शेवरीफाटा–हॉस्पिटल स्टॉप रस्ता दहा वर्षे खड्ड्यात; पंचक्रोशीतील दहा गाव एकत्र येणार
गुहागर, ता. 21 : तालुक्यातील तळवली येथील शेवरीफाटा ते हॉस्पिटल स्टॉप हा मुख्य रस्ता गेली दहा वर्षे दुर्दशेत असून आज या रस्त्यावरून वाहन चालवणे तर दूरच, पायी चालणेही जीवावर येत आहे. लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला वारंवार विनंती करूनही सांगून सुद्धा कानावर न घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात ग्रामस्थ आता संतापले आहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत नागरिकांनी एकमुखाने दि. २२ ऑगस्ट रोजी तळवली बागकर स्टॉप येथे रास्तारोको आंदोलन करण्याचा ठराव केला आहे. या आंदोलनात पंचक्रोशीतील दहा गाव मोठ्या संख्येने सहभागी होणार असून, प्रशासनाला जाग आणण्यासाठी हाच शेवटचा इशारा दिला आहे. Rasta Roko Movement in Talwali

रस्त्यावर डागडुजीसाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी अनेकदा खर्च केला. मात्र काही दिवसांनी खड्डे आणि दगड उघडे पडून प्रवाशांचे हातपाय मोडत आहेत, वाहनांचे नुकसान होत आहे. प्रशासन मात्र “पैसे नाहीत” असे सांगून हात झटकत आहे. तळवली हे पंचक्रोशीतील मध्यवर्ती ठिकाण असून येथे बँक, पोस्ट ऑफिस, प्राथमिक आरोग्य केंद्र, महावितरण कार्यालय यासह अनेक शासकीय दालनांत रोज शेकडो लोकांची वर्दळ असते. तालुकाभरातील रुग्ण उपचारासाठी याच रस्त्याने येतात. पण लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. Rasta Roko Movement in Talwali

गणेशोत्सवाच्या तोंडावर रस्ता दुरुस्ती न झाल्यास एसटी बस सेवा थांबवावी लागेल, अशी चर्चा वाहकांमध्ये सुरू असून यामुळे जनतेचा संताप आणखीनच भडकला आहे. यावेळी ग्रामस्थांचा स्पष्ट इशारा आहे की, “२२ ऑगस्टला रास्तारोको, त्यानंतरही प्रशासन जागे झाले नाही तर दुसऱ्याच दिवशी बांधकाम विभागात ठिय्या आंदोलन उभारू!”, असा निर्धारही ग्रामस्थांनी केला असल्याचे समजते. Rasta Roko Movement in Talwali