गुहागर, ता. 29 : तालुक्यातील तवसाळ गावचे सुपुत्र तथा यशस्वी इलेक्ट्रिकल व्यावसायिक सचिन विश्वनाथ सुर्वे (वय ५०) यांचे अल्पशा आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. गेली सहा वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते. Sachin Surve is No More
सचिन सुर्वे हे भारतीय जनता पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस व गुहागर पंचायत समितीचे उपसभापती निलेश सुर्वे यांचे मोठे बंधू होते. हेदवी येथे वास्तव्यास असलेल्या सुर्वे यांनी सुरुवातीला विकास जोगळेकर यांच्याकडे इलेक्ट्रिकल कामातून कारकिर्द सुरू केली. त्यानंतर स्वतःचा इलेक्ट्रिकल व्यवसाय उभारून त्यांनी हेदवी पंचक्रोशीत यशस्वी व्यावसायिक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली.
व्यवसायासोबतच नाटक, तमाशा, भजन तसेच विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांमध्ये ते नेहमी अग्रेसर असत. अजातशत्रू आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या निधनाने तवसाळ, हेदवी पंचक्रोशीसह सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील, काका व भाऊ असा परिवार आहे. तवसाळ येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. Sachin Surve is No More
यावेळी माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष केदार साठे, पंचायत समिती सभापती प्रणव पोळेकर, सदस्य मंगेश जोशी, संदीप गोरिवले यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पार्थिवाचे दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. Sachin Surve is No More
