असगोली गावावर शोककळा; खारवी समाजाचा कार्यकर्ता हरपला
गुहागर, ता. 8 : असगोलीमधील ज्युडो खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडाशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या रमेश भिकाजी पालशेतकर (वय 41) याचा मंगळवारी सायंकाळी 5:30 वाजता वीजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. या घटनेमध्ये वेल्डिंगचे काम करणारे अन्य दोघेहि जखमी झाले आहेत. रमेशच्या अपघाती निधनाने असगोली गावावर शोककळा पसरली आहे.
असगोलीमध्ये रमेश पालशेतकर यांनी नवे घर बांधले होते. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिलेला असल्याने या नवीन घरावर पत्र्याची शेड उभे करण्याचे काम रमेश करत होता. शेडसाठी आवश्यक लोखंडी सांगड्याला वेल्डींगचे करण्याचे काम कमी पावसात सुरु होते. मात्र पावसाचे पाणी, उच्च दाबामध्ये सुरु असलेले वेल्डींग यामुळे लोखंडी सांगाड्यात वीज प्रवाहीत झाली. त्यामुळे रमेशसह दोघेजण जखमी झाले. मात्र रमेशला बसलेला वीजेचा धक्का तीव्र असल्याने तो जागीच मृत झाला. तर उर्वरित दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
रमेश पालशेतकर म्हणजे नेहमी चेहऱ्यावर हसू असलेले व्यक्तिमत्त्व होते. एखाद्याशी मैत्रीचे नाते निर्माण झाल्यावर त्याच्या सुखदु:खात खांद्याला खांदा लावून उभा रहाणारा रमेश अनेकांनी अनुभवाला आहे. हेदवीमधील हेदवकर विद्यालयात 2009 पासून क्रीडाशिक्षक म्हणून नोकरी करणारा रमेश पालशेतकर शालेय जीवनापासूनच उत्तम खेळाडू होता. रत्नागिरी जिल्हा जुडो संघटनेचा सचिव म्हणून तो कार्यरत होता. आहे. शालेय जीवनात असताना प्रशिक्षक निलेश गोयथळे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युडोपटु म्हणून तो तयार झाला. या क्रीडाप्रकारात जिल्हा, विभाग, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्याने यश मिळवले. नेपाळमध्ये खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत त्यांने सु पदक मिळवले होते. गुहागर तालुक्याचे नांव आंतराष्ट्रीय स्तरावर नेणाऱ्या खेळांडुंमध्ये रमेश पालशेतकरची गणना होती. त्याने अनेक खेळाडूही निर्माण केले. नोकरीवर रुजू झाल्यानंतरही ज्युदो प्रशिक्षक, पंच म्हणून तो कार्यरत होता. ज्युदो स्पर्धांचे यशस्वी नियोजन करणे हा त्याचा हातखंड्याचा विषय बनला होता.
आपली नोकरी व स्पर्धांमध्येच गुंतून न राहता असगोली गावाच्या सामाजिक व विकासामध्ये भरीव योगदान देत असे. गावातील प्रत्येक उपक्रमांमध्ये त्याचा सिंहाचा वाटा असायचा. नाटकात तळमळीने काम करणारा कलाकार म्हणून त्याची ओळख होती. हनुमान जयंतीला असगोलीत गादीवाला नाट्यमंडळातर्फे अनेक नाटकांमध्ये त्याने काम केले आहे.
शिकलेला, देशाटन केलेला रमेशवर असगोलीतील खारवी समाजाचा गाढा विश्र्वास होता. विविध विषयांमध्ये मार्गदर्शन करणे, समाजाच्या कार्यकमांचे नियोजन करणे आदी गोष्टींमध्ये रमेशचा पुढाकार होता. असगोलीमध्ये सध्या ग्रामदेवतेच्या मंदिराचा जीर्णोध्दार करण्याची तयारी सुरु आहे. या कामातही रमेश पालशेतकरवर गावाने जबाबदारी टाकली होती. खारवी समाज संघटनेमध्ये हिरारीने काम करणारा कार्यकर्ता म्हणून त्याच्याकडे पाहिले जात असे.
रमेशचे सात वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, आई – वडील, एक भाऊ व दोन बहिणी आहेत. सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रमेशने आपली कौटुंबिक जबाबदारीही ओळखली होती. भाऊ अनेक वर्षे आजारी होता. त्याच्याकडे लक्ष देत त्याला पूर्णपणे बरे करण्यासाठी रमेशने मेहनत घेतली. रमेशच्या प्रत्येक कामात पत्नीची मोलाची साथ लाभत असे.
उत्तम खेळाडू, क्रीडाप्रशिक्षक, सामाजिक भान असलेला कार्यकर्ता, कुटुंबाचा आधार असलेला रमेश पालशेतकरच्या अपघाती निधनाने असगोली गावावर शोककळा पसरली आहे. सारा गाव या घटनेने सुन्न झाला आहे. समाजाचा तरुण, तडफदार कार्यकर्ता हरपल्याने मोठी हानी झाल्याची भावना खारवी समाजातून व्यक्त होत आहे.
शब्द श्रध्दांजली
रमेश पालशेतकरच्या अकाली निधनाने अनेकांना धक्का बसला आहे. गुहागर तालुक्यात ज्युदो क्रीडा प्रकार रुजवणारे आणि रमेशचे गुरु, अत्यंत जवळचे सहकारी गुहागर हायस्कुलमधील क्रीडाशिक्षक निलेश गोयथळे रमेशच्या निधनाचा धक्का सहन करु शकले नाहीत. साश्रुनयनांनी गुहागर न्यूजजवळ बोलताना गोयथळेसर म्हणाले की, अत्यंत गरीब परिस्थितीशी झगडून रमेश मोठा झाला. ज्युदो खेळाचा प्रशिक्षक म्हणून त्याला विविध स्पर्धांमध्ये मी सोबत केली. क्रीडाशिक्षक होण्यासाठी बीपीएड करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर हेदवकर विद्यालयात नोकरी करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्याच्या प्रत्येक सुखदु:खाच्या क्षणात मित्र म्हणून सोबत केली. याची त्याला कायम जाणिव होती. गुहागरमध्ये ज्युदोच्या प्रचारासाठी, प्रशिक्षणासाठी, स्पर्धांच्या आयोजनामध्ये वेळ काळाचे भान विसरुन तो सहभागी होत असे. खारवी समाजात मिळणाऱ्या सन्मानामुळे तो कधी गर्वीत झाला नाही. मेहनत करुन स्वत:च्या पायावर उभा राहीला. आता कुठे स्थैर्य आणि सुख अनुभवायचे दिवस आले तेव्हा नियतीने त्याला हिरावून नेले. हे दु:ख पचविणे अवघड आहे.
पालशेत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच, पेठे ब्रेक मोटर्सचे व्यवस्थापक रवींद्र कानिटकर म्हणाले की, अत्यंत दुर्देवी घटना आहे. नाटकाचा तळमळीचा कार्यकर्ता आणि उत्तम अभिनेता आम्ही गमावला आहे.