जिल्ह्यात सर्पदंशाच्या ६०३ तर ४०० हून अधिक विंचूदंशाची नोंद
गुहागर, ता. 28 : रत्नागिरी जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ होत असून यंदा थंडी आणि उन्हाळ्यातही सर्पदंशाच्या घटना घडल्या आहेत. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत ६०३ जणांना सर्पदंश झाला असून, ४०० हून अधिक जण विंचूदंशाची नोंद झाली आहे. याशिवाय माकड, कुत्रा, मांजर आदी प्राण्यांनी चावा घेतलेल्या घटनाही वाढत आहेत. वाढलेल्या तापमानामुळे साप थंड जागांच्या शोधात मानवी वस्तीकडे वळत आहेत. पावसाळ्यात साप, विंचू आणि इतर विषारी प्राणी मोठ्या प्रमाणात घरांच्या परिसरात व शेतांमध्ये आढळतात. त्यामुळे धोका वाढतो. Snake Bite Cases in Guhagar
तालुकानिहाय सर्पदंशाची आकडेवारी मंडणगड- १०, दापोली -१८२, गुहागर -५८, चिपळूण- ५२, संगमेश्वर -८०, रत्नागिरी- ८५, लांजा- ११६, राजापूर- १३
मागील वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत ५७५ सर्पदंशाच्या घटना नोंदल्या होत्या. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. मात्र, यंदा केवळ चार महिन्यांतच ६०३ घटना घडल्याने आरोग्य यंत्रणेपुढे आव्हान उभे राहिलेले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये सर्पदंश व विंचूदंश झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यात येतअसून, रुग्णांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी देवरुख ग्रामीण रुग्णालयात सर्पदंश झालेल्या एका वृद्ध महिलेवर वेळेत उपचार न झाल्याने तिचा मृत्यू झाला होता. त्या वेळी डॉक्टर उपलब्ध नसल्याचे ग्रामस्थांच मत आहे. या घटनेनंतर जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. रिक्त पदे तातडीने भरावीत, डॉक्टर वेळेत हजर नसल्यास कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. Snake Bite Cases in Guhagar

सर्पदंशाचे प्रसंग टाळण्यासाठी शेतात किंवा जंगलात जाताना काठीने जमिनीवर आवाज करीत जा, रात्री घराबाहेर पडताना सोबत बॅटरी ठेवा, घराची आणि परिसराची स्वच्छता करा, घरात आणि गोठ्यात उंदीर होणार नाहीत, याची काळजी घ्या. घराच्या भिंतींना किंवा जमिनीला पडलेल्या भेगा आणि बिळे सिमेंट बुजवून घ्या ग्रामीण भागात शक्यतो जमिनीवर झोपू नका, खाटेचा वापर करा. पावसाळ्यात झोपण्यापूर्वी अंथरूण-पांघरूण आणि गादी झटकून तपासा. Snake Bite Cases in Guhagar
