गुहागर, दि. 21 : महाराष्ट्रात लागू झालेल्या आदेश अधिक कडक करत रत्नागिरी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी नवे प्रतिबंधात्मक पुरवणी आदेश प्रसिध्द केले आहेत.
कोरोना विषाणू (कोव्हीड–19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश ( पुरवणी आदेश )
शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) (Covid 19) (Corona) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासुन लागु करुन खंड 2,3,4 मधील तरतूदींनूसार अधिसूचना निर्गमीत केलेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू संक्रमण हा जागतिक साथीचा रोग (World Pandemic) घोषित केला असून, शासन, सार्वजनिक आरोग्य विभागाकडील अधिसूचनेद्वारे करोना विषाणूचा प्रसार रोखण्याकामी “महाराष्ट्र कोविड-19 उपाययोजना नियम 2020” प्रसिध्द केलेले आहेत.
शासनाकडील दिनांक 13 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशास अनुसरुन या कार्यालयाकडील दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशान्वये कोरोना विषाणू (कोव्हीड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आले आहेत. महाराष्ट्र शासनाकडील आदेश No.DMU/2020/CR.92/DisM-1, दिनांक 20 एप्रिल 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, मटण, चिकन, पोल्ट्री, मासे आणि अंडीपदार्थ विक्री दुकाने, कृषी अवजारे व शेतातील उत्पादनाशी संबंधीत दुकाने ही सकाळी 07.00 वा. ते सकाळी 11.00 वा. पर्यंत खुली ठेवण्यास परवानगी दिलेली आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम-2005 भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम – 1897 व महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम – 2020 ची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच 20 एप्रिलच्या च्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी ठोस उपाययोजना करणेचे दृष्टीने यापूर्वी जारी केलेल्या दिनांक 14 एप्रिल, 2021 रोजीच्या आदेशास पुढे पुरवणी आदेश काढणे आवश्यक असल्याने लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण रत्नागिरी खालीलप्रमाणे आदेश जारी करत आहेत.
1. रत्नागिरी जिल्हयामधील वैद्यकीय, आरोग्य सुविधा व मेडीकल दुकाने पुर्णवेळ खुली राहतील.
2. नगरपालिका / नगरंपचायत हद्दीमध्ये तसेच ग्रामीण भागातील ज्या गावाची लोकसंख्या 5000 पेक्षा जास्त आहे, ज्या भागामध्ये शहरीकरण वाढत आहे, अशा ठिकाणी किराणा माल दुकाने, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने,व इतर दुकाने ही दिवसभर बंद राहतील. त्यांना केवळ घरपोच अन्नधान्याचे व सामानाचे वितरण करता येईल.
तथापि, सदर भागात भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, विक्रेत्यांसाठी त्यांच्या मालाची विक्री सकाळी 07.00 वा. ते 11.00 वा.पर्यंत करता येईल. 11.00 वा. नंतर दुकाने पूर्णपणे बंद राहतील. त्यासाठी त्याची RTPCR / RAT / – Ve Test Report दर्शनीय भागात लावणे बंधनकारक असेल, इतर वेळी सदर व्यवसाय बंद राहील.
3. ग्रामीण भागामध्ये ( 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेली गावे ) सर्व प्रकारची दुकाने किराणा माल दुकाने, भाजीपाला दुकाने, फळ विक्रेते, दुध डेअरी, बेकरी, मिठाई खाद्य दुकाने, सकाळी 07.00 वा. ते 11.00 वा.या कालावधीसाठी खुली राहतील व त्यांना याच कालावधीत विक्री करता येईल, इतर कालावधीसाठी सदर दुकाने विक्रीसाठी बंद राहतील.
4. शासकीय स्वस्त धान्य दुकाने व केरोसीन दुकाने सकाळी 07.00 वा. ते 11.00 पर्यंत चालू राहतील.
5. वरील सर्वांसाठी होम डिलेव्हरी सकाळी 7.00 वा. ते रात्रो 8.00 वा.पर्यंत लागू राहील. घरपोच सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचारी यांचे लसीकरण करणे / RTPCR / RAT चाचणी करणे बंधनकारक राहील त्याबाबतचे प्रमाणपत्र त्यांना स्वत: कडे बाळगणे आवश्यक राहील.
उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय साथरोग अधिनियम 1897 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील तरतुदीप्रमाणे कारवाई करण्यात येईल याची नोंद घेण्यात यावी. सदरचा आदेश संपुर्ण रत्नागिरी जिल्ह्याच्या क्षेत्रासाठी (प्रतिबंधीत क्षेत्र वगळून) लागू राहील.