जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांची सूचना
रत्नागिरी : रत्नागिरी पर्यटन विकासासाठी सातत्यपूर्ण कार्यक्रमांची शृंखला करण्याबाबत कल्पना आणि मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मांडल्या आहेत. पुढील उपक्रमांची दिशा ठरविण्याबाबत लवकरच एकत्रित बैठकीचे नियोजन करण्याबाबत सूतोवाच केले. कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात तातडीने घेण्याच्या सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत. त्यामुळे जागतिक वारसास्थळांकडे वाटचाल करणाऱ्या कातळशिल्प आणि शोधकर्त्यांना बळ मिळाले आहे.
Ratangiri District Collector Dr. B.N. Patil visited villeage Chave, Deud and Ukshi (tal. Ratnagiri) and seen heritage KATALSHILP. They taken a imp decision to note katalshilp in villege record. They also said, we have to arrange serise of programs for development of tourism.
जिल्हाधिकारी डॉ. पाटील व सौ. पाटील यांनी रत्नागिरी तालुक्यातील चवे, देउड व उक्षी गावातील अश्मयुगीन कातळशिल्प ठिकाणांना भेट दिली. त्यावेळी निसर्गयात्री संस्थेच्या कार्यकर्त्यांनी चवे, देउड इथे चालू असलेल्या कातळशिल्प संरक्षण संवर्धन प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकल्प पूर्ततेसाठी सर्व सहकार्य लाभेल, असे आश्वासन संस्था सदस्यांना दिले.
या वेळी चवे गावचे सरपंच दीपक गावणकर, देउड गावचे सरपंच संजय देसाई, पोलिसपाटील संदेश घाणेकर आणि परिसरातील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधताना लोकसहभागातून परिसर विकास यावर भर देण्याबाबत डॉ. पाटील यांनी मार्गदर्शन केले.
या वेळी कातळशिल्प संरक्षण संवर्धनासाठी ज्यांनी पहिले पाऊल उचलले ते माजी सरपंच मिलिंद खानविलकर, उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्यासह सरपंच सौ. किरण जाधव, उपसरपंच मंगेश नागवेकर, पोलिस पाटील अनिल जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी कातळशिल्पांच्या एकत्रित विकासाबाबत संकल्पना मांडण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी शोधकर्त्यांना दिल्या. तालुक्यातील कातळशिल्प ठिकाणांची नोंद गाव भूमी अभिलेखात तातडीने घेण्याच्या सूचना उपस्थित तहसीलदार शशिकांत जाधव यांना दिल्या. भेटीवेळी शोधकर्ते संशोधक सुधीर रिसबुड, पुरातत्व अभ्यासक ऋत्विज आपटे, वास्तुविशारद मकरंद केसरकर, सुहास ठाकरदेसाई उपस्थित होते. रत्नागिरी जिल्ह्याने भूषवावा, अशा वारसा संवर्धनासाठी श्री. पाटील यांची प्रत्यक्ष ठिकाणांना भेट निश्चितच आश्वासक असल्याचे मत रिसबुड यांनी व्यक्त केले.
उक्षी ग्रामस्थांच्या कामाचे कौतुक
उक्षी गावच्या कातळशिल्प ठिकाणे भेटी वेळी कोकणातील कातळशिल्प त्यांचा कालावधी, महत्व आणि संवर्धनाच्या दिशा याबाबत अधिक माहिती जाणून घेतली. शोधकर्ते संशोधक यांच्या मार्गदर्शनाखाली उक्षी गावाने कातळशिल्प संरक्षण संवर्धन करण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराचे, कामाचे कौतुक केले.