गुहागरमधील घटना : रुग्णवाहिकेतून मृतदेह नेण्यास प्रशासनाचा नकार
गुहागर, ता 19 : गुहागर तालुक्यात कोविड रुग्णालय नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात आता शववाहिनी नसल्याने कोरोनाग्रस्तांच्या मृतदेहाला देखील अंत्यसंस्कारांसाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. सोमवारी सकाळी ग्रामीण रुग्णालय गुहागर येथे कोरोनाग्रस्त वृध्दाचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेण्यासाठी ग्रामस्थ आले. मात्र शववाहिनी नसल्याने 5 तास ग्रामस्थांना ताटकळत थांबावे लागले. ग्रामीण रुग्णालयासमोर उभी असलेली रुग्णवाहिना तांत्रिक कारणांमुळे मृतदेह नेण्यासाठी वापरण्यास प्रशासनाने नकार दिला.


गुहागर तालुक्यातील त्रिशुळ साखरीमधील कासार नावाच्या वृद्ध दाम्पत्याला कोरोना झाला होता. पतीपत्नी गुहागरमधील डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये उपचार घेत होते. या उपचारांमध्ये 15 एप्रिलला महिलेचे निधन झाले. तर 19 एप्रिलला सकाळी 11 च्या सुमारास कासार आजोबांनीही अंतिम श्र्वास घेतला. ही बातमी त्रिशुळसाखरीत समजली आणि आजोबांचे शव ताब्यात घेण्यासाठी सरपंच सचिन म्हसकर यांच्यासह ग्रामस्थांनी गुहागर ग्रामीण रुग्णालय गाठले. मृतदेह ताब्यात घेण्याच्या कागदपत्रांची पूर्तता ग्रामस्थांनी केली. परंतु शववाहिनी आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात मिळणार नाही. असे जणू आदेशच व्यवस्थापनाने दिले.


गुहागर तालुक्यात शववाहिनी नाही हे ग्रामीण रुग्णालय प्रशासनाला माहिती आहे. तरीही असे सांगण्यामागचे कारण ग्रामस्थांना कळले नाही. कायद्याप्रमाणे रुग्णवाहिनेमधुन मृतदेहाची वहातूक करता येत नाही. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयाने आपली रुग्णवाहिका देण्यास नकार दिला होता. आता फक्त एकच पर्याय होता तो म्हणजे शृंगारतळीतून खासगी रुग्णवाहिका मागविणे. त्यासाठी संपर्क साधला गेला. तेव्हा सदरची रुग्णवाहिका एका रुग्णाला चिपळूणला सोडण्यासाठी गेल्याचे समोर आले. ती रुग्णवाहिका पुन्हा शृंगारतळीला आल्यानंतर गुहागर ग्रामीण रुग्णालयात आली. तोपर्यंत सायंकाळच ४ वाजले होते. ५ तास कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात वाहनाची प्रतिक्षा करत होता. अखेर ग्रामस्थांनी ४ वा. आलेल्या खासगी रुग्णवाहिकेतून मृतदेह गावात नेला. तेव्हा गावात सकाळपासून अंत्यसंस्कारांसाठी जमलेल्या लोकांनी सुटकेचा श्र्वास सोडला. कोविडच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे गावकऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
गुहागर तालुक्यात सातत्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. मृतांचे प्रमाणही पहिल्या लाटेपेक्षा अधिक आहे. पहिल्या लाटेमध्ये कोरोनाग्रस्तांवर शासकीय व्यवस्थाच अंत्यसंस्कार करत होती. दुसऱ्या लाटेत काही ठिकाणी मृतदेह नातेवाईक, ग्रामस्थ यांच्या ताब्यात दिले जात आहेत. त्यामुळे गुहागर तालुक्यातही शववाहिनी असणे आवश्यक बनले आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांसाठी कोविड सेंटर, हेल्थ सेंटर, सशुल्क कोविड रुग्णालय अशा व्यवस्थांबरोबरच शववाहिनीची देखील व्यवस्था शासनाने करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान तालुक्यातील एका अधिकाऱ्याने एका खासगी कंपनीकडे सामाजिक दायित्व निधीतून शववाहिनीची मागणी केली आहे.