आलं नाही. एक पाटी वाचून झाल्यावर मुलं धावत दुसऱ्या पाटीकडे गेली. मग इंग्रजी, मराठी सगळ्याच पाटया वाचायचं असं मुलांनी जणू ठरवूनच टाकलं. उर्मी काय मस्त पैकी पाटया वाचत होती आणि उर्मीचे आई-बाबा आवाक् होऊन पाहात होते.
पण हळूहळू मुलांनी पालकांचे हात सोडले आणि मुलं मुलं एकत्र आली. एव्हाना पालक मंडळीही गप्पांत दंग झाली होती. छोटे आणि मोठे असे वेगळे गट हळूच तयार झाले. एवढ्यात मुलं कधी पळायला लागली ते मोठयांना त्यांच्या गप्पात कळालही नाही. आई-बाबांचं आपल्याकडे लक्ष नाही ही संधी मुलं कसली सोडतात. त्यांनी लगेच धावाधावी करायला सुरूवात केली. सअअसउ सगळे धावायलाच लागले. मज्ज्ज्जज्जज्जा चढ आणि उतार आला की मुलांना पर्वणीच. कोण सगळ्यात पुढे जातो ते बघण्याची नामी संधी कोण सोडणार ? जो तो जीव खाऊन पळायला लागला. अजेय चांगलाच जोरात पळत होता आणि त्याच्या मागे होता अभि. त्याच्या पाठोपाठ नंबर लावला होता सईने. सई इतकी छान पळते हे कोणालाच माहीत नव्हतं. अगदी स्वतः सईला सुद्धा. पण सगळे धावायला लागल्यावर ती पण पळायला लागली आणि बघता बघता तिने अभिला मागे टाकलं. त्या चिंचेच्या झाडापाशी आपणच सगळ्यात आधी पोहोचायचं असं बहुतेक तिचं तिनीच ठरवलं असावं. आणि जे आपलं आपण ठरवतो ते आपण करतोच. हो की नाही?
आता बहुतेक सई आपल्यालाही मागे टाकणार आणि ती चिंचेच्या झाडापाशी पहिल्यांदा पोहोचणार हे लक्षात आल्यावर अजेयनी आपला वेग वाढवला. आता स्पर्धा अगदी कट टू कट होती म्हणाना.
चिंचांनी झाड लगडलं होतं. झाड पाहूनच सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलं. सई एकदम न राहवून ओरडली “आई, मला चिंचा पाहिजेत.”
“पाहिजेत म्हणजे ? मी काय झाडावर चढू काय काय आता. काही नकोत चिंचा बिंचा. चला घरी.”
“ईआ, चिंचावाल्या काकांकडे चिंचा कुठून येतात ग?” “अरे सुमित, हा काय प्रश्न झाला का? अर्थातचझाडावरून” “पण झाडावरून त्यांच्या टोपलीत कशा येतात?”
या प्रश्नाचं उत्तर अभिचे बाबा देणार तेवढयात तमिसुच्या बाबानी त्यांना हातानीच थांबवलं. “कशा बरं येत असतील एवढया उंच झाडावरच्या चिंचा टोपलीत? ” सुमितच्या बाबांनी विचार करत करत म्हटल्यासारखं केलं. आता मुलांना चांगलंच खादय मिळालं होतं. मग काय मुलंच ती. ती थोडीच थांबणार. तर्क वितर्कांना उधाण आलं.
“मला वाटतं शिडी लावत असणार काका.” – अभि. “हो. हो. तसंच असणार” सईनी होकार भरला.
“ए मग चला आपण पण शिडीच आणूयात.” सई पुढे म्हणाली. “हो हो चला रे.” अभिने री ओढली.
आत्ता शिडी कुठे मिळेल याकडे चर्चा वळली. अभिच्या बाबांना मधेच बोलायची घाई होत होती पण तमिसुच्या बाबानी त्यांना परत थांबवलं.
“चला बच्चे कंपनी शिडी आणेल तोपर्यंत आपण मस्तपैकी चहा घेऊ.” ही कल्पना सगळ्याच पालक मंडळींना एकदमच पसंत पडली. मग काय चहा पिण्यासाठी पालक छोटयाश्या हॉटेलात गेले.
मुलांची चिंचांशी झटापट चालूच होती. “अरे पण इथे अचानक शिडी कुठे मिळणार?” उर्मीने सगळ्यांच्या मनातला प्रश्न विचारला.
