भातगांव ग्रामपंचायत : अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्याची भेट
गुहागर ता. 10: संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गावातील निराधार महिलांना देण्याचा संकल्प जागतिक महिला दिनाचे दिवशी भातगांव ग्रामपंचायतीने केला आहे. अशी माहिती सरपंच सुशांत मुंढेकर यांनी दिली. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि निराधार महिलांना मदत अशा दोन उपक्रमांचे आयोजन ग्रामपंचायतीने केले होते. याच कार्यक्रमात ग्रामपंचायतीने गावातील दोन अंगणवाड्यांना धान्य साठवणूक साहित्य भेट दिले.
भातगांव ग्रामपंचायतीतर्फे महिला दिनी स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. हे प्रशिक्षण सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 असे पाच तास चालले. भातगांव येथील पूर्ण प्राथमिक केंद्र शाळेच्या मैदानात सकाळच्या सत्रात मुलींकडून योगा करुन घेण्यात आला. जुदो कराटेचे प्राथमिक शिक्षण देण्यात आले. दुपारच्या सत्रात शाळेच्या सभागृहात मुलींनी प्रत्यक्ष संरक्षणाचे धडे गिरवले. गुहागरमधील सोनाली वरंडे आणि त्यांच्या सहकारी जुही यांनी मुलींना कराटे, जुदो आणि योगाची माहिती दिली. आपण स्वत:चे संरक्षण कसे करु शकतो या संदर्भातील काही डावपेच मुलींना शिकवले. काही प्रात्यक्षिके करुन दाखवली. या प्रशिक्षणामध्ये गावातील 5 ते 10 वीच्या 43 विद्यार्थ्यांनींनी सहभाग घेतला.
सायंकाळी ग्रामपंचायतीतर्फे निराधार महिलांना साडी वाटप करण्यात आले. आजही भातगाव सारख्या ग्रामीण भागातील अनेक निराधार महिलांना सणासुदीच्या काळात नवे कपडे घेणे शक्य होत नाही. अनेक महिलांनी आपल्या तालुक्याचे ठिकाणही पाहिलेले नाही. अशा महिलांना आधार देण्यासाठी ग्रामपंचायत भातगांवने पुढाकार घेतला आहे. गावातील 32 निराधार महिलांना यावेळी सहावारी, पाचवारी साड्या, त्यांच्या मुलींसाठी ड्रेस मटेरियल सन्मानपूर्वक देण्यात आले. भातगावमधील देऊळवाडी आणि वडाची वाडी या दोन अंगणवाड्यांना 14 व्या वित्त आयोगातून धान्य, कडधान्य ठेवण्यासाठीचे साहित्य याच कार्यक्रमात देण्यात आले.
या कार्यक्रमांना सरपंच सुशांत मुंडेकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य अनुष्का फावरे, गायत्री जाधव, स्वरा मुंडेकर सखाराम पाष्टे, तलाठी कुळे, ग्रामसेवक पावरा, शाळेतील सर्व शिक्षक. गावातील जेष्ठ मंडळी आणि महिला मंडळ उपस्थित होते.