गुहागर, ता. 26 : रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने राजकीय संकेतांना गालबोट लावले. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशारा भाजपचे माजी आमदार आणि उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी दिला आहे.
नारायण राणेंच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यातील शिवसैनिकांकडून प्रतिक्रिया उमटल्या. रत्नागिरी जिल्ह्यातही संतप्त शिवसैनिकांनी पुतळे जाळले. ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात आला. अशा प्रतिक्रिया उमट असताना रत्नागिरी मध्ये नारायण राणेंची पोस्टरही फाडण्यात आली. त्याबाबत बोलताना डॉ. विनय नातू म्हणाले की, रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पक्षांचे राजकीय नेते यापूर्वी काही अलिखीत संकेत पाळत होते. त्यामुळे जिल्ह्याची एक वेगळी राजकीय संस्कृती होती. अनेकवेळा आंदोलने झाली, विषय झाले, निर्णय झाले. प्रसिद्धी झाली. त्यानंतर त्या त्या गटांनी विजयोत्सव, निषेध आदी व्यक्त केले. यावेळी पोस्टर फाडणे हा नवीन उपक्रम शिवसेनेने सुरु केला. पोलीस संरक्षणात शिवसेनेचे एक आमदारच कार्यकर्त्यांबरोबर पोस्टर फाडताना दिसले. शिवसेनेचेही पोस्टर लागतात. तेही कसे रहातील या पुढच्या काळात त्याचा विचार करावा लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील राजकीय संस्कृती बिघडविण्याचे काम शिवसेनेने सुरु केले आहे. याचे परिणाम शिवसेनेला भोगावेच लागतील. असा इशाराच यावेळी डॉ. नातूंनी दिला आहे.