“पण मी चिंचा,आवळेवाल्या काकांना शिडी घेऊन फिरताना कधी पाहिलेलं नाही. मला वाटतं की काहीतरी वेगळी आइडिया असणार.” – इति सुमित.
“नाही रे शिडी वगैरे काही नाही ते सरळ या पलिकडच्या छोट्या झाडावर चढत असतील. मग वर जाऊन त्यावरून शेजारच्या झाडावर उडी मारत असतील आणि मग खालचा माणूस त्यांना काठी देत असेल आणि मग काठीनी फांदी हलवून ते चिंचा काढत असणार.”
“चिंचावाले काका म्हणजे सुपरमॅन असतात माहित्येय. ते त्यापेक्षा सरळ असा हात उंच उंच…… खूप खूप उंच करतात. मग त्यांचा हात असा लां………ब होते आणि चिंचा काढतो.”
“नाहीच मुळी. हात कसा असा लां…………….ब होईल? ते मनात म्हणत असणार की मुलांना चिंचा किती आवडतात. मग त्यांना त्या दयायला नकोत का. मग झाडंच ते ऐकून असं लहान होत असणार आणि म्हणत असणार काढा चिंचा काका. पण आजचाच दिवस बरं का. रोज रोज मला असं छोटं होता येत नाही. आणि कोणाचं लक्ष नाही तोवरच चिंचा घ्या पटकन.”
ही कल्पनाच मुलांना इतकी आवडली की मुलं काही न बोलता शांत झाली. प्रत्येकाच्या डोक्यात छोटं झालेलं चिंचेचं झाड आलं आणि त्याच्या चिंचा तोडायला लागले पण सगळे मनातल्या चिंचा काढून संपल्यावर सगळे भानावर आले.
“मला काय वाटतंय ते एक लांब दोरी आणत असतील आणि त्याच्या टोकाला गोल करून तो असा वर उडवत असतील.” – अजेय. “किंवा ते पट्टी आणत असतील. नाही नाही खूप पट्ट्या आणत असतील आणि त्या वर फेकत असतील.” सईला प्रश्न पडला “ए पण आपल्याकडे ना शिडी आहे. ना दोरी ना पट्टी. आपण काय करूयात?”
“मला वाटतं की आपण खूप म्हणजे खूपच उंच उडी मारू आणि जो उंच उडी मारेल ना त्या झाडापर्यंत त्याला बाकीच्यांनी तसाच धरू वरच. मग हातालाच येतील ना चिंचा.” ही कल्पना पसंत पडल्यावर सगळयांनी उं……च उडी मारायला सुरूवात केली. उंच उडी गेलीच तर धरायला उर्मी थांबली होतीच. प्रत्येकाची उडी झाली की त्याच्यापाशी धावत जायची उर्मीने प्रयत्नांची शर्त केली खरी …… पण कुणाचीच उडी उंच जाईना. पुन्हा गाडी मूळ पदावर आली.
आता काय करावं. इतका खटाटोप केल्यावर चिंचा मिळाल्या नाहीत तर नाकच कापलं जाईल ना. परत एकदा जोमाने विचारचक्र चालू झालं की करावं तरी काय? वरून चिंचा जीभ काढून दाखवताय आणि टुक टुक करतायत असं वाटायला लागलं अभिला. मग रागाला येऊन त्यानी एक दगड उचलला आणि भिरकावला त्या लांब, वळसेदार चिंचेकडे. “ए, हे मस्त आहे. आपण दगड मारून चिंचा पाडू शकतो.” अजेयला साक्षात्कार झाला.
आता मुलांना चिंचा मिळवायचं त्यांच्या आवाक्यातलं तंत्र सापडलं होतं. मुलं पटापट छोटे दगड गोळा करायला लागली. उर्मींने एक बऱ्यापैकी दगड उचलला आणि उंच शेंडयावरच्या आकडयाच्या चिंचेवर नेम धरला. एक डोळा बंद करून त्या चिंचेवर लक्ष ठेवून तिनी दगड सोडला आणि …………………… त्या चिंचेला अजिबात धक्का न लागता तो सरळ पलिकडे गेला. सुमितचा दगड असाच चिंचेला न लागता पलिकडेच गेला. मग परत एकदा अभि सरसावला. त्याचाही दगड अजिबात चिंचेला लागला नाही. नेमबाजी म्हणजे किती अवघड असतं ते आता लक्षात यायला लागलं होतं.
