गुहागरमधील विकास संस्थांचा ठराव, पाटपन्हाळ्यात झाली बैठक
गुहागर, ता. 17 : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेने (Ratnagiri District Co-Operative Bank) गुहागर तालुक्यावर अन्याय केला आहे. तालुक्यातील 8 सोसायट्यांचे मतदान प्रतिनिधी (Voting Representative) बाद करण्यात आले. तसेच सहकार पॅनेलमधुन गुहागरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोन संचालकांना काढून टाकण्यात आले. सहकार पॅनेलच्या या भूमिकेबाबत गुहागरमधील सहकार क्षेत्रात तीव्र नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करण्यासाठी गुहागर तालुक्यातून विकास संस्था मतदारसंघाबरोबरच अन्य मतदारसंघातून उमेदवार उभे करण्याचा निर्णय गुहागरमधील विकास सोसायट्यांच्या प्रमुखांनी घेतला आहे. (RDCC Bank Election)
सध्या जिल्ह्यात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेची रणधुमाळी सुरु झाली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तानाजी चोरगे यांच्या नेतृत्त्वाखाली सर्वपक्षीय सहकार पॅनेल ही निवडणूक बिनविरोध करण्याची तयारी करत होते. मात्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यातील 28 विकास संस्थाच्या मतदान प्रतिनिधींचा अधिकारच संपुष्टात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातील जानवळे, चिखली, पेवे, पालशेत, अंजनवेल, कोळवली, शीर, मुंढर या 8 विकास संस्थांचा समावेश आहे.
विकास संस्थाचा मतदान प्रतिनिधी कसा ठरवतात?
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमधून एका संचालकाची निवड करण्यात येते.
संचालकाच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार कोणाला द्यायचा याचा निर्णय विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्वसाधारण किंवा मासिक सभेत घेतला जातो. तेथे संचालक किंवा सभासदांपैकी एकाची निवड मतदार म्हणून केली जाते.
ही निवड प्रक्रिया करताना सोसायटी जिल्हा बँकेमध्ये थकित असेल तर संबंधित सोसायटीच्या कोणत्याही संचालकाला मतदानाचा अधिकार देता येत नाही. अशावेळी जिल्हा बँक किंवा सोसायटीमध्ये थकित नसलेल्या सभासदाला मतदानाचा अधिकार द्यावयाचा असतो.
मतदानाचा हक्क का संपुष्टात आला
सध्या होणाऱ्या रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी ठरविण्याचे काम डिसेंबर 2019 मध्ये झाले. त्यावेळी तालुक्यातील प्रत्येक सोसायटीने आपापले मतदान प्रतिनिधी देण्याची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार निबंधक कार्यालयाने मतदार यादी प्रसिद्ध केली. ऑक्टोबर 2021 मध्ये प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यानंतर मतदार प्रतिनिधींच्या अर्जाची छाननी करण्यात आली. तेव्हा जानेवारी 2020 च्या दरम्यान थकित असलेल्या मतदार प्रतिनिधींना बाद ठरविण्यात आले. हे मतदार प्रतिनिधी बाद झाल्यामुळे त्या विकास संस्थेचा मतदानाचा अधिकारच संपुष्टात आला. यामध्ये गुहागर तालुक्यातील 8 विकास संस्था (जानवळे, चिखली, पेवे, पालशेत, अंजनवेल, कोळवली, शीर, मुंढर) बाद झाल्या.
नाराजीला सुरवात
बाद झालेल्या संस्थांना आपले म्हणणे मांडण्याची संधीच दिली गेली नाही. असा या संस्थाचालकांचा आरोप आहे. बाद झालेल्या संस्थांपैकी एका संस्थेच्या संचालकांनी सांगितले की, गुहागरमधील बाद झालेल्या संस्थाचा विचार केला तर या संस्थांचे संचालक सातत्याने रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत विकास संस्थाच्या सभासदांच्या हितांची बाजू मांडतात. म्हणून जाणिवपूर्वक या 8 संस्थांना निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. मतदानाचा अधिकारी गेल्यामुळे गुहागर तालुक्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेच्या भुमिकेविषयी नाराजी होती. या संस्थांना अपिलात जावून बाजू मांडण्याची संधी न दिल्याने संताप वाढत गेला.
गुहागरचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या दोघांना सहकार पॅनेलने वगळले
संतापाची ठिणगी विझण्याच्या आतच डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या सहकार पॅनेलमधुन गुहागरमधील ज्येष्ठ संचालक चंद्रकांत तथा आबा बाईत आणि गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संचालिका माधुरी गोखले यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आजपर्यंत गुहागर तालुक्याचे प्रतिनिधित्व नरवणचे डॉ. अनिल जोशी, आबा बाईत आणि माधुरी गोखले हे तीन संचालक करत होते. मात्र आता सहकार पॅनेलमध्ये केवळ डॉ. अनिल जोशी हे एकमेव प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सहकार पॅनेलने गुहागरवर अन्याय केला. असा मतप्रवाह गुहागरमधील सहकार क्षेत्रात बळकट होत आहे.
सहकार पॅनेलच्या विरोधात उमेदवार देण्याच्या हालचाली
मतदान प्रतिनिधींना नाकारणे आणि दोन संचालकांना वगळणे या दोन मुद्द्यांमुळे नाराज असलेले गुहागर तालुक्यातील विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे प्रतिनिधी यांची एक बैठक अचानक रविवारी सायंकाळी पाटपन्ह्याळ्यात झाली. यामध्ये तालुक्यातील वैध मतदान प्रतिनिधींसह 22 विकास संस्थांचे संचालक उपस्थित होते. यासर्वांनीच गुहागर तालुक्यातील सहकार चळवळीवर अन्याय होत असल्याचे मान्य केले. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मा. अध्यक्ष तानाजीराव चोरगे यांनी गुहागरमधील बँकेच्या संचालकांची संख्याही कमी केली आहे. त्यांच्या या भुमिकेबाबतही नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यातूनच गुहागरच्या सहकार क्षेत्राची संघटीत ताकद दाखवून देण्यासाठी स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळे गुहागर तालुक्यातून विकास संस्था मतदारसंघातून होणारी निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. तसेच अन्य मतदारसंघातूनही उमेदवार उभे करण्यात येतील असे विश्र्वसनीय वृत्त आहे.