कोविड संकटात रा.स्व.संघ जनकल्याण समितीची भेट
गुहागर, ता. 7 : रा. स्व. संघ जनकल्याण समितीने गुहागरच्या ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिले आहे. ही भेट संघाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (ता. 7) ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकिय अधिकारी डॉ. बळवंत व मुख्य परिचारिका सौ. अनिता मालप यांच्याकडे सुपूर्त केली. यापूर्वी शृंगारतळी कोविड रुग्णालयालाही जनकल्याण समितीने एक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट दिला होता.
नैसर्गिक आपत्तीमध्ये पुढाकार घेवून काम करणाऱ्या रा. स्व. संघाच्या जनकल्याण समितीतर्फे अनेक सेवा प्रकल्प चालविले जातात. गुहागर तालुक्यातील 20 जिल्हा परिषद शाळांमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा उपक्रम राबविला जातो. तर शृंगारतळी येथे रुग्णोपयोगी साहित्य केंद्रामार्फत अत्यंत कमी दरामध्ये रुग्णांना साहित्य भाड्याने दिले जाते. असे अनेक प्रकल्प जनकल्याण समितीतर्फे राज्यात सुरु आहे.
कोरोना संकटातही संघ कार्यकर्त्यांनी मार्च 2020 पासून अनेक ठिकाणी कोरोना रुग्णांना मदत करणे, शहरांमधील दाट वस्तींच्या भागात तपासणी करणे, कोविड केअर सेंटर चालविणे अशी अनेक कामे सुरु केली. दुसऱ्या लाटेत राज्यातील ग्रामीण भागात ऑक्सिजनची कमतरता भासू नये म्हणून तातडीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करुन देण्याचा उपक्रम सध्या जनकल्याण समितीद्वारे सुरु आहे. याच उपक्रमाचा भाग म्हणून गुहागर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देण्यात आले.
गुहागर तालुक्याचे संघचालक डॉ. मंदार आठवले, प्रथमेश पोमेंडकर, प्रतिक कदम, केदार खरे, ऋषिकेश भावे आणि मयुरेश पाटणकर या संघ कार्यकर्त्यांनी हे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर ग्रामीण रुग्णालयाच्या स्वाधिन केले.
(ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट देतानाचा व्हिडिओ पहा.)