तोवर आई बाबा पण चहा पिऊन परत आले. “काय पोरांनो एक दगड मारता येत नाही. चिंच पाडता येत नाही तुम्हाला. अरे, एकदम लांबच्या फांदीवर नेम नाही धरायचा. आधी जरा खालच्या फांदीवरच्या चिंचा टारगेट करूया. ते जमलं की मग उंचावरच्या. बघा मी कशा चिंचा पाडतो ते.” असं म्हणत अजेयच्या बाबानी दगड हातात घेतला. एका जरा खालच्या फांदीवरच्या चिंचेवर नेम धरला आणि जरा वेळ घेत, नेम धरत मग दगड भिरकावला. मुल आशेनी बघत होतीच. चिंच झेलायला सई धावली आणि चिंचेच्या बरोबर खाली ओंजळ करून उभी राहिली. पण……………………………… हे काय? अजेयच्या बाबाची पण तीच गत. त्यांचं अजिबात न जुमानता दगड तसाच खाली उतरला. आणि चिंच आपली वाऱ्यावर डुलत्येय. मज्जेत.
आता सुमितचा बाबा पुढे सरसावला, “काय हे, एवढी चिंच तुम्हाला पाडता येत नाही. मी दाखवतो. दे बरं तो टोकदार दगड इकडे.” मुलांनी लगेच एक टोकदार दगड शोधला आणि प्रामाणिकपणे दिला सुमितच्या बाबांच्या हातात. एक डोळा बंद करत अर्जुनासारखा नेम धरत बाबानी दगड हलकेच भिरकावला…………………… भिरकावला पण…………. अहो पण काय चिंच डुलत्येकी तिथल्या तिथेच. दगड एकटाच परत खाली. कुणाकुणाच्या आईनी आणि बाबांनी नेम धरला पण चिंचा काही खाली आल्या नाहीत.
सुमित – “काय हे बाबा, तू म्हणजे अगदी बोटच कापलंस माझं. ” “काय, मी तुझं बोट कापलं? कधी ?” “अरे खरं बोट नाही रे. नुसती म्हण आहे ना तसं म्हटलं मी.” “मग त्याला बोट कापलं नाही नाक कापलं असं म्हणतात.” “हो का ? सॉरी पण तेच म्हणायचं होतं मला अगदी नाकच कापलंस की तू माझं. साध्या चिंचा पाडता येत नाही तुम्हा बाबा लोकांना ?”
परत एकदा मुलं दगड मारून चिंचा पाडायचा प्रयत्न करायला लागली. मग काय मुलं, बाबा आणि आई सगळेच दगड मारायला सरसावले. चिंचेची चार पाचच बुटुक मिळाली असतील पण आज खरी मजा आली. चिंचा पाडणं एक कला आहे की शास्त्र या चर्चेत मोठे रंगले आणि चिंचा पाडताना आपण किती भारी आयडिया लढवल्या याचं तिखटमीठ लावून वर्णन करण्यात छोटे. थोडा तोल गेला, थोडा नेम चुकला, थोडं खरचटलं, थोडं रक्त आलं पण म्हणतात ना पडे झडे त्याचे दोन दोन वाडे. मग काय हरकत आहे थोडं पडायला ?
बाल मित्रानों तुम्हाल स्पर्धेसाठी थोडीशी मदत
मित्रानों या भल्यामोठ्या गोष्टीतील मुले शब्द वाचायला शिकली. आता आपण मराठीतील सर्वाधिक कठीण शब्द शोधु शकतो, ते लिहीण्याचा प्रयत्न करु शकतो, मग आपोआप वाचताही येतील नाही का. मग शोधा बघु मराठीतील सर्वाधिक कठीण शब्द
या कथेत म्हणींचाही वापर झालायं…. तुम्हाला माहिती आहेत म्हणी…. आहेत ना मग लिहा की म्हणी आणि त्यांचा अर्थ.
चिंचेचा उपयोग कशासाठी होतो, त्यात औषधी गुणधर्म आहेत का, कोणते, काढा की शोधून आणि पाठवा आम्हाला.
गुहागर न्यूजच्या स्पर्धेविषयी माहिती घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
चला लुटूया सुट्टीचा आनंद, स्पर्धेला नाही गुणांचा गंध, मनी हवा नवकल्पनांचा छंद