गुहागर, ता. 29 : रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर व लाडघर समुद्रकिनाऱ्याबरोबर राज्यातील आणखी ३ समुद्रकिनाऱ्यांची आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी तत्वतः मान्यता मिळाल्यानंतर आता मानांकनाची तयारी सुरू झाली आहे. यामधील राष्ट्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने पहिल्या टप्यात समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट सुरू झाले असून यात गुहागर समुद्रावरील ३०० मीटरचे क्षेत्र तर लाडघर समुद्रावरील ६४५ मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे पहिल्याच तपासणीमध्ये समोर आले आहे. Safe area for swimming on Guhagar beach
राज्य सरकारचा कोकण विभागासाठी हा पहिलाच प्रयोग आहे. यामुळे निवड करण्यात आलेली गुहागर, लाडघर, श्रीवर्धन, नागाव व पर्णका (डहाणू) हे पाचही समुद्रकिनारे कोणत्याही परिस्थितीत ब्ल्यू फ्लॅग मानांकन करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. या मानांकनाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय पर्यावरण विभागाच्यावतीने बिश्वजित देव यांनी गुहागर व लाडघर या दोन समुद्रकिनाऱ्यांचे सुरक्षा ऑडिट केले. गुहागर समुद्रकिनारा हा ७ किलोमीटर लांब आहे. मात्र ब्ल्यू फ्लॅग मानांकनासाठी ६०० मीटरचे क्षेत्र विकसित केले जाणार आहे. Safe area for swimming on Guhagar beach

बिश्वजित देव यांनी संपूर्ण समुद्र किनाऱ्याची पाहणी केली. यामध्ये गुहागर पोलीस परेड मैदानाच्या मागील बाजूच्या भागातील समुद्रामधील ३०० मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर लाडघरमधील ६४५ मीटर क्षेत्र पोहण्यासाठी सुरक्षित असल्याचे समोर आले असून अजूनही अंतिम निर्णय देण्यात आलेला नाही. केलेल्या सुरक्षा ऑडिटमध्ये गुहागर शहरात येणाऱ्या रानवी गुहागर, मोडकाघर गुहागर, गुहागर कोर्ट कीर्तनवाडी व शिवाजीचौक मार्ग यांची पाहणी करून कनेक्टीव्हीटी निश्चित करण्यात आली. गुहागर समुद्रकिनाऱ्यावर जाणारे सर्वच मार्ग तपासणी करण्यात आली असून यातून ६ मार्ग निश्चित केले जाणार आहेत. प्रमुख मंदिरे पोलीस परेड मैदान यांची पाहणी केली. सलग ७ किलोमीटरच्या या किनाऱ्याची सध्याची जागेची पातळी तसेच समुद्रकिनाऱ्यालगत असलेली गुहागर नगर पंचायतची जागा पाहण्यात आली. पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृहाची जागा, विविध खाद्याचे स्टॉल उभारणीसाठी दोन ते तीन जागांची पाहणी केली गेली. समुद्रावरील अर्धवट तुटलेली जेटी काढून टाकणे किंवा तिथेच चांगल्या पद्धतीची फ्लोटींग जेटी, किंवा सुशोभिकरण असे विविध पर्याय निवडले जाणार आहेत. भरती-ओहोटीची माहिती, डीजीटल बोर्ड, कासव संवर्धन या सर्वच विषयाची पाहणी करण्यात आली. Safe area for swimming on Guhagar beach
गुहागरसाठी ३ जीवरक्षकांची नेमणूक केली जाणार असून ३ वॉच टॉवर उभारले जाणार आहेत. त्यासाठी आवश्यक असलेले सुरक्षा किटही पुरवले जाणार आहे. लाडघर येथील समुद्रकिनाऱ्यावरही अशाच पद्धतीच्या समुद्रावरील सुरक्षेच्या दृष्टीने पाहणी करण्यात आली असून या दोन्ही समुद्रकिनाऱ्याचे सुरक्षा ऑडिट अहवाल लवकरच सादर केले जाणार आहे. गुहागर, लाडघर पाठोपाठ श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्याचेही सुरक्षा ऑडिट करण्यात आले आहे. सुरक्षा ऑडिट अहवालानंतर या समुद्रकिनाऱ्यावरील प्रत्येक सोयीसुविधा उभारण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करणार असून यासाठी निवड केलेल्या त्या भागातील जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे. Safe area for swimming on Guhagar beach
