प्रविण डोंगरदिवे : गणेशोत्सव साजरा करतांना नियम पाळा
मुंबई : मागील दोन वर्षे संपूर्ण जगासाठी कोरोनामुळे संकटाची गेली. आपल्या राज्यात वर्षाच्या सुरुवातीपासून वर्षाच्या अखेरपर्यंत सणवार साजरे करण्याची मोठी परंपरा आहे. कोरोनाच्या महामारीमुळे गेली दोन वर्षे एकही सण जल्लोषात अथवा उत्साहात साजरा झाला नाही. जनतेच्या संरक्षणासाठी शासनाने लावलेले निर्बंध, यामुळे उत्साह कमी झाला. यावर्षीचा गणेशोत्सवही शासनाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार करावा. असे आवाहन विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग, नवी मुंबईचे माहिती सहाय्यक प्रविण डोंगरदिवे यांनी केले आहे.


प्रविण डोंगरदिवे यांनी केलेल्या आवाहनात म्हटले आहे की, सण, उत्सव, महात्म्यांच्या जयंत्या, देव धर्माच्या वाऱ्या, पारंपारिक जत्रा, मेळावे या सर्व गोष्टींवर कोरोनाचा प्रदूर्भाव रोखण्याच्या उद्देशाने निर्बंध लावण्यात आले होते. गेली दोन वर्षे लोकांनी शासकीय निर्बंधाचे पालन केले. कोरोना, कोरोनाचे विविध प्रतिरुप, म्युकरमायकोसीस, डेल्टा प्लस असे नवनवीन संसर्ग तयार होत आहेत. शासन आपल्या परीने कसोशीचे प्रयत्न करून या संकटाचा सामना करीत आहे. कोरोना सोबतच चक्रीवादळ, अतीवृष्टी, दुष्काळ या सारख्या नैसर्गिक अपत्तींनाही तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत शासनाला जनतेकडून सहकार्याची अपेक्षा आहे. कारण लावण्यात आलेले निर्बंध हे केवळ जनतेच्या संरक्षणासाठी आणि जनतेच्या भल्यासाठीच आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात ही शासनाला जनतेकडून असेच सहकार्य अपेक्षित आहे. आणि जनतेकडून ते मिळेलच.


कोकणातील गणेशोत्सव हा सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरेचा वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे. हा उत्सव दिवाळी पेक्षाही मोठया उत्साहाने सर्व तयारीनिशी साजरा केला जातो. कोकणात सार्वजनिक आणि घरगुती गणपतींचे आगमन हा एक जल्लोषच असतो. गावांतील 40-50 कुटुंबीयांचे गणपती एकत्रित डोक्यावरून वाहून नेतात. यातून कोकणातील संघटित उत्सवाचे स्वरूप लक्षात येते. सार्वजनिक गणपतीच्या तुलनेत घरगुती गणपतीचे प्रमाण अधिक असते.
कोकणातील गणेशोत्सव हा अर्थकारणांचा मोठा स्रोत आहे. या कालावधीत शहरांतून मोठय़ा प्रमाणात भाविक आपआपल्या गावी येतात. त्यामुळे कोकणातील रेल्वेसह सर्व वाहतुक व्यवस्थेची तयारी प्रशाससनामार्फत आधीपासूनच केली जाते. यंदाही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे इतर सणांप्रमाणेच अत्यंत साध्या पध्दतीने गणेशोत्सव साजरा करावा असे शासनाने जनतेला आवाहन केले आहे. कोकणावर ज्या ज्या वेळी नैसर्गिक आपत्तीमुळे संकट आले त्या त्यावेळी शासनाने कोकणाला सर्वतोपरी मदत केलेली आहे. सध्याच्या गणेशोत्वासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सुविधा पुरवित आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने गणेशोत्सव साजरा करण्याकरिता काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन उत्सव साजरा केला जावा अशी अपेक्षा आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी सर्व संबंधित सार्वजनिक गणेश मंडळांनी महापालिका/स्थानिक प्रशासनाची त्यांचे स्थानिक धोरणानुसार यथोचित पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, तसेच मा.न्यायालयाने निर्गमित केलेले आदेश आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासन यांचे मंडपाबाबतचे धोरण यांच्याशी सुसंगत असे मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारण्यात यावेत. यावर्षीचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करणे अपेक्षित असल्याने घरगुती तसेच सार्वजनिक गणपतीची सजावट करताना त्यात भपकेबाजी नसावी. श्री गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता 4 फूट व घरगुती गणपतीसाठी 2 फुटाच्या मर्यादित असावी.
यावर्षी शक्यतो पारंपरिक गणेशमूर्ती ऐवजी घरातील धातू संगमरवर आदि मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची, पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्याघरी करावे. घरी विसर्जन करणे शक्य नसल्यास नजीकच्या कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यात यावे. गणेश मूर्तीचे विसर्जन पुढे ढकलणे शक्य असल्यास त्या मूर्तीचे विसर्जन माघी गणेशोत्सव विसर्जनाच्यावेळी किंवा 2021 च्या भाद्रपद महिन्यात म्हणजेच पुढील वर्षाच्या विसर्जनाच्यावेळी करता येणे शक्य आहे. जेणेकरून श्री गणेशाचे आगमन/ विसर्जनासाठी गर्दीत जाणे टाळता येऊ शकते. यामुळे स्वतःचे व कुटुंबीयांचे कोरोना साथीच्या रोगांपासून रक्षण होईल.
उत्सवाकरिता देणगी/ वर्गणी स्वेच्छेने दिल्यास त्याचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक उपक्रम/ शिबिरे उदा. रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू असे आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय त्याचप्रमाणे स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी. आरती, भजन, कीर्तन व अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही तसेच ध्वनिप्रदूषण संदर्भातील नियमांचे व तरतुदींचे पालन करण्यात यावे.
श्री गणेशाच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन केबल नेटवर्क वेबसाईट व फेसबुक इत्यादींद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी. गणपती मंडपामध्ये निर्जंतुकीकरण करावे तसेच थर्मल स्क्रीनिंग ची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी. प्रत्यक्ष येऊन दर्शन घेऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी शारीरिक अंतराचे (फिजिकल डिस्टेंसिंग) तसेच स्वच्छतेचे नियम मास्क, सँनीटायझर इत्यादी पाळले जाईल, याकडे विशेष लक्ष देण्यात यावे.श्री च्या आगमन व विसर्जन मिरवणूका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जन स्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि वरिष्ठ नागरिकांनी सुरक्षेच्यादृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील अथवा इमारतीतील सर्व घरगुती गणेशमूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रित काढण्यात येऊ नये. महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था आदींच्या मदतीने कृत्रिम तलावाची निर्मिती करण्यात यावी.
कोविड-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरू होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्याचे देखील अनुपालन करावे. अशी शासनाची अपेक्षा आहे. गृह विभागाने काढलेल्या या सुचनांमध्ये आगामी काळात काही बदल होऊ शकतो अथवा नवे नियम देखील येवू शकतात त्यानुसार गणेशोत्सवाचे नियोजन करणे योग्य असणार आहे.