ग्रामस्थांच्या भावना, जामसुतचे सरपंच संतोष सावंत यांचे निधन
गुहागर, ता. 29 : तालुक्यातील जामसुत गावचे सरपंच आणि शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख, मराठा समाजाचे कार्यकर्ते संतोष यशवंत सावंत यांची कोरोना विरुध्दची झुंज अपयशी ठरली. बुधवारी रात्री 11.30 वा. रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात त्यांचे निधन झाले. एकत्र कुटुंबात रहाणाऱ्या संतोष सावंत यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन मुली, भाऊ, वहिनी आणि दोन पुतणे असे कुटुंब आहे. संतोषच्या निधनाने जामसुत गावावर शोककळा पसरली आहे. गावाच्या विकासाचा दृष्टीकोन असलेला सरपंच हरपला अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
जामसुतमधील ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर संतोष तथा बाबु सावंत यांची सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली. सरपंच झाल्यानंतर गावाच्या विकासाचा दृष्टीकोन त्यांनी गावासमोर ठेवला. गावातील प्रत्येक वाडीला जोडणारा रस्ता, पथदिप, प्रत्येक वाडीला मुबलक पाणी पुरवठा व्हावा म्हणून पिंपरच्या धरणातून पाणी आणणारी नवी पाणी योजना ही कामे पुढील पाच वर्षात करण्याचे बाबु सावंत यांचे स्वप्न होते. सरपंच झाल्यावर ग्रामपंचायतीच्या नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळाही त्यांनी दिमाखात साजरा केला होता. . गेले 15 दिवस ते कोरोनाशी लढत होते. सुरवातीला शृंगारतळीतील रेनबो लॉज येथील कोरोना रुग्णालयात ते उपचार घेत होते. मात्र तब्येत खालावू लागल्याने अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री 11.30 वा. त्यांचे निधन झाले. आज त्यांचे निधन झाल्याने जामसुत गावावर शोककळा पसरली आहे.


संतोष सावंत यांच्या आठवणी जाग्या करताना सुधीर जामसुतकर म्हणाले की, संतोष तापट स्वभावाचा पण तितकाच हळवा होता. सरपंचपदी निवड झाल्यावर त्याने आपला स्वभाव बदलण्यास सुरवात केली होती. मी तापलो तर फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवा असे त्यांने आपल्या सहकाऱ्यांना सांगुन ठेवले होते. धडाडीने काम करण्याची पध्दत असल्याने अनेकवेळा सोबत कोणीही नसले तरी त्या कामाच्या पुर्ततेसाठी झुंझायचे हा त्याचा आणखी एक स्वभावधर्म. पण सरपंच झाल्यावर सर्वांना सोबत घेवून जाण्याची कला त्याने आत्मसात केली.
आक्रमक वृत्तीचा बाबु मदतीसाठी कायम तत्पर असायचा. जामसुत गावाचे ग्राममंदिराचा जीर्णोध्दार सुरु होता तेव्हा बाबुचे कायम त्या कामावर लक्ष होते. बांधकामासाठी साहित्य अपुरे आहे असे लक्षात आले तर कोणाचीही वाट न पहाता त्याने कामगारांना साहित्य आणून दिले. कामगारांची चौकशी करणे, त्यांच्याजवळ पुरेसे धान्य आहे ना ते पहाणे अशा अनेक गोष्टी बाबुने केल्या. मंदिर जीणोध्दारामध्ये त्याचा सिंहाचा वाटा होता.
20 दिवसांपूर्वी गावातील एका चाळीशीतील ग्रामस्थांचे निधन झाले. त्याची कोरोना तपासणीही झाली नव्हती. तरीही ग्रामस्थ अंत्यसंस्कारांसांठी समोर येत नव्हते. त्यावेळी सरपंच पदाची झुल बाजुला ठेवून बाबु मदतीला धावला. आपल्या स्वत:च्या वाहनाने त्या ग्रामस्थांचा मृतदेह बाबुने स्मशानापर्यंत नेला. अंत्यसंस्कार पूर्ण केले.
गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये जामसुत गावातील एका रुग्णाचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण गाव सील करण्यात आले होते. मुंबई, पुणे व अन्य गावातून ग्रामस्थ जामसुतला मुळ घरी रहायला आले होते. अशा परिस्थिती गावातील प्रत्येक घरात रोज अन्न धान्य लागायचे. त्यासाठी बाबु सावंत यांनी घरपोच सेवा सुरु केली. गावातल्या प्रत्येक वाडीतील घरामध्ये किराणामाल, औषध आदी सामान पोचवण्याचे काम ते स्वत: करत होते. असा कायम दुसऱ्याच्या मदतीला धावणारा गावातला कार्यकर्ता अकाली गेला. त्याच्या जाण्याने सावंत परिवाराबरोबरच जामसुत गावाचेही मोठे नुकसान झाले आहे. आम्ही एक चांगला मित्र गमावला आहे. असे सांगताना सुधीर जामसुतकरही भावूक झाले होते.