मुख्यमंत्री उद्धव ठाकरे : जनता कर्फ्यु समजुन निर्बंधाचे पालन करावे
गुहागर, ता. 13 : राज्यात बुधवारी, 14 एप्रिल रात्री 8 वाजल्यापासून 1 मे रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत 144 कलम लागु होणार आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य व्यवस्थांवर मोठा ताण आहे. त्यामुळे कोरोना विरुध्दचे युध्द रोखण्यासाठी या निर्बंधांची गरज आहे. कोरोना दूत बनुन आपण कोरोनाला मदत करायची. की, कोरोना योद्धा बनुन ही लढाई लढणाऱ्या सरकारला व राज्याती नागरिकांना साथ द्यायची हे ठरविण्याची वेळ आली आहे. त्यामुळे हे निर्बंध जनता कर्फ्यु समजून प्रत्येकाने पाळावेत असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. For Next 15th Day Section 144 rule out in Maharashtra
आरोग्य व्यवस्थांवर ताण
सामाजिक माध्यमांद्वारे जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, राज्यात कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. आज दिवसाभरात 60212 कोरोना रुग्णांची नोंद राज्यात झाली. गेल्यावर्षी मार्च महिन्यात राज्यात कोरोना तपासणीसाठी केवळ 2 प्रयोगशाळा होत्या. आज 523 प्रयोगशाळा असुनही कोरोना चाचण्याचे अहवाल येण्यास उशीर होत आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत यावेळी बेडची संख्या जास्त (3 लाख 50 हजार) आहे. कोविड केअर सेंटर 2665 वरुन 4 हजार वर गेली आहेत. तरी देखील वाढत्या रुग्णसंख्येसमोर या सुविधा कमी पडत आहेत. राज्यात 1200 मेट्रीक टन ऑक्सिजनचे उत्पादन होते. 100 टक्के ऑक्सिजन आपण आरोग्य विभागासाठी आज वापरत आहोत. आज दररोज 950 मेट्रीक टन ऑक्सिजन आपण वापरतोय. पण रुग्णसंख्या वाढु लागली तर आणखी ऑक्सिजनची व्यवस्था उभी करावी लागणार आहे. आज राज्यात दरदिवशी 40 ते 50 हजार रेमडिसिवीर इंजेक्शन वापरली जात आहेत. हे औषध तयार करण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे या औषधाचाही तुटवडा भासु शकतो. एकूणच आरोग्य विषयक व्यवस्थांवर मोठा ताण येऊ शकतो अशी आजची कोरोना रुग्णसंख्येची स्थिती आहे.
लसीकरणाचे वेग वाढवलाय
गेल्यावर्षी कोविडची सुरवात झाली तेव्हा साधारणत: रुग्णसंख्येच्या वाढीवरुन किती दिवसांत किती रुग्णवाढ होईल याचे अंदाज बांधता येत होते. आपण त्या अंदाजपेक्षा कोरोनाबाधितांची संख्या कमी ठेवण्यात यशस्वी झाला. मात्र आज आलेली दुसरी लाट भयावह आहे. अंदाज चुकत आहेत. कोरोनावर आज तरी औषध नाही. लसीकरणातून मनुष्याची प्रतिकारण शक्ती वाढवणे हा एकमात्र आणि आवश्यक उपाय आहे. त्यामुळे राज्यात लसीकरणाचा वेग आपण वाढवलाय. परंतू या लसिकरणातून ॲण्डीबॉडीज तयार होण्यास किमान दोन आठवड्याचा कालावधी लागतो. त्यामुळे लसिकरणाचा फायदा दुसऱ्या लाटेसाठी होणार नाही. तिसऱ्या लाटेचा वेग आपण कमी करु शकतो.
कोरोना विरुध्दचे युध्द जिंकण्यासाठी पुढे या
आपण आरोग्य सुविधा (ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, आयसोलेशन वॉर्ड) वाढवतोय. परंतू आरोग्य खात्याला मनुष्य बळाची कमतरता भासत आहे. सध्या वैद्यकिय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण सोबत घेतल आहे. पण त्याचबरोबर निवृत्त डॉक्टर, सिस्टर, आरोग्य सेवक, खासगी डॉक्टर, आरोग्य विषयक काम करणाऱ्या संस्था यांनीही सरकारच्या मदतीसाठी समोर यावे.
15 दिवस निर्बंधांचे
विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळ नको म्हणून आपण दहावी, बारावी, एमपीएससीच्या परिक्षा पुढे ढकललल्या. पण आपल्या आयुष्याला पुढे ढकलु शकत नाही. गेले आठवडाभर अनेकांजवळ चर्चा केल्या, सर्व पक्षांजवळ बोललो. टास्क फोर्ससोबत चर्चा केली. सर्व मत, मतांतरे ऐकून घेतली. आता ठोस, कठीण निर्णय घेण्याची वेळ आली आहे. आजची वेळ निघून गेली तर मदतीला कोणी येऊ शकणार नाही. त्यामुळे बुधवारी संध्याकाळपासून ब्रेक द चेनचे अभियान आपण राबवत आहोत. राज्यात 144 कलम लागु करत आहोतो. पुढचे 15 दिवस राज्यात संचारबंदी असेल. अनावश्यक फिरणे बंद. कोणीही घराबाहेर पडू नका ही माझी विनंती. हा जनता कर्फ्यु आहे असे जनतेने ठरवावे. आपण कोरोनाला साथ द्यायची की, नागरिकांना हे ठरवले पाहिजे. कोरोनाला साथ देवून कोरोना दूत बनु नका तर महाराष्ट्रातील नागरिकांसाठी, कोरोना विरुध्द लढणाऱ्या सरकारला मदत करण्यासाठी कोराना योद्धे बना.