सभापतीपदी पूर्वी प्रथमेश निमुणकर, शिवसैनिकांचे स्वप्न साकार
गुहागर, ता. 16 : येथील पंचायत समितीच्या सभापतीपदी सौ. पूर्वी प्रथमेश निमुणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अखेरच्या सभापतीपदासाठी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्याला आमदार भास्कर जाधव यांनी संधी देवून शिवसेनेच्या स्वागत मेळाव्यात दिलेले आपले आश्र्वासन पूर्ण केले. त्यामुळे गुहागरच्या पंचायत समितीवर भगवा फडकविण्याचे शिवसैनिकांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.
मंगळवारी दुपारी 12 वा. आमदार भास्कर जाधव यांनी सौ. पूर्वी निमुणकर यांचे नाव सभापती पदासाठी निश्चित केले. त्यानंतर पूर्वी निमुणकर यांनी सभापती पदासाठी उमेदवारी अर्ज भरला. अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी पूर्वी निमुंणकर यांची सभापतीपदी निवड झाल्याचे घोषित केले. (Purvi Nimunkar New Sabhapati of Panchyat Samiti Guhagar. She was elected from Padave Gan as Shivsena Candidate)
पंचायत समितीच्या निवडणुकीत सौ. पूर्वी निमुणकर आणि रवींद्र आंबेकर हे दोन सदस्य शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. आमदार भास्कर जाधव यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पंचायत समितीवर भगवा फडकवू असे आश्र्वासन येथील शिवसैनिकांना दिले होते. मात्र त्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेल्या सौ. विभावरी मुळे यांना सभापती म्हणून तर सुनील पवार यांना उपसभापती म्हणून आमदार भास्कर जाधव यांनी पसंती दिली. त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या गुहागर पंचायत समिती राष्ट्रवादीकडेच होती. पंचायत समितीच्या अखेरच्या कालावधीत शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्या सौ. पूर्वी निमुणकर यांना सभापती पद देवून आमदार भास्कर जाधव यांनी आपला शब्द पाळला आहे.
अधिकृत निवड झाल्यावर सौ. पूर्वी निमुणकर यांनी सभापतींच्या दालनात जावून पदभार स्विकारला. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, आमदार भास्कर जाधव व जिल्हाप्रमुख सचिन कदम यांच्या आशीर्वादाने मला सभापतीपद मिळाले आहे. आमदार जाधव यांनी दिलेला शब्द प्रत्यक्षात उतरविला आहे. आता सर्वांच्या सहकार्याने गुहागर पंचायत समितीचा कारभार चांगल्या रीतीने करण्याचा माझा प्रयत्न राहील.
शुभेच्छा देताना शिवसेना तालुकाप्रमुख सचिन बाईत म्हणाले की, आमदार भास्कर जाधव यांनी केलेली निवड सौ. निमुणकर सार्थ करतील. महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी अधिक प्रयत्न करावेत. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि सभापती निवडीमध्ये गुहागरला स्थान मिळाले तर तालुक्याच्या विकासाचा वेग वाढेल. त्याचा फायदाही सौ. निमुणकर यांना होईल.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, प्रवीण ओक, उपसभापती सुनील पवार, पंचायत समिती सदस्य सौ. विभावरी मुळे, पांडुरंग कापले, सिताराम ठोंबरे, रवींद्र आंबेकर, तालुकाप्रमुख सचिन बाईत, तालुका महिला आघाडी प्रमुख सौ. पारिजात कांबळे, शहरप्रमुख निलेश मोरे, युवा सेना तालुकाधिकारी अमरदिप परचुरे, आबलोली सरपंच तुकाराम पागडे, प्रदीप सुर्वे, विलास गुरव, भाऊ उकार्डे, संतोष नेटके, प्रकाश काताळकर, सचिन जाधव, वनिता डीगणकर, प्रथमेश निमूणकर, प्रशांत विचारे त्याचप्रमाणे तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपविभागप्रमुख ,शाखाप्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.
आता लक्ष उपसभापतींच्या निवडीकडे ?
आता उपसभापती पदी शिवसेनेच्या तिकीटावर निवडून येणाऱ्या रवींद्र आंबेकर यांना संधी मिळणार की, राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले आमदार भास्कर जाधव समर्थक ज्येष्ठ पंचायत समिती सदस्य सिताराम ठोंबरे यांना संